व्याख्यानमाला-१९८९-४२

शेतकरी, शेतमजूर आणि दलीतांच्या स्त्रिया शौचासाठी उकिरड्यावर आणि रस्त्याच्या कडेला आजही बसतात. ही बाब आमच्या स्वातंत्र्याला लाजेनं मान काली घालायला लावणारी आहे. " मुलं म्हणजे देवाचं देणं" मुलींना जीवनभर भाकरी तर बडवायच्या आहेत. मग त्यांना शिकवाच कशाला" अशा अंधश्रद्धा आणि खुळचट परंपरा सांभाळत तो आपलं जीवन कसंबसं जगतो आहे. निकृष्ट दर्जाचं जीवनमान असं म्हणण्यापेक्षा त्याला जीवनमानच राहिलेलं नाही. रोजगार हमी शिवाय रोजगार नाही, पशुतुल्य कष्टाशिवाय पर्याय नाही, त्यांच्या स्त्रियांना माणूसपणाचा दर्जा नाही. घरादारात स्वच्छता नाही. मानवी जीवन कसं असू नये याचे उदाहरण म्हणून त्यांच्या जीवनाकडे बघता येईल. हा अज्ञानी दोन बैलापाठीमागील तिसरा बैल. तिस-या बैलाच्या दर्जाचा जसा मानवी पशू म्हणूनच जगतो आहे. पूर्वीच्या तुलनेनं ग्रामीण भागात व्यसनाधीनता वाढलेली आहे. दारु गुत्त्याच प्रमाण वाढलेलं आहे. पण उत्पन्न मात्र वाढत नाही ही शोकांतिका आहे.

आजही ग्रामीण भागात अस्पृश्यता आहे. अस्पृश्यांची हलाखीची स्थिती आहे. त्यांच दारिद्रय आणि त्यांची दु:ख इतर माणसांप्रमाणे माणसांचे हक्क देऊन दूर करण्याची आजही गरज आहे. पेशवाईतील निर्दयतेसारखीच नवी राजकीय निर्दयता त्यांच्या डोक्यावर टांगत्या तलवारीसारखी आहे. शेतकरी, दलित आणि अस्पृश्य यांचा कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे. दारू पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे.  त्यामुळे त्यांची दु:खं आणि समस्या वाढत चाललेल्या आहेत. जोतिराव फुले म्हणतात. "नगरपालिकेने बराच पैसा खर्च करुन लोकांचे आरोग्य सांबाळण्याच्या उद्देशाने बराच मोठा नोकरवर्ग नेमला आहे. लोकांचे आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टीने तसे एक खाते सुद्धा चालवीत आहे. तथापि ज्या पुणे शहराला दारुचे गुत्ते परिचित नव्हते, त्यात आता भरवस्तीत दारू गुत्ते उघडल्यामुळे लोकांच्या नैतिक  अध:पाताची सर्व बीजे पेरली जात आहेत. त्यामुळे शहराचे आरोग्य सांभाळणे हा जो नगरपालिकेचा एक उद्देश आहे, त्याला बाधा येत आहे.

"दारूचे व्यसन हे नागरिकांच्या नैतिक आचरणाला बाधक आहे. एवढेच नव्हे  तर त्यांच्या आरोग्यालाही अतिशय अपायकारक आहे. हे माझे म्हणणे बहुतेक लोक आपखुषीने मान्य करतील. दारुचे गुत्ते शहरात उघडल्यापासून दारूबाजी इतक्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे की, त्यामुळे अनेक कुटुंबांचा संपूर्ण नाश झाला आहे. आणि ह्या दुर्गुणाला आता शहरात सराईतपणा आला आहे."

" ह्या व्यसनाच्या प्रसारात काही प्रमाणात तरी आळा बसावा, म्हणून मी नगरपालिकेला अशी सूचना करतो की, नगरपालिकेने या दारू गुत्त्यांवर ते  ज्या प्रमाणात हानी करतात, त्या प्रमाणात कर बसवावा. मला असे कळते की, कुठल्याही  नगरपालिकेने अशा गुत्त्यांवर कर बसविलेला नाही. मात्र त्याच्यावर मध्यवर्ती सरकारचा कर असतो. या बाबतीत आवश्यक तर नगरपालिकेने चौकशी करावी. माझा हा ठराव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवल्यास मी आभारी होईन." जोतिराव फुल्यांचे वरील विधान आजही अंमलात आणण्याच्या दर्जाचे आहे.

ग्रामीण भागातील दलित शेतकरी स्त्री पुरुषांना आमच्या आर्थिक नियोजनांने वा-यावरच सोडलेलं आहे. स्वातंत्र्यांच्या ४२ वर्षात काही चांगलं झालं नाही असं मला म्हणायचं नाही. आमच्या अधिक अपेक्षा वाढविण्याइतकं थोडं फार यश आमच्या स्वातंत्र्याला आलेलं आहे. मात्र ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, स्त्री कामगार, वाड्यातांड्यांवर राहणारे आदिवासी त्यांच्यापासून आमच्या स्वातंत्रयाचे लाभ दूर राहिलेले आहे. त्यांच्या मुलामुलींना शिक्षण नाही. चांगल्या शाळा नाहीत, शिकवायला चांगले शिक्षक नाहीत, पुरसे खडू फळे नाहीत. आवश्यक तेवढे शालेय साहित्य नाही. मुलांमुलींना खेळण्यास अद्यावत क्रीडांगणे नाहीत. गावापर्यंत ग्रंथ पोहोचत नाही. गावाला ग्रंथालय नाही. ज्ञान संस्कृतीपासून आमचं शेतीजीवन असं दूर भरकटलेलं आहे. आमच्या खेड्यात थोडेफार रस्ते आता पोहोचत आहेत. निवडणूकीच्या प्रचारासाठी पुढा-यांना आपल्या गाडीनं जाता यावं यासाठी रस्ते झालेत हे चांगले झाले. आमच्या शेतीजीवनातील स्त्री पुरुष सांस्कृतिक जीवनापासूनदूर उन्हात जवळ आहेत. आणि आमच्या राज्यकर्त्यांच्या मतदानाचं शेत म्हणून ते जगत आहेत.