गावाच्या सर्वांच्या गरजा व त्या भागविण्यासाठी लागणा-या सेवा व वस्तू यांचे उत्पादन स्थानिक पातळीवर व्हावे म्हणूनही सहकारी चळवळीला लक्ष द्यावे लागणार आहे. गावागावाची स्वयंपूर्णता हे ध्येय ठेवलेच पाहिजे. तरच केंद्रीकरणाला आळा बसेल. एकमेकांच्या गरजा भागवून, एकमेकांचा सहकार साधून एकात्म गाववस्ती चालली पाहिजे. सहकारी ग्रामव्यवस्थेचे एक आगळे दर्शन आहे. एक नवीनच रस्ता आहे. समाज जीवनाची एक वेगळी बैठक आहे. ध्येय म्हणून ती स्वीकारून चालायची आहे.
परंतु आम्हाला सहकारी चळवळ त्या वैचारिक भूमिकेवरून चालवता आली नाही. कुत्र्याचे शेपूट जसे वाकडे ते वाकडेच रहाते. तसे सहकारांत काम करणारे कार्यकर्तेही भांडवलशाहीतील खाजगी उत्कर्षाकडेच वळले. सहकारी चळवळीची एक आचार-विचार संहिता करून ती कठोरपणे अंमलात आणता आली नाही. सहकारांतून व्यक्तीगत लाभ घेऊन जीवनमानाच्या वरच्या श्रेणीत गेलेले शिडीप्रमाणे सहकार वापरून लाथाडून देताना दिसताहेत. सहकारातून बडी झालेली घराणी आता सहकार सोडून खाजगी व्यापारी, कारखानदार, यांच्या चालीने चालू लागली आहेत. खाजगी करणाच्या पालख्या वहायला लागली आहेत. संमिश्र अर्थव्यवस्था जशी शहरी औद्योगिक, संघटित समाजनिर्मितीकडेच झुकली तशी आमची सहकारी चळवळही त्याच वळणावर नेली गेली. यशवंतराव, धनंजयराव, वैकुंठभाई यांनी काढून दिलेल्या दिशा सुटल्या, ते रस्ते काळवंडून गेले. गावागावातील सहकारी चळवळीची आज काय अवस्था आहे? त्यांच्यात सहकार किती राहिला आहे? तिथे लोकांचा सहकार राहिलेला नाही. विस्कळीत लोक जागृत व सघटित करण्याची क्षमता सहकारांत आहे. संबंधित सर्वांच्या हितसंबंधात सहकार साधायचा असल्यामुळे प्राथमिक क्षेत्रातील शेतकरी शेतमजूर, कारागीर यांच्या बलाढ्य संघटना, सहकारी चळवळीनेच बांधायला हव्या होत्या, सारे प्राथमिक क्षेत्र संघटित करून दुय्यम व तिय्यम क्षेत्राकडून त्यांचे जे वसाहतवादी शोषण आजही चालू आहे ते थांबवता आले असते. शेती, शेतकरी आणि कारागिरी यांचे गेलेले वैभव आणि महत्व पुन्हा प्रस्थापित करून भारतीय अर्थव्यवस्थेचा शोषण विरहित नमुना सहकारी चळवळीतूनच गावोगांव उभा करता आला असता.
आज मात्र सहकारी संस्था या राजकाणाचे अड्डे म्हणून आम्ही चालवतो. सहकाराचे सरकारीकरण केल्यामुळे राजकारणी लोकांना सहकारी संस्था म्हणजे मधाचे पोळे वाटते. या सरकारीकरणामुळेच सहकाराची पर्यायी अर्थव्यवस्था देण्याची क्षमता संपून गेली. पब्लिक सेक्टर जसा सरकारी नोकराने तुडवून टाकला आणि खाजगी क्षेत्राला पर्याय देण्याऐवजी खाजगी क्षेत्रालाच उचलून धरणारा आधार म्हणून पब्लिक सेक्टर वापरला. तशीच अवस्था सहकार क्षेत्राचीही करून ठेवली. सत्ताधा-यांनी तर गावागावातील सहकारी चळवळ ही गट तट भांडणे वाढवण्याची योजना म्हणून राबवली. आज गावागावांत त्या सहकारी दूध सोसायच्यांची काय अवस्था आहे? एकेका गावांत ५-१०-१५ पर्यंत दूध सोसायट्या रजिस्टर केल्या आहेत. प्रत्येकाने आपला गट, आपला माणूस सांभाळायचा. मग त्या गावच्या चिंध्या झाल्या तरी चालेल. सर्व दूध सोसायट्या तोट्यांत गेल्या तरी चालतील. हे राज्यकर्ते यशवंतरावांचे नांव घेतात, काहीजण तर मानसपुत्र म्हणून मिरवितात. गावपातळीवर अनेक शाळा, सोसायट्या, इतकेच काय पण वाडीवस्तीला ग्रामपंचायत मंजूर करताना, त्यांना गावांत सहकार, समन्वय, एकोपा नांदावा असे वाटते का? गावांत पाणी पुरवठा, पत पुरवठा, दूध विक्री, रेशनवाटप, सर्व ठिकाणी गटबाजी, वादावादी कशी वाढेल ह या नतदृष्ट राजकारण्यांनी पाहिले आहे. बारामतीजवळ तर एका गावांत १९ सहकारी दूध सोसायट्या रजिस्टर करायला मंजू-या हिल्या आहेत असं मी ऐकलं. सत्ताबाजी, गटबाजी, घराणेशाही, गुंडगिरी यासाठीच राजकारण अशी त्यांची वैचारिक भूमिका. स्वातंत्र्य मिळविले कशासाठी? भारतीय घटनेची प्रतिज्ञा काय? यशवंतरावांची महाराष्ट्र उभारणीची दिशा काय होती? दृष्टी काय होती? विचारांची बैठक काय होती? याची कशाचीही जाणीव नाही. भान नाही. बेभानपणे निवडणूका लढवायच्या, साताजन्माचे वैर असल्याप्रमाणे विरोधकांना चित करायचे, सत्ता हातात आली की, पैसा, पदे, प्रसिद्धी यासाठी हापालेल्याप्रमाणे वाटेल त्या थराला जायचे.
सहकारांतून नवे गांव उभे करणे शक्य होते. एक मजबूत विविध सेवा सोसायटी, एक मजबूत दूध, अंडी, मांस, मच्छी सहकारी सोसायटी, कारागिरी, शेतीमाल प्रक्रिया, खरेदी विक्री, गावचा सर्व आर्थिक व्यवहार अत्यंत कार्यक्षमतेने पाहणा-या मजबूत पण मोजक्याच संस्था चालवून प्रत्येक पंचवार्षिक योजनेतून गावाचा चेहरामोहरा बदलत, विकासाच्या पाय-या चढत, संपन्न, स्वयंपूर्ण, स्वायत्त, सुरक्षित, एकात्म ग्रामस्वराज्याच्या दिशेने नवे गावआंदोलन चालविणे सहकारी चळवळीतून शक्य आहे.