व्याख्यानमाला-१९९०-४ (2)

राजकारण हे विशिष्ट सामाजिक संदर्भामध्ये घडत असते आणि म्हणून सामाजिक संदर्भ जसा जसा बदलत जातो तस तसे राजकारणाचे स्वरूपही बदलत असते. भारतातसुद्धा चाळीस वर्षांपूर्वी राजकारणाचे जे स्वरूप होते तसे आज राहिलेले नाही. आपल्या भारतीय समाजामधल्या सगळ्या ब-यावाईट गोष्टींचे अधिक ठळक प्रतिबिंब राजकारणामध्ये पडायला लागले आहे. संसदेत आणि विधान सभेत निवडून येणारे लोक, त्यांची वागण्याची पद्धत आणि कार्य पद्धत, संसदेमधल्या आणि विधान सभेमधल्या परिचर्चाचे स्वरूप, राजकीय स्पर्धेचे स्वरूप हे सगळे जे सुशिक्षित आणि विशेषतः पाश्चात्य विद्याविभूषित अशा नेत्यांच्या आणि वर्गाच्या हातामध्ये होते, ते आता हळूहळू समाजातल्या खालच्या वर्गापर्यंत जाऊन तळागाळापर्यंत पोहोचल्याबरोबर तळागाळाला जे जे दिसतं ते ते सगळं आता राजकारणात दिसायला लागले. चांगल्या आणि वाईट दोन्हीही अर्थानी पण ते अधिक अस्सल भारतीय व्हायला लागले. त्याचा अस्सलपणा फार महत्वाचा आहे आणि एकापरीने त्याच्या या अस्सल भारतीयपणामध्येच त्याच्या पुढचे धोके आणि त्याची शक्ती दोन्हीही सामावलेली आहेत असे मला आग्रहाने सांगायचे आहे. भारतीय राजकारणाचा सखोल अभ्यास करणा-या एका ब्रिटिश राज्यशास्त्रज्ञाने भारतीय राजकारणावरच्या आपल्या पुस्तकात असे विधान केलेले आहे की, “नो ऑनेस्ट बुक हॅज बीन रिटन ऑन इंडियन पॉलिटिक्स” अजूनपर्यंत भारतीय राजकारणावर प्रामाणिकपणे लिहिलेले पुस्तक नाही. याच्यात त्यांना काय म्हणायचे होते ? त्यांना काही असे म्हणायचे नव्हते की, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी लिहिले ते सगळे अप्रामाणिक आहेत, त्यांना म्हणायचे होते की, ही पुस्तके वाचूनसुद्धा भारतीय राजकारणाचे खरे किंवा यथार्थ रूप आपल्याला समजलं असे वाचणा-याला जाणवत नाही. असे का होते याचे उत्तर मी मघाशी जो मुद्दा मांडत होतो त्याच्याशी आहे की, जी पुस्तके भारतीय राजकारणावर लिहिली गेली, भारतीय राज्यशास्त्रज्ञांनी आणि परकीय राज्यशास्त्रज्ञांनी लिहिली त्यांनी प्रामुख्याने राजकीय संस्थांचा संरचनात्मक दृष्टिकोन मांडला. भारतीय संसद कशी आहे? तर तिची दोन सभागृहे आहे. पहिल्याची सभासद संख्या इतकी आहे, दुस-याची सभासद संख्या इतकी आहे, त्यांच्या निवडीची पद्धत कशी काय आहे, त्यांना मिळालेले अधिकार कोणते आहेत वगैरे वगैरे. अशी ही वरवरची आणि संरचनेपुरती मर्यादित अशी तुलना झाली. पण मग भारतीय राजकारणात दिसून येणा-या घटनांचे उदाहरण द्यायचे तर पक्ष बदलूपणाचे कारण आणि त्याचे स्वरूप समजेनासे झाले. भारतीय निवडणुकीमध्ये धर्मांचा एवढा उहापोह कां होतो. जातीला एवढे आवाहन कां होते, भाषेला एवढे आवाहन कां दिले जाते, याची उत्तरेच त्यांना सापडेनात. कारण ते मुळी सांगाड्यामध्येच अडकून पडले. पण भारतीय राजकारणाचा आत्मा त्याच्यात नाही. संसद दोन सभागृहांची आहे का एक हा तुलनेने कमी महत्त्वाचा मुद्दा आहे. ती पांच वर्षासाठी निवडली जाते कां चार वर्षाकरिता निवडली जाते, यालाही फारसे महत्त्व नाही. ती ज्या सामाजिक पार्श्वभूमीवर निवडून येते, निवडणुकीच्या वेळी प्रचाराच्या मंथनामधून जे अमृत आणि जे हलाहल वर येते ते त्या समाजरूपी महासागराच्या बुडाशी बुडी मारल्याशिवाय समजत नाही आणि या अर्थाने तो तज्ञ असे म्हणतो की, नो ऑनेस्ट बुक हॅज यट बीन रिटन ऑन इंडियन पॉलिटिक्स.