व्याख्यानमाला-१९८७-२ (31)

ज्याला आपण अनुभववादी ज्ञानसिध्दांत किंवा इंपिरिकल थिअरी ऑफ नॉलेज म्हणतो त्याच्यात ज्ञाता म्हणजे सबजेक्ट आणि ज्ञेय म्हणजे ऑब्जेक्ट यांच्यातील पूर्ण फारकत गृहीत धरलेली असते. ज्ञान मिळवू इच्छिणारा आणि ज्याचे ज्ञान करून घ्यावयाचे ते जे काही असेल त्यात पूर्ण फारकत गृहीत धरलेली असते. तसे केले नाही तर ‘ वस्तुस्थितीचा निरीक्षकाच्या जाणीवेशी कोणताही संबंध नसतो ’ हे अनुभववादाचे मुख्य सूत्र स्वीकारताच येणार नाही. वस्तुस्थिती पूर्णपणे स्वतंत्र असते असा अनुभववादाचा दावा आहे. निरीक्षक अगदी निर्विकारपणे वस्तुस्थिती गोळा करतो, आणि नंतर तिची व्यवस्थित मांडणी करतो. इतिहासासंबंधी हा सामान्य दृष्टीकोण आहे. याचाच अर्थ इतिहास हा घडलेल्या घटनांचा संग्रह असतो. या घटना इतिहासकाराला विविध कागदपत्रावरून, शिलालेखावरून अथवा अन्य साधनावरून उपलब्ध होऊ शकतात. इतिहासकाराचे काम त्या घटना एकत्रित करणे आणि त्यांची व्यवस्थित मांडणी करणे हे आहे. इतिहासाचार्य राजवाड्यांचे जे विचार आपण पाहिले त्यावरून रांकेचा त्यांच्यावर किती प्रभाव होता हे स्पष्ट होऊ शकते.

‘ इतिहास म्हणजे घडलेंल्या घचनांची विश्वसनीय हकीकत ’ असे जेव्हा मानले जाते त्यावेळी आपण असा प्रश्न विचारू शकतो की, इतिहास लेखनात ज्या घटना समाविष्ट झालेल्या आहेत त्या व्यतिरिक्त त्यासमकाली आणखी काही घटना घडल्याच नव्हत्या का? जर त्या घडल्या असतील तर इतिहास लेखनात समाविष्ट झालेल्या घटनाच का निवडल्या आणि बाकीच्यांच्याकडे दुर्लक्ष का झाले ?  वस्तुस्थिती अशी आहे की, गतकाळ हा अनंत घटनांनी विणलेला असतो. या सर्वच घटनांची कोणालाच केव्हाच नोंद करता आलेंली नाही. आपम छत्रपती शिवाजींचे याधृष्टीने उदाहरण घेऊ शकतो. छत्रपती जन्मल्यापासून तो त्यांचा मृत्यु होईपर्यंत जो काळ लोटला त्या काळात स्वत:छत्रपतींच्या जीवनात आणि ते ज्या विभागात वावरले त्या विभागात अनंत घटना घडलेल्या असतील. शिवाजीवर लिहिला गेलेला कोणताही इतिहास आपण वाचून पाहिला तर या सर्वच घटनांच्या नोंदी आपल्याला सापडू शकतील काय ? तसे केले असते तर शिवरायांचे सारे किल्ले घटना नोंदविलेल्या कागदांच्या दप्तरांनी भरावे लागले असते . शिवरायांचा जो भला बुरा इतिहास इतिहासकारांनी लिहून ठेवला आहे, त्यात छत्रपतींच्या समकालीन अन्य घटना तर सोडाच परंतु खुद्द त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटनेची नोंद झालेली आहे असा इतिहास कोणी लिहिलेला आहे काय ? शेजवलकरांनी तसा प्रयत्न केलेला दिसतो. शिवाजीच्या कोणत्याही चरित्र लेखकाने जे काम केले नाही ते शेजवलकरांनी करण्याचा प्रयत्न केला. शिवाजीच्या एकूण आयुष्याचा तपशिल त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. शिवाजीचे एकूण आयुष्य १८३०६ दिवसांचे होते हे शेजवलकर सांगतात. परंतु या दिवसांचा तासवार तपशील कोणाला देता येईल काय ? या काळातही अनेक घटना घडून गेल्या असण्याची शक्यता आहे. शेजवलकर फारच झाले तर शिवाजी प्रत्यक्ष युध्दभूमीवर किती दिवस होता आणि किती लढाया त्याच्या नावावर चालल्या होत्या, अगदीच खोलात शिरायचे ठरलें तरी ‘ रायगडावरून बसरूरच्या स्वारीस शिवाजी जेव्हा निघाला त्यावेळी सोयराबाईला ऋतु प्राप्त झाला. म्हणून समागमे शिवाजीने स्त्रीची पालखी घेतली. मालवण सिंधुदुर्गपावेतो त्याने पत्नी सह बाळगली व मग परत पाठवून दिली ’ इथपर्यतचे तपशील शेजवलकर देवू शकतात परंतु शिवरायाच्या प्रत्येक क्षणाचा तपशील कोणालाही देता येणे शक्य नाही.