व्याख्यानमाला-१९९५-९६-११

द्विभाषिक राज्याचा महाराष्ट्रावर लादलेला सापळ, हा यशवंतरावजींना अडकवणारा मोठा चक्रव्युहच होता. राष्ट्रीय राजकारणांशी आणि म्हणून काँग्रेस पक्षांशी एकनिष्ठ राहण्याची भूमिका त्यांनी लहानपणापासूनच मोठी विचारपूर्वक व प्रयत्नपूर्वक जोपासलेली राजकीय भूमिका होती. त्यामुळे राष्ट्राचा निर्णय म्हणून तो मानणे आणि राबवणे त्यांना भागच होते. परंतु व्यक्तिशः द्विभाषिक म्हणजे देशी वसाहती वादाचीच भलावण आहे अशी मोठी प्रखर भूमिका त्यांची होती. अशा माणसाला मुख्यमंत्री म्हणून द्विभाषिक राज्य चालवण्याची पाळी यावी हे त्या चक्रव्युहात ढकलण्यासारखेच होते. आपली राष्ट्रवादी भूमिका घेऊन त्यांनी मोठ्या चातर्याने तो चक्रव्युह यशस्वीपणे भेदून दाखवला आणि आपल्या मूळ भूमिकेप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र राज्यांचा मंगल कलश आणून मराठी माणसाच्या हातात दिला. द्विभाषिकातून भावनिक ऐक्य साधता येत नाही, हे दर्शविण्यांत चव्हाणसाहेब यशस्वी झाले. राष्ट्रीय नेत्यांचा त्यांनी प्रथम विश्वास मिळवला. स्वजनांचा काही काळ रोष पत्करला, स्वतःच्या राष्ट्रवादी भूमिकेशी काँग्रेस पक्षाच्या निष्ठेशी त्यांनी प्रतारणा केली नाही. सामाजिक राष्ट्रीय ऐक्यातील भावनिक एकात्मतेच्या मुद्यावरच वरीष्ठांची खात्री पटवून मोठ्या मुत्सद्दीपणाने मराठी मनाची एकत्र येण्याची उत्सुकता पूर्ण करून घेतली. काँग्रेस पक्षाचा हललेला पायाही महाराष्ट्रात बळकट केला आणि इतर भाषिकांची कटूता न घेता सा-या देशाची बाहवा मिळवली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून अग्निपरीक्षा देवून कसास उतरलेले यशवंतरावांचे नेतृत्व देशाच्या उंचीवर गेले.

द्विभाषिकाचा चक्रव्यूह भेदून महाराष्ट्र निर्मिती साधून घेताना, अनेक ठिकाणी खरचटून घ्यावे लागले. निसर्ग समृद्ध आदिवासी डांग तालुके मराठी भाषिक असून गुजराथला द्यावे लागले. मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र येथील लाखो मराठी माणसे महाराष्ट्राबाहेरच राहिली, गोवाही गमावून बसलो, सीमाप्रश्नांचे घोंगडे तसेच भिजत ठेवून मिळाला तेवढा महाराष्ट्र पदरात पाडून घ्यावा लागला. तरी कैक पिढ्यांनंतर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठी माणसं एकत्र आली. मुंबई विदर्भ तोडण्याचे प्रयत्न नाकाम झाले, मराठी माणसांच्या नव्या संसाराची नीट घडी बसवून उरलेले प्रश्न नंतर सोडवू अशी भुमिका घेऊन चव्हाणसाहेब महाराष्ट्राचे नेतृत्व करू लागले. कैक पिढ्यानंतर महाराष्ट्रांत उत्साहाचे, ईर्षचे आणि काहीतरी करून दाखवण्याचे वातावरण निर्माण झाले.

