व्याख्यानमाला-१९९५-९६-२५

इंग्रजांच्या या युरोपीय वसाहतवादी आक्रमणाचे भयंकर राक्षसी रूप दादाभाईंनी वरवरचा मखमली पडदा फाडून दाखविले. इंग्रजी राजकारण, अर्थकारण हे नीतीशी जोडलेल नसून अन्याय, अत्याचार, अनीतीशी जोडलेले आहेत हे त्यानंतर हिंदुस्थानी लोकांच्या ध्यानात येऊ लागले.

स्वतंत्र्याची चळवळ झाली. इंग्रजी वसाहतवादी शोषणातून देश मुक्त झाला. पण स्वातंत्र्यानंतर आम्ही कोणती अर्थ नीती अवलंबिली. नवभारताच्या उभारणीची आपली प्रतिज्ञा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यांत जाहीर झाली आहे. तिचा मी काल उल्लेख केला. आमचा निर्धारपूर्वक केलेला संकल्प आहे की, आम्हाला स्वतंत्र भारतात सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक लोकशाही समाज उभा करायचा आहे. प्रत्येक भारतीयास न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता मिळवून द्यावयाची आहे. सामाजिक ऐक्यभाव जोपासून राष्ट्राची एकता बळकट राखायची आहे. या आमच्या ध्येयाला पोषक, पूरक अशी आमची अर्थनीती असली पाहिजे. आमच्या राज्य नीतीला अर्थनीतीची जोड दिलीच पाहिजे. आपल्याला स्वातंत्र्यानंतरचा काळ आठवत असेल. अर्थव्यवस्थेबाबत एक शब्द कानांवर येत असे, “को-ऑपरेटिव्ह कॉमन वेल्थ” पुढे पंडित नेहरुंच्या प्रभावाखाली आम्ही लोकशाही, समाजवाद असा शब्द वापरू लागलो. त्यावेळी जगाच्या पाठीवर लोकशाही मानणारे भांडवलशाही देश होते, आणि लोकशाही न मानणारे साम्यवादी देश होते. आमच्या स्वप्नांत लोकशाही आणि समाजवाद दोन्हीचे प्रचंड आकर्षण होते. म्हणून आम्ही आमचा ध्येयवाद, जगाच्या पाठीवरील दोन्ही गटांतील आम्हाला जे चांगले अनुकरणी वाटले ते एकत्र करून लोकशाही समाजवाद असा निश्चित केला. त्याला पूरक अशी खाजगी क्षेत्र व सरकारी क्षेत्र अशी दोन्ही क्षेत्रांत अर्थ व्यवस्था चालविणारी संमिश्र अर्थनीती जाहीर केली.

लोकशाही मानणा-या व समता मानणा-या दोन्ही ध्येयवादांची स्वतःची अशी अर्थव्यवस्था आहे. उत्पादन विभाजन, वितरणाची दिशा निश्चित आहे. पाश्चात्यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था विकसित केली. कम्युनिस्ट रशियांत साम्यवादी अर्थव्यवस्था विकसित झाली. आम्ही एक पिढीभर जोरजोरांत जाहीर केले. “वुइ आर नॉट कॅपिटॅलिस्ट, वुई आर नॉट कम्युनिस्टस, वुई आर डेमॉक्रेटिक सोशॅलिस्ट” आम्ही भांडवलशाही ही, आम्ही कम्युनिस्टस नाही, आम्ही लोकशाही समाजवादी आहोत” काँग्रेस पक्षाच्या आवडीच्या अधिवेशनात या ध्येयवादाची स्पष्ट घोषणा झाली. आम्ही आमचा अर्थ व्यवहार पब्लिक सेक्टर आणि प्राइव्हेट सेक्टर या दोघांत वाटून दिला. “पब्लिक सेक्टर” हा तसा पब्लिक नव्हता. तो सरकारी सेक्टर होता. पब्लिकशी त्याचा संबंध नव्हता. पब्लिक स्कूल जसे पब्लिकशी संबंध नसलेले असत तसा.

लोकशाही समाजवाद हे आमचे ध्येय व त्याचा अंमल करणारी संमिश्र अर्थव्यवस्था ही आमची अर्थनीती, असा निर्णय घेऊन आम्ही कामाला लागलो. आमचे बेकारीचे, दारिद्र्याचे, विषमतेचे, शोषणाचे प्रश्न या अर्थ नीतीतून सोडवू असे आम्हाला वाटले. सुबत्ता, समता साधू, सर्वांचा समतोल विकास साधू, देशाची आर्थिक घडी नीट बसवून मजबूत करू अशा विश्वासाने आम्ही त्या मार्गाने वाटचाल सुरू केली. महाराष्ट्रात देशाची आर्थिक धोरणे राबवितांना यशवंतरावांची राजकीय प्रतिभा पुन्हा प्रत्ययाला आली. महाराष्ट्राची आर्थिक घडी बसवतांना देशाचे संमिश्र अर्थ धोरण तर अंमलात आणलेच परंतु एक तिसरा अधिक व्यवहारी रस्ता त्यांनी विकसित केला. कै. वैकुंठभी मेहता, डॉ. धनंजयराव गाडगीळ, अशा अर्थ पंडितांच्या सहकार्याने आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या सारख्या कर्मवीरांच्या व्यवहारी शहाणपणातून त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी तिसरा रस्ता विकसित केला. सहकारी कृषी औद्योगिक समाजरचना लोकशाही समाजवादाकडे जाणारे “प्राइव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर एवढे दोन मार्ग तर स्वीकारलेच पण सहकारी चळवळीचा तिसरा सेक्टर अधिक व्यवहारी, अधिक पूरक, अधिक जवळचा रस्ता आहे हे त्यांनी दाखवून दिले. “को-ऑपरेटिव्ह कॉमनवेल्थ” या मूळ विचारांचाच हा परिपोष होता. विशेषतः ग्रामीण अर्थ व्यवहाराची पुनर्रचना सहकारी मार्गानेच अधिक शक्य आहे, आणि लोकशाही समाजवादाची पर्यायी अर्थव्यवस्था होण्याची क्षमता सहकारी अर्थ व्यवस्थेत आहे. याचे प्रात्यक्षिक महाराष्ट्रात उभे करण्याची चळवळ यशवंतरावांनी सुरू केली.