व्याख्यानमाला-१९९५-९६-१०

प्रातिनिधीक लोकशाही राज्यव्यवस्थेतून नवभारताची जडणघडण करायची हा जसा निर्णय झाला तसा देशविकासासाठी भाषावार प्रांतरचनाही आवश्यक आहे असा विचार स्वातंत्र्याच्या चळवळीतच आकाराल आला होता. इंग्रजी राजवटीत ते जसा देश जिंकत गेले तसे त्यांच्या कारभाराच्या सोयीसाठी, तालुके, जिल्हे, प्रांत तयार करीत गेले. त्यांत लोकांची सोय पाहण्याचा प्रश्नच नव्हता. पूर्वीची अनेक लहानमोठी संस्थानेही मांडलिक म्हणून चालू ठेवली होती. तो ५६५ संस्थानांचा मुलूख व त्याबाहेरचा ब्रिटीश अंमलाखालील मुलूख ते जसा जिंकत गेले तसे त्यांनी कारभाराचे घटक तयार केले. स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः संस्थांनी मुलूखांच्या विलिनीकरणानंतर, लोकांच्या सोयीने राज्यकारभाराचे प्रादेशिक घटक करण्याची निकड वाटू लागली. त्यातूनच भाषावार प्रांत रचनेचा प्रस्ताव देशभर अंमलात आणावा लागला. भाषा हा माणसांतील एकात्मता बळकट करणारा मोठा घटक आहे. एक भाषा बोलणारी माणसे एका घटक राज्यात असली तर ही एकात्मता वाढून, राज्यकारभाराला व विकासाला गती येईल या विचारानेच १९५६ साली भाषावार प्रांतरचना देशभर लागू झाली. घटक राज्यांची पुरर्रचना झाली. दुर्दैवाने महाराष्ट्रावर मात्र द्विभाषिक लादण्यात आले. लोकांची सोय व इच्छा डावलून गुजराथ, महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा असे मुंबई राज्य निर्माण करण्यात आले. मध्यप्रदेशांत व निझामी संस्थानांत असलेला मराठी मुलूख एकत्र आला, पण गुजराथी व मराठीचे द्विभाषिक राज्य चालू ठेवण्यात आले. त्यातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा भडका, मराठी प्रदेशांत उठला.

महाराष्ट्राची जडणडण आणि कै. यशवंतरावजींच्या नेतृत्वाची जडणघडण यांत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला फार मोठे ऐतिहासिक महत्व आहे. सर्व मराठी भाषिकांना एकत्र येण्याची, एकत्र राहण्याची आणि परस्पर सहकार्याने आपला विकास करून घेण्याची नैसर्गिक अशी तीव्र इच्छा होती. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी झाली. स्वातंत्र्यानंतर सर्वांगीण विकास हेच राष्ट्रापुढील अग्रक्रमाचे उद्दीष्ट आहे. विकासासाठी एकोप्याची गरज असते. असा एकोपा बळकट करणारे भाषा हे मोठे साधन आहे. एक भाषा बोलणा-या लोकांनी परस्पर सहवासातून, देवाणघेवाणीतून आपली एक विशिष्ट संस्कृती. विशिष्ट अस्मिता जोपासलेली असते. आणि त्याबद्दलचा मोठा अभिमान त्या सर्व भाषिकांच्या मनांत असतो. असे एक भाषा बोलणारे लोक एका घटकराज्यांत येऊन आपला राज्यकारभार करू लागले तर परस्पर विश्वास, समजूत जिव्हाळा, बंधुभाव आणि त्यातून मनमोकळा सहभाग वाढीस लागतो. भाषावार प्रांतरचनेचे सूत्र हेच आहे की, भाषा माणसाची मने जुळवते, भावनिक एकात्मता निर्माण करते. देशभर भाषावार प्रांतरचना अंमलात आली. परंतु राष्ट्रीय राजकारणांत प्रभाव असणा-या तत्कालीन काही पुढा-यांच्या मनांत मराठी माणसांबद्दल आकस, अविश्वास, दुरावा, भीती रेंगाळत असल्यामुळे महाराष्ट्राव गुजराथी वर्चस्वाचे द्विभाषिक लादण्यात आले. हा दुरावा, अविश्वास, भीती महाराष्ट्राला फार महागांत पडत आली आहे. भारतीय राजकारणांत, इतर प्रांतियांच्या मनांत विश्वास, स्नेहभाव, आपुलकी निर्माण करण्यांत आम्ही इतिहास कालापासून अपूरे पडलो आहोत. किंबहुना त्याबद्दल बेफिकीरच राहिलो आहोत. विशेषतः पेशवाईच्या काळात “हिंदवी स्वराज्याचा व्यापक ध्येयवाद टाकून स्वतःपुरता ब्राह्मणी राज्याचा ध्येयवाद जोपासला गेल्यामुळे, महाराष्ट्राबाहेरचा हिंदुस्थान हा फक्त स्वा-या, शिकारी करण्यासाठी व चौथाई सरदेशमुखी करून लुटालूट करण्यासाठीच आहे असाच समज शनिवार वाड्यांत शिल्लक राहिल्यामुळे, मराठे म्हणजे लुटारू असा समज परप्रांतात रूढ झाला. रडणा-या लहान मुलाला गप्प करण्यासाठी “आला बागुलबुवा” असं आपल्याकडील आया म्हणतात. तसं बंगाल बिहारकडील आया “मराठा आया” असं त्या मुलाला म्हणतात. “अटकेपार झेंडे नेले तरी संध्याकाळी पुण्याकडे” हीच मनोवृत्ती पुणेकर राज्यकर्त्यांची राहिली. आमच्या राष्ट्रवादाच्या कल्पनाही, अहंकारी, भांडखोर व अडाणी स्वभावामुळे संकुचितच राहिल्या. आमच्या जवळ जे चांगले आहे, उदात्त आहे ते अवघ्या भारतवासियापर्यंत पोहोचविण्याचा आम्ही कधी प्रयत्न केला नाही. आमचे ज्ञानेश्वर, तुकाराम, आमचे शिवछत्रपती, संभाजी, ताराबाई, आमचे महात्मा फुले, शाहू महाराज आम्ही आमच्यापुरतेच कोंडून ठेवले. लोकमान्य टिळक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एवढे अपवाद सोडले तर आम्ही आमच्या महारापुरुषांनाही राष्ट्रीय संदर्भात पुढे नेले नाही. स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती केली पाहिजे असे म्हणणारे आमचे सावरकर ऐन चळवळीत दारूत पाणी घालून बसले,आणि प्रत्यक्ष आझाद हिंद सेना उभारून, इंग्रजांना रणांगणात आव्हान देणारे सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय महापूरुष झाले. आमच्या मनाचा हा भोतेपणाच मराठी माणसाबद्दल इतर प्रांतातील भारतीयांच्या मनांत दुरावा, संशय, अविश्वास, भीती, तिरस्कार निर्माण होण्यास कारणीभूत आहे. राष्ट्रीय पातळीवरील या वस्तुनस्थितीची जाणीव ठेवू, दिल्लीच्या राजकारणांत फक्त यशवंतरावजी सावधपमे वावरले. त्यामुळे त्यांच्याबद्दल देशभर आदरभाव दिसतो. पण त्यांचे चेले म्हणणारे आजचे राजकारणी, आपल्या सत्ताबाजीच्या निर्लज्ज राजकीय चालीमुळे पुन्हा महाराष्ट्रात आणि मराठे यांच्याबद्दल गैरसमज, इतर भारतीयांच्या मनांत दृढ करीत आहेत.