व्याख्यानमाला-१९८७-२ (38)

यावरून आपल्याला असे दिसते की, इतिहास हा काही निवडक घटनांचा संग्रह असतो आणि इतिहासकार इतिहासात घडलेल्या असंख्य घटनातून त्यांची निवड करीत असतो. परंतु या ठिकाणी पुन्हा असा प्रश्न विचारता येईल की, इतिहासकार काही विशिष्ट घटनांचीच निवड कशी करतो. या प्रश्नाचे उत्तर बेन्डेटो क्रोसे यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या मताप्रमाणे सर्व इतिहास हा ‘ समकालीन इतिहास ’ असतो. त्यांना  ‘समकालीन इतिहास ’ म्हणजे असे म्हणावयाचे आहे की, इतिहास लेखनात ज्या घटनांचा समावेश असतो त्या घटनांच्याकडे आणि भूतकाळाकडे इतिहासकार आपल्या काळातील समस्या आणि आपल्याच काळातील दृष्टीने पहात असतो.  त्यामुळे इतिहासकारांचे काम केवळ नोंदी करणे एवढेच मर्यादित नाही. त्याने केवळ घटनांची जंत्री करावयाची नसते. तर तो त्याला गवसलेल्या अनेक घटनांचे मूल्यमापन करतो आणि त्यानंतरच कोणत्या घटनांच्या नोंदी करून त्यांना ऐतिहासिक घटना मानावयाच्या व कोणत्या वगळायच्या हे तो ठरवीत असतो. क्रोसे म्हणतात ते जर खरे असेल तर मग इतिहासकाराने ‘ निर्लेप व निरहंकारपणाने इतिहासाचा विचार करावयाचा असतो ’ हे म्हणणे किंवा ‘ अमूक एका इतिहासकाराने केलेले लिखाण पूर्वग्रहरहित आणि निरहंकारी पध्दतीने केलेले आहे ’ या म्हणण्याला काय अर्थ शिल्लक रहातो. इतिहासातील घटनांचे मूल्यमापन केल्याशिवाय कोणत्या घटना नोंदी करण्याच्या लायकीच्या आहेत हे जर इतिहासकाराला कळूच शकत नसेल आणि हे मूल्यमापन जर तो स्वत:च्या मनाप्रमाणे आपल्या काळातील समस्या आणि दृष्टी घेऊन करीत असेल तर ते मूल्यमापन पूर्वग्रहरहित आणि निरहंकारी पध्दतीने होऊ शकेल काय ? मला वाटते त्यासाठी इतिहासकाराला परमेश्वराचाच अवतार घ्यावा लागेल.
 
आज जे इतिहासकार मग ते लेखनासंबंधी कोणता का दृष्टीकोण मानीत असेनात त्यांच्या लेखनात घटनांचे मूल्यमापन झालेलेच असते. ते मूल्यमापन चूक किंवा बरोबर असू शकेल परंतु ते अटळच असते. नाहीतर त्यांचा इतिहास केवळ घटनामची जंत्री बनला असता. माहितीचे ओझे झाला असता. पण इतिहासकार तर ते तसे होऊ देत नाही. त्याला आपला इतिहास वाचकांनी वाचावा असे वाटत असते. त्यासाठी तर तो त्याने निवडलेल्या घटनांची व्यवस्थित मांडणी करीत असतो. याचा अर्थ माहितीचे ओझे किंवा घटनांची जंत्री असे स्वरूप असलेले इतिहास लेखन आजिबात अस्तित्वात नाही असे नाही. तसे ते आहेतही.

आज आपल्यासमोर जे इतिहासलेखन आहे ते सारे आपल्या बखरकारांच्या आणि राजदरबारी नोंदी करणा-या मानक-यांच्या आधारावर केलेले आहे. त्या बाहेर जाऊन ऐतिहासिक घटना शोधण्याचा फार क्वचित प्रयत्न झालेला आहे. त्याच बरोबर आधुनिक इतिहासकारांनी आपापल्या कालखंडाच्या दृष्टीने या ऐतिहासिक घटनांच्याकडे पाहिलेले आहे. ज्या कालखंडात समाज जीवनात सतत धार्मिक, सामाजिक आणि राजकीय तणाव असतात त्या तणावांचे प्रतिबिंब इतिहासकाराच्या दृष्टीत उतरणारच नाही याची शाश्वती नसते. असे इतिहास लेखन जेव्हा होते त्यावेळी अभिनिवेशाला उधाण येते किंवा तो सुप्त स्वरूपातही पेरला जातो. एकाच ऐतिहासिक घटनेचे दोन परस्पर विरूध्द अर्थ लावता येतात. त्यामुळे इतिहास हा स्वत:च एक समंध नाही तर इतिहातकारांनी त्याला समंध बनविलेले आहे.