व्याख्यानमाला-१९९०-४ (5)

ज्यांचे हितसंबंध विद्यमान स्थिती म्हणजे जैसे थे स्थिती चालू ठेवण्यामध्ये गुंतलेले आहेत ते बदल रोखण्याचा, त्यात अडसर घालण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि ज्यांना आपल्या हितसंबंधासाठी नवी समाजरचना, नवी जडणघडण आवश्यक आहे असे वाटते ते बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. म्हणून त्यांच्यामध्ये संघर्ष होतो आणि म्हणून सगळ्यात चांगली राजकारणाची व्याख्या म्हणजे मी म्हटले तसे समाजात बदल घडवून आणण्यासाठी किंवा बदलाच्या प्रयत्नात अडसर घालण्यासाठी समाजातल्या विविध घटकांमध्ये जी स्पर्धा चालते त्यातून राजकारणाचा उद्भव होतो. “पॉलिटिक्स इज अँन ऑर्डर मेंटेनिंग ऑर अँन ऑर्डर ट्रान्सफॉर्मिंग सिस्टिम ऑफ इंटर अँक्शन बिट्वीन सोशल ग्रुप्स” सोशल ग्रुप्स फार महत्वाचा शब्द आहे. ती सामाजिक घटकांची कृती आहे.

राजकारणाचा जर यथार्थ अभ्यास करायचा तर व्यक्तिशः एकेक माणूस कसा वागतो याच्यापेक्षा समुदायाचा घटक म्हणून तो कसा वागतो या दृष्टीने पाहिले तरच त्याच्या वर्तनाचा अन्वयार्थ लागतो. “पॉलिटिक्स इज अ ग्रुप अॅक्टिव्हिटी” कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो वेगवेगळे ग्रुप्स, वेगवेगळे घटक, वेगवेगळे गट बनवित असतो. आर्थिक हितसंबंधासाठी आर्थिक गट बनवितो. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हितसंबंध जपण्याकरिता या त-हेचे गट बनवितो. आणि मनुष्य अशा अनेकविध गटांच्यामार्फत आपले जीवन जगत असतो. या वेगवेगळ्या गटांचा राज्यसंस्थेशी वेगवेगळ्या त-हेचा संबंध येतो. आणि यातले जे संघर्ष राज्यसंस्थेच्या हस्तक्षेपावाचून दूर होऊ शकतात, ते राजकारणाच्या क्षेत्रात येत नाहीत. हा  एक आणखी महत्वाचा विचार लक्षात ठेवा. “ऑल कॉन्फ्लिक्टस् डू नॉट लीड टू पॉलिटिक्स” काही संघर्ष हे सामोपचाराने परस्परांच्या स्पर्धेने काही स्वतःच नियम ठरवून त्या मर्यादेमध्ये सोडविता येतात. पण जे संघर्ष असे स्वतंत्रपणे राज्य संस्थेच्या हस्तक्षेपावाचून सुटू शकत नाहीत त्या ठिकाणी राज्यसंस्था हस्तक्षेप करते आणि आपल्यापाशी असलेल्या बळाच्या जोरावर ती जे निर्णय या संघर्षाच्या बाबतीत घेते ते निदान काही काळ तरी समाजाला मान्य होतात. आणि त्याला “अॅथॉरिटेटिव्ह आलोकेशन ऑफ व्हॅल्यूज इन सोसायटी” असे म्हणतात. पॉलिटिक्स काय करते? “पॉलिटिक्स अॅथॉरिटिटिव्हज व्हॅल्यू अॅलोकेशन” करते. अधिकृत वाटणी करते. मूल्यांची वाटणी. मूल्ये म्हणजे नैतिक मूल्ये नव्हे तर एकॉनॉमिक व्हॅल्यू ऑफ गुडस् अॅण्ड सर्व्हिसेस. किंवा सोशल व्हॅल्यूज, एज्युकेशन अॅण्ड कल्चर या व्हॅल्यूज. या सगळ्या ज्यांचा पुरवठा मर्यादित आहे, तुटपुंजा आहे आणि ज्याच्या मधून संघर्षाची सुरवात झालेली आहे. रॉबिन्सन क्रुसोच्या कथेमध्ये राजकारण नाही. रॉबिन्सन क्रुसोच्या कथेमध्ये अर्थकारणही नाही. राज्यशास्त्र नाही, अर्थशास्त्र नाही. कारण त्याच्या प्रश्नांचं स्वरूप तांत्रिक आहे. त्यांच्या गरजा कमी आहेत आणि ज्या वेगवेगळ्या वस्तूंच्या सहाय्याने तो आपल्या गरजा भागवू शकतो अशा वस्तू अमाप आहेत. परंतु त्याला तांत्रिक ज्ञानाची गरज आहे की ज्याच्यामुळे उदाहरणार्थ लांबचे पाणी दारापर्यंत येऊन त्याला प्यायला मिळेल. म्हणून तो आर्थिक प्रश्न नाही, राजकीय प्रश्न नाही. पण ज्याक्षणी समाजामध्ये वस्तूंचा, सेवांचा किंवा आणखी कुठल्याही गोष्टींचा पुरवठा मागणीपेक्षा कमी होतो त्यावेळेला संघर्षाला एक नवे कारण मिळते. हा संघर्ष काही प्रमाणामध्ये राज्यसंस्थेच्या हस्तक्षेपावाचूनही सुटतो. पण ज्यावेळी तो असा सुटत नाही त्यावेळेला अधिकृत निर्णय देण्यासाठी, निर्णय देण्याची शक्ती असलेली आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारे शासन करण्याचे बळ असलेली अशी जी राज्यसंस्था आहे तिच्यामार्फत समाज राजकारण करीत असतो. इथपर्यंत जर आपण पाहिलं तर साहजिकच राजकारणामध्ये सामाजिक वस्तुस्थितीचे प्रतिबिंब पडणे हे ओघानेच आले, पण समाज आणि राजकारण यांचा संबंध एकेरी नसतो.