परंतु शेजवलकर आपल्याला आणखी एक महत्वाचा विचार सांगतात आणि तो म्हणजे “ माणसाच्या कृतीपेक्षा त्यामागील तत्वज्ञानाची छाननी आम्ही जास्त कसोशीने करतो ” याचा अर्थ इतिहासात जी एखादी कृती घडते ती तशी का घडली, तिच्यामागे कोणते तत्वज्ञान आहे हे समजावून घेण्यात शेजवलकरांना अधिक रस आहे. शेजवलकरांचे हे म्हणणेही आपल्यापैकी काही लोक मान्य करतील परंतु ते सुध्दा निर्विवाद नाही आहे. त्यातूनही अनेक प्रश्न उदभवतात आणि त्यांचीही उत्तरे शोधावी लागतील. परंतु त्याच बरोबर आपण स्वत:लिहिलेला इतिहास हा ख-या निर्लेप आणि निरहंकारी मनाने लिहिलेला आहे असा शेजवलकरांचा दावा आहे. शेजवलकर लिहितात “ अनेक चित्पावनांचे आमच्याबद्दल काय मत आहे हे आम्ही नानासाहेब पेशव्यांच्या चरित्राला प्रस्तावना लिहिल्यापासून पुढे आलेलेच आहे. खरे पाहू जाता आमची भूमिका ख-या इतिहासकाराची असल्यामुळे आम्ही प्रत्येक बाबतीत निर्भय, निरहंकार असतो. ‘रात्रौ मित्रे पुत्रे बंधी मा कुरू यत्नं विग्रहसधौ । भव समचित्त सर्वत्र त्वम् ।’ अशी दृष्टी आम्ही ठेविली आहे. आमच्या समोर येणा-या प्रत्येक व्यक्तीला किंवा गोष्टीला तिचे यथायोग्य स्थान मिळवून देणे एवढेच आमचे काम आहे. असे करितांना अनेकांच्या दृढ समजुतींना धक्का देण्याची पाळी आमच्यावर येते, अनेकांच्या अभिमानाला झोंबणा-या गोष्टी आम्हास पुढे मांडाव्या लागतात त्याला आम्ही काय करणार ? इतिहासकाराचे कर्तव्य असेच अत्यंत खडतर व कडू आहे ” शेजवलकरांचे हे आत्मनिवेदन किती प्रामाणिक होते हे त्यांचे जीवन आणि लेखन ज्यांनी पाहिले आहे त्यांना त्याबद्दल अधिक सांगण्याची गरज नाही.
वरील विवेचनावरून आता आपण इतिहास लेंखनासंबंधी काही प्रश्न उभे करू शकतो. यापैकी पहिला प्रश्न असा आहे की, वर्तमानक्षणाच्या पाठीमागील गतकाली पृथ्वीवर अस्तित्वात असणा-या सर्व जुन्या आणि नव्या समाजाच्या सर्व त-हांच्या उलाढालीची साद्यंत आणि विश्वसनीय हकीकत इतिहास लेखनात समाविष्ट करता येणे शक्य आहे का ? जर शक्य असेल तर तशा प्रकारचा इतिहास का लिहिला गेला नाही आणि शक्य नसेल तर इतिहास लेखनात ते का शक्य होत नाही.? दुसरा प्रश्न असा विचारता येईल तो असा की, घडलेल्या घटनांची हकीकत खरोखरच विश्वसनीय असते का ? ती कोणाच्या दृष्टीने विश्वसनीय ? इतिहासकाराच्या की इतिहास वाचकाच्या ? इतिहासकाराचे मन खरोखरच निर्लेप आणि निरहंकारी, पूर्वग्रहरहीत असे को-या पाटीसारखे असू शकते काय ? तिसरा प्रश्न इतिहास खरोखरच वर्तमानकाळ समजावून घेण्यासाठी लिहावयाचा असतो काय ? तसे केले तर ज्या ऐतिहासिक घटना इतिहास लेखनात येंतील त्या विश्वसनीय असू शकतील का ? कीं त्यांच्यावर वर्तमानकाळाचे संस्कार झालेले असतील. चौथा प्रश्न इतिहासकाराने घडलेल्या घटनासंबंधी त्या मागील तत्वज्ञान पाहणे योग्य आहे काय ? म्हणजेच ऐतिहासिक घटनांचे मूल्यमापन करून आपला दृष्टीकोन मांडणे योग्य आहे का ? पाचवा प्रश्न इतिहास लेखनात नीतीतत्वाचे नेमके स्थान काय ? सहावा प्रश्न भूतकाळातील घटना कशा क्रमाने घडल्या हे सांगताना जे कालाचे पौर्वापर्य लावायचे व प्रसंगांचे कार्यकारणत्व सिध्द करावयाचे असते ते कोणतीही तात्विक भूमिका न घेता शक्य आहे काय? आणि सातवा प्रश्न इतिहास जर एक विज्ञान असेल तर त्याचे स्वरूप कसे आहे ? या सारखे प्रश्न आणखीही काही उरस्थित करता येतील परंतु त्याची आवश्यकता नाही. ते विवेचनाच्या ओघात आपोआपच निर्माण होतील. या ठिकाणी या सर्वच प्रश्नांची उत्तरे आपण शोधणार नाही. इतिहास लखन कसे होते एवढ्या प्रश्नाच्या मर्यादेतच आपण ही चर्चा करू.