व्याख्यानमाला-१९९५-९६-३९

दादाभाई नौरोजींनी ही वसाहतवादी लुटालूट इंग्रजी कशी करतो हे अगदी तपशीलवार आपल्या प्रसिद्ध ग्रंथात दिले आहे. त्या ग्रंथातील पानंच्या पानं आमच्या अर्थव्यवस्तेतील लुटीला, जशीच्या तशी लागू करता येतील. शहारतल्या झोपडपट्ट्या या स्वस्त मजूरीची गोडावून आहेत आणि त्या शहर उभारणीसाठी आणि चालविणेसाठी आवश्यक आहेत. शेतमालाच् किंमतीचा प्रश्न वसाहतवादी दृष्टीतूनच हाताळला जातो. शेती उत्पादनाच्या खर्चाचासुद्धा विचार केला जात नाही. शेतमालाच्या किंमतीसाठी आणि शेतीक्षेत्रांतील अडचणीसाठी जे लोक चळवळी करतात, त्यांच्याही डोळ्यापुढे मॉडेल म्हणून शहरी, संघटित, औद्योगिक समाजव्यवस्थाच आहे. सहकारी कृषी औद्योगिक समाजरचनेसारखी, अर्थव्यवस्थेतील प्राथमिक क्षेत्राचे वर्चस्व टिकवून धरणारी व्यवस्था मॉडेल म्हणून नाही. उद्यगव्यापार, सेवक कल्याण यांच्या प्रभुत्वासाठी शेतीप्रधान ग्रामीण अर्थव्यवस्थेचे क्षेत्र लुटले तरी ते जरा शिस्तीने लुटा, दुखापत न करता बलात्कार करा. एवढीच अपेक्षा आजच्या शेतकरी संघटना चालवणारांची दिसते. उत्पादक घटकांतील आंतरविरोध टाळून त्यांच्यात पूर्ण सहकार साधून, त्या उत्पादक घटकांचेच अर्थव्यवस्थेवर पूर्ण नियंत्रण राहील आणि अनुत्पादक घटकांचे बांडगुळी वर्चस्व पूर्णतः मोडीत काढले जाईल, अशी भूमिका घेऊन, नोकरी, शेतमजूर, कारागीर यांच्या परस्परपूरक संघटना करणे आज आवश्यक झाले आहे.

शेतीतील श्रम आणि शेतीतील माल, उद्योग व्यापारातील श्रम व त्यांतील उत्पादीत वस्तू व सेवा, यांच्या किंमती समान सूत्राने का ठरत नाहीत? “इंडस्ट्रीयल कॉस्टींग” शेतमाल व शेतीतील श्रम यांना लागू न करता ते फक्त “रिम्युनरेटिव्ह” ठेवले जाते. मग औद्योगिक क्षेत्रालाही “रिम्युनरेटिव्हचा” फॉर्म्युला का लागू केला जात नाही? शेतमालाच्या किंमती उत्पादन खर्चाशी निगडीत ठेवल्या जातात. औद्योगिक मालाचा उत्पादन खर्च का जाहीर होत नाही? आणि त्याच्या किंमती या उत्पादन खर्चाशी निगडीत अशा का ठेवल्या जात नाहीत? इथेच सा-या संघटित वर्गांनी, असंघटित वसाहतवादी शोषण चालू ठेवण्याचा निर्धार करून तीच शोषक अर्थव्यवस्था चालू ठेवली आहे. या लुटालुटीतून आम्ही काय निर्माण केले? जी शहरे सूज आल्याप्रमाणे आम्ही फुगवीत चाललो आहे, ती शहरे तरी मानवीवस्त्या म्हणून चांगल्या आहेत काय? गर्दी, गोंधळ, घाणीने बरबटलेली, माणसांचा चेहराच हरवून बसलेली शहरे, या माणसातल्या जनावरी प्रेरणा उत्तेजित करणा-या वस्त्या आहेत. ज्या असंघटित ग्रामीण भागाची आम्ही वसाहतवादी लूट चालूच ठेवली आहेत. ती गावे तर आज पिण्याच्या पाण्यालाही महाग झाली आहेत. आमच्या पन्नास वर्षांतील आठ पंचवार्षिक योजनेतून आम्ही कसला विकास साधला? उध्वस्त, उजाड गांवे आणि बेढब, विकृत शहरे. सर्व विकासाचे अंतीम मोजमाप, कसला माणूस, कसली मनुष्यवस्ती तुम्ही उभी करता यावरच होत असते. भरमसाठ वस्तूंचे ढीग, बटन दाबले की सर्व सुखसोयी समोर उभ्या करणारे विज्ञान तंत्रज्ञान, वेगवान वहाने, चळी स्थळी अवकाशी संचार, चकचकीत रस्ते, प्रचंड वास्तू ही सारी प्रतिसृष्टी निर्माण करणारी कर्तृत्वशक्ती अगाध, अफाट आणि नतमस्तक करायला लावणारी असली तरी माणूस षडरिपूंच्या हातातील बाहुला म्हणूनच व्यवहार करीत राहिल, तर ती सोन्याची लंखा रावणाची, राक्षसांची राहणार. राक्षसांची कर्तृत्वशक्ती देवापेक्षाही अफाट असते. पण संस्कृतीऐवजी विकृतीने ग्रासलेले त्यांचे मन, त्या शक्तीतून पृथ्वीचा नरकच करून टाकतात. पाश्चात्यांची ही महाराक्षसी विकृत कर्तृत्वशक्ती, व्यक्ती, समाज आणि सृष्टीच्या अंतीम हिताची नाही. याची जाणीव बोथट करणारा विकास हा शेवटी विनाशातच संपून जाईल.

अन्क धर्मगुरु, विचारवं शास्त्रज्ञही या विनाशाची घंटा वाजवून अधून मधून इषारे देत असतात. परंतु दारुच्या आहारी गेलेला दारुड्या माणूस कधीमधी आपण करतो आहे हे बरं नाही असं जाणतो, बोलतो, पण त्याचे ते व्यसन सुटत नाही. अशी काहीशी झिंग, पाश्चत्यांच्या भोगवाजी संस्कृतीने माणसांना आणली आहे.

आमच्या विकासातून ज्याला पुढे यायची, पैस मिळवायची संधी मिळते, तो शहराकडे धावतो. गावात जे रहातात ते नाईलाज म्हणूनच, गांवांत आता चांगलं असं शिल्ल्क रहात नाही. चांगल मक्याचं कणीस आलं, तरी ते शहरांत नेऊन विकावस वाटत. घरांत म्हशीचं दुभतं जरी केलं, तरी ते शहरांत विकावच लागतं. घरातल्या मुलांना ते देणं परवडत नाही. चांगली मुलगी जरी जन्माला आली तरी ती शहरातच दिली जाईल, जे जे म्हणून चांगलं असेल ते ओढून शोषून घेण्याची जादू शहरी संस्कृतीच्या हातात आम्ही या विकासांतून दिली आहे.