व्याख्यानमाला-१९८७-२ (32)

आज एखाद्याला छत्रपतींचे नव्याने ऐतिहासिक चरित्र लिहावयाचे असले तरी हा लेखक इतिहासाची जी जी माहिती मिळवील ती सर्वच काही तो या नव्या इतिहासात समाविष्ट करू शकणार नाही. त्यापैकी त्याला जी माहिती योग्य वाटेल तिचाच तो उपयोग करील जीवनात आणि त्याच्या अवती भवती असंख्य घटना घडलेल्या असतांनासुध्दा हा लेखक फक्त त्याला आवडलेल्या,योग्य वाटलेल्या निवडक घटनाच बाजूला काढील आणि त्यांची मांडणी करील. त्याला आपण इतिहास म्हणू आणि उद्याचे इतिहासकार याच लेखनाचा अभ्यास तरून त्यांना हव्या तेवढ्याच घटना आपल्या लेखनात  वापरतील. याचा सरळ अर्थ असा आहे की, गतेतिहासात ज्या अनंत घटना घडत असतात त्या सर्वांच्याच नोंदी काही इतिहास लेखनात होऊ शकत नाहीत. फार थोड्या घटनांच्या नोंदी इतिहास लेखनात इतिहासकार करीत असतो. त्याच्या दृष्टीने ज्या घटनांच्या नोंदी तो करतो त्या ऐतिहासिक घटना असतात व त्याच्याकडून ज्या घटना वगळल्या जातात त्यांना ऐतिहासिक घटना मानले जात नाही इतिहासकार आपले इतिहास लेखन करतांना ज्या घटनांची निवड करीत असतो तो त्या घटना घडलेल्या असतात म्हणून नव्हे, मग तशा तर ज्यांची नोंद नसते त्याही घडलेल्याच घटना असतात. तर त्या घटनांची नोंद करणे त्याला आवडले, योग्य वाटले म्हणून त्यांची नोंद त्याने केली. हा त्याच्या मर्जीचा भाग आहे. घडलेल्या असंख्य घटनापैकी कोणत्या घटनांचा दर्जा घ्यायचा याचे सर्व स्वातंत्र्य इतिहासकाराला असते. म्हणूनच कार सारखे इतिहास मीमांसक ‘ वास्तव घटना स्वत:च बोलक्या असतात,’ ‘ फॅक्टस् स्पीक देमसेल्वज् ’ हा इतिहास लेखनातील एक सवंग प्रकार असून तो खरा मानीत नाहीत. या उलट घटना त्याच वेळी बोलू शकतात ज्यावेळी इतिहासकार त्यांची इतिहासलेखनात ऐतिहासिक घटना म्हणून निवड करीत असतो. यासाठीच एकीकडे घटना बोलती करण्याचे इतिहासकारावर अवलंबून असते तर दुसरीकडे या घटनांना इतिहासकाराच्या स्पष्टीकरणाबाहेर वस्तुनिष्ठ, स्वतंत्र अस्तित्व असते या म्हणण्याला विसंगत युक्तिवाद, प्रीपॉश्चरस फॅलसी मानतात. हा विसंगत युक्तीवाद दूर करणे हे काही इतिहासकार समजतात तितके सोपे काम नाही.

याचा अर्थ असा आहे की, एकीकडेल आपण इतिहासातील घटनांना स्वतंत्र अस्तित्व असते असे मानणार आणि दुसरीकडे त्या घटनांचे नशीब इतिहासकारावर सोपविणार. ही विसंगती तर खरीच. या विसंगतीतून एक मार्ग इतिहासकारांनी काढलेला दिसतो. तो असा आहे की, इतिहासात काहीं मूलभूत स्वरूपाच्या ऐतिहासिक घटना असतात असे त्यांनी गृहीत धरले. या ऐतिहासिक घटनांना सर्वच इतिहासकारांची मान्यता असते असे मानले. या ऐतिहासिक घटनांनाच इतिहासाचा कणा केले. त्याबाहेर इतिहासकारांनी  विचारच करावयाचा नाही असे ठरविले. याचा परिणाम इतिहास लिहिणे, इतिहास शिकविणे आणि इतिहास शिकणे म्हणजे काय करणे तर इतिहासकारांनी एकमुखाने ज्या ऐतिहासिक घटनांना मान्यता दिलेली असते होय.