व्याख्यानमाला-१९८९-४४

जोतिराव फुले नेते होते, आंबेडकर नेते होते, त्यांच्यानंतर १९५६ नंतर महाराष्ट्रात वसंतरावदादा पाटील, यशवंतराव चव्हण, बाळासाहेब देसाई नेतृत्व करीत होते. पण आज आमच्या परिवर्तनाच्या चाळवळी ठप्प झाल्या, क्षीण झाल्या आहेत. नैराश्याचं वातावरण पसरलं आहे. लोकांच्या पासून ज्ञान दूर नेण्याचा प्रयत्न आजही चालू आहे.

सरकारी महाविद्यालयातून दिल्या जाणा-या शिक्षणाचे स्वरुप सर्वसाधारण जीवनातील गरजा भागविण्याच्या दृष्टीने उपयोगी पडावे, असे व्यावहारिक नाही. कारकून आणि शिक्षक मोठ्या प्रमाणावर पैद होण्यास मात्र ते उपयुक्त ठरणारे आहे. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचेही सारे लक्ष वाजवीहून फाजील प्रमाणात मॅट्रीकच्या परीक्षेवर केंद्रीय झालेले असते. विद्यार्थ्याला त्याच्या भावी आयुष्यक्रमांक स्वतंत्र जीवन आक्रमिण्यास, लायक बनविण्यास उपयोगी पडावे असे व्यावहारिक अंगच या अभ्यासक्रमाला नसते. एकंदर देशातील ज्ञानप्रसाराचा विचार केल्यास  प्रवेश परीक्षेस बसणा-या विद्यार्थ्यांची संख्या फारशी मोठीच नसली तरी, सरकारी नोक-यांच्या गरजेचा विचार केल्यास, ही संख्या मोठीच म्हणावी लागेल. शिक्षण सार्वत्रिक आणि सर्वांच्या सहज आवाक्यातले असते, तर ही संख्या याहूनही मोठी होऊ शकली असती. यापुढील काळात ती तशी वाढावी आणि ती तशी वाढेल अशी मला अशा आहे.

उच्च शिक्षणाची व्यवस्था अशी असावी की ते घेणे सर्वांना सुलभपणे परवडावे. मॅट्रिक परीक्षेला नेमलेल्या विविध विषयांवरील पुस्तकांच्या याद्या मद्रास आणि बंगाल या प्रांतातील सरकारी गॅझेटात जशा प्रसिद्ध केल्या जातात तशाच येथेही प्रसिद्ध करण्यात याव्या. खाजगी रीतीने अभ्यास करुन परीक्षेला बसण्यास मान्यता देऊन मुंबई विद्यापीठाने जनतेला एक प्रकारचे वरदानच दिले आहे. असेचं वरदान अधिक उच्चतर परीक्षांच्या बाबतीतही विद्यापीठाचे अधिकारी उपलब्ध करून देतील, अशी मी आशा बाळगतो. बी.ए. आणि एम. ए. वगैरे पदवीपरीक्षांच्या बाबतीत खाजगी रीतीने अभ्यासाला मान्यता मिळाल्यास अनेक तरुण खाजगी रीतीने अभ्यास करण्यात आपला वेळ सार्थकी लावतील आणि त्यामुळे ज्ञानप्रसारास आणखी मोठ्या प्रमाणावर हातभार लागेल. अनेक प्रकारच्या कारणास्तव ज्यांना कॉलेजमध्ये जाऊन पुढील शिक्षण सुरु ठेवणे परवडत नाही. अशी कित्येक उदाहरणे सध्या दिसून येतात. विद्यापीठाने खाजगी अभ्यासाला  मान्यता दिल्यास एकंदर देशाचे कोटकल्याण होईल व उच्च शिक्षणाप्रीत्यर्थ सरकारी खजिन्यावर पडणारा बोजाही पुष्कळ प्रमाणात हलका होईल.

ज्ञानाच्या बाजारपेठा मांडल्या जात आहेत. दलिताचा मुलगा, चांभाराचा मुलगा, शेतक-याचा मुलगा आजही महाविद्यालयापासून दूर ढकलला जात आहे. परिवर्तनाच्या चळवळीच्या आड टी. व्ही. वाले आले, दूरदर्शनवाले आले,रेडिओवाले आले, वर्तमानपत्रवाले आले ही सगळी प्रचार माध्यमं आणि प्रसार माध्यमं प्रतिगाम्यांच्या हातामध्ये आज आहेत. उद्ववराव पाटील एकदा बोलताना म्हणाले , "या देशातील जातीयवादी प्राध्यापक जोपर्यंत मरणार नाहीत तोपर्यंत भारतामध्ये चळवळी होणार नाहीत." पण मी त्याला जोडून असं म्हणतो. आमच्या देशातील प्राध्यापक पुरोगामी, आमच्या देशातील शिक्षक पुरोगामी, पण आमच्या देशातील पत्रकारसुद्धा पुरोगामी होण्याची गरज आहे. आम्ही आता जोतिराव फुल्यांची पुण्यशताब्दी साजरी करणार आहोत. आम्ही आता १९९१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत. हे सगळं आम्ही करणार आहोत.

समाज परिवर्तनाच्या , समाज प्रबोधनाच्या आणि सामाजिक क्रांतीच्या चळवळी आम्ही समारंभामध्ये बंद केलेल्या आहेत. समारंभाच्या बातम्या येतात.  समारंभापुरते आरंभशूर राहतो. सा-या चळवळी समारंभापुरत्याच गोठल्या आहेत. लोकांपर्यंत प्रत्यक्ष लाभ पोहोचतच नाहीत. अशा प्रकारचे एक दुर्दैवी चित्र तुमच्या माझ्या समाजात आज आहे. अशा वेळी दलितांचा कैवारी, स्त्रियांचा उद्धारक, महाराष्ट्रातील पहिली कामगार संघटना बांधणारा, कार्लमार्क्सचा जाहीरनाम प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणारा, भारताचा आर्थिक, सांस्कृतिक 'कॉर्लमार्क्स' असे  जोतिराव फुले आज हवे होते. कार्लमार्क्स यांची प्रेतयात्रा निघाली तेव्हा दहा माणसं सुद्धा नव्हती. आणि कॉर्लमार्क्सच्या मृत्यूची बातमी एकाही वृत्तपत्राने छापली नाही पण आज १९८३ साली तुम्ही पाहिलं, अर्ध जग कार्लमार्क्सच्या विचाराचा गजर करुन दुमदुमत आहे. अर्धी पृथ्वी समाजवाद लोकशाही, स्वातंत्र्य आणि नवमानवतावादाचा आग्रह धरून राज्य करते आहे.