महाराष्ट्र निर्मितीनंतर अवघी दोन वर्षे यशवंतरावजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. परंतु तेवढ्याही काळांत त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीची जी धोरणे आखली, जी पाऊले उचलली आणि जी कार्यपद्धती अवलंबली त्यामुळे सारा महाराष्ट्र कैक वर्षांनी चैतन्याने उचंबळू आला. लोकशाही, समाजवाद आणि राष्ट्रीय व सामाजिक एकात्मता हा त्रिशूल हातात घेऊन कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सरंजामी, विषमतावादी व जातीयवादी प्रकृती विरूद्ध लढाई सुरू केली. अज्ञान, आळस, परलोकवादातून लोकमानस मुक्त करण्याचे मोर्चे बांधले. शिक्षण प्रसाराची प्रचंड चळवळ उभी केली. दारिद्र्य, बेकारी, गरीबीचे विरुद्ध सहकारी पद्धतीने लोकशक्ती संघटित करून महाराष्ट्राची सारी ग्रामीण अर्थव्यवस्था जी आटत चाललेल्या, साचलेल्या डबक्यासारखी झाली होती ती गट तट, कडे, बांध फोडून प्रवाहित केली. सहकारी कृषी औद्योगिक समाजरचनेची नवी स्वप्ने मराठी मनावर कोरली. त्याचबरोबर गावोगांव पंचायत राज्यसंस्थाना नवा आशय, नवी दिशा व दृष्टी देवून लोकशाही समाजजीवन पद्धती खोलवर रुजवण्याचे आणी स्थानिक विकासांत लोकसहभाग मिळवून विकासाला प्रचंड गती देण्ये उपक्रम हाती घेतले. कोयनेसारखी धरणे बांधून, प्रचंड वीज निर्मिती करून शेत बांधावर वीज नेली. नव्या आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या शक्तीचे दर्शन शेतबांधापर्यंत दिले. कारखानदारी, उद्योग, शहरीकरण, दळवळण, रस्ते, पाटबंधारे, व्यापार सा-या आर्थिक आघाड्या मराठी माणसाठी उघडून दिल्या. क्रीडा, कला, लोककला, साहित्य, चित्रपट, इतिहास याही क्षेत्रातील मराठी उर्मी जागवून प्रचंड झेप घेण्यासाठी उठवून उभ्या केल्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परलोकवादाच्या चातुर्वर्ण्याच्या आणि जातीपातीच्या मानसिक गुलामीत पिढ्यानपिढ्या असहाय्य हतबल होऊन उध्वस्त झालेल्या सामान्य माणसाला नवा हुरूप, नवा आत्मविश्वास, नवी स्वप्ने दिली. सर्वच जाती जमातींना विश्वास, दिलासा दिला. परस्पर समजूतदारपणा, मनमोकळेपणा, विश्वास वाढून, परस्पर सहकार्याची कृती उत्तेजित केली. नव्याने महाराष्ट्रांत एकत्र आलेल्या सा-या मराठी मनांत भावनिक एकात्मता निर्माण व्हावी, परिदृढ व्हावी यावर तर यशवंतरावांनी फार कटाक्षाने भर दिला. छत्रपती शिवरायांच्या नंतर पुन्हा एकदा मराठी मने “मेळवून” “मराठी स्वराज्य” निर्माण करण्याचा ध्येयवाद मराठी मनांत भरला. त्याचवेळी राष्ट्रीय भारतीय अस्मितेला बळकट करणारा समर्थ महाराष्ट्र याचेही भान त्यांनी मराठी मनांत जागते ठेवले. महाराष्ट्राच्या जडणघडणीची, आधारशीला मराठी मनांतील परस्पर एकोप्याची, विश्वासाची बंधुतेची भावना हीच आहे याची जाणीवपूर्वक दक्षता घेवून यशवंतरावांनी आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीची पायाभरणी केली. त्यांनी घालून दिली घडी संभाळून व त्यांनी दिलेली दिशा व दृष्टी ठेवून, यशवंतराव दिल्लीला गेल्यानंतर १०-१२ वर्षे महाराष्ट्र चालला. त्यानंतर मात्र मराठी मनातील भावनिक एकतेकडे परस्पर विश्वासार्हतेकडे, दुर्लक्ष करणारे आणि केवळ सत्ता, स्वार्थ प्राप्तीसाठी संधीसाधूंचे राजकारण करणारेच नेते, राज्यकर्ते आणि त्यांचे सल्लागार महाराष्ट्रात वाढले गेल्यामुळे महाराष्ट्राची घडी पुन्हा विस्कळीत झाली. आणीबाणीच्या राजकारणांमुळे देशाचे राजकारण जसे उध्वस्त केले गेले तशी महाराष्ट्राची घडीही उस्कटून गेली. त्या आणीबाणीपासून आजतागायत महाराष्ट्राचे आणि देशाचे राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शेपूट तुटलेल्या पतंगासारखे गिरक्या घेत फरफटत चालले आहे.