व्याख्यानमाला-१९७६-४

आणि म्हणून मी असं म्हणेन की भारतीय समाजाच्या परिवर्तनाची दिशा काय असेल याचा विचार केवळ स्वातंत्र्यानंतर झाला नाही तर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये यच्चयावत स्त्री पुरुषांनी भाग घेतला होता. कॉलेजातल्या मुलींनी कॉलेजं सोडली, स्त्रियांनी घरेदारे सोडली व त्याही गोळ्या झेलण्यासाठी रस्त्यावर आल्या पुरुष तर आघाडीवर होतेच. परंतु सर्व थरांतील आबालवृध्दांना एकत्र गुंफणा-या लोकशाहीचे एक नवे तत्वज्ञान या सर्व थरांतील चळवळीच्या रूपाने या देशामध्ये तायार झाले. त्याचा उपयोग स्वातंत्र्यानंतर जी प्रजासत्ताक तत्त्वप्रणाली आपण स्वीकारली त्याला काही निश्चित रूप व गती देण्याच्या दृष्टीने आपल्याला झाला. मी त्या इतिहासामध्ये खोलात शिरू इच्छित नाही, माझ्या विषयाचा संदर्भं हा सद्य:स्थितिगतीशी नसल्यामुळे, माझ्या विषयाचा बराचसा ऊहापोह पुढल्या काळाशी निगडित असेल परंतु वर्तमान कालाचे धागे हे नेहमीच भूतकालाशी जोडलेले असतात आणि या भूतकालाचा संदर्भ विसरून आपणाला भविष्याचा अर्थ लावता येत नाही. आणि म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचे काय करायचं, या समाजाच्या परिवर्तनाचं निश्चित स्वरूप काय असेल, हा समाज निश्चित कोठे नेऊन आपल्याला पोहोचवायचा आहे. या संबंधीचा जो विचार झाला तो त्या विचाराचे जे वेगवेगळे दृष्टीकोन आहेत, जे वेगवेगळे असे थर आहेत. त्यांच्या मी माझ्या  भाषणामध्ये ऊहापोह करणार आहे आणि त्या दृष्टीने आपला समाज आज कोठे जाऊन पोहोचला आहे यासंबंधी माझे जे विचार जे अजूनही अपरिपक्वच असल्याचे मी मानतो, ते मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.

मी तुमच्या या पूर्वी झालेल्या व्याख्यानमालेतील भाषणे वाचली आणि मी पाहिले की लोकशाही, समाजवाद अशा प्रकारचे जे वेगवेगळे राजकीय विचार आहेत त्या संबंधीची मूलभूत बैठक या पूर्वीच्या व्याख्यानांनी तयार झालेली आहे. आणि कदाचित माझ्या भाषणामध्ये त्याची पुनरावृत्तीही होईल. सर्व भारतीय समाजाच्या पुनरुज्जीवनामध्ये, पुनर्रचनेमध्ये वा परिवर्तनामध्ये निश्चित असलेली तत्त्वे आणि त्या तत्त्वांचा तपशीलवार विचार या पूर्वीच्या वक्त्यांनी केलेला आहे. अर्थात तुम्ही त्या वेळी हजर असाल वा नसाल मला त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. भारतीय समाजाच्या परिवर्तनासंबंधाने ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी भारतीय समाज निश्चित काय होता आणि आज तो काय आहे, हे ज्या वेळी आपण अवती-भोवती पाहतो, त्यावेळी आपणाला समजायला लागते.

माझ्या सारखा मनुष्य १९४७ साली ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी अगदीच लहान होता पण लहान असला तरी उघड्या डोळ्यांनी सगळं जगं पहात होता. त्या वेळचा उत्साह, त्या वेळची जी आत्मप्रेरक अशा प्रकारची उर्मी, होती त्याचं दर्शन अत्यंत जवळून घेतलं असल्यामुळे त्या वेळचं जीवन किती संकुचित किती आक्रसलेले डबक्याप्रमाणे साकळलेलं होतं, हे प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभवलेलं असल्यामुळे आज मुक्त झालेल्या, विविध अंगांनी फुलणा-या, विचारांना गती देणा-या, अशा जीवनांच ज्या वेळी परस्पेक्टिव्हने (Perspective), काही एका विशिष्ट सम्यक्, दृष्टिकोनातून पहातो – त्यावेळी नाही म्हटलं तरी माझ्या सारख्या मनाला सानंद आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. पण हे आश्चर्य वाटत असतानासुध्दा कुठेतरी एक असमाधानाची जाणीव मनाला पोखरत रहाते. कुठेतरी कसलीतरी खंत जाणवत राहते. ही परिवर्तनाची निश्चित दिशा ठरविल्यानंतर जी मूल्ये आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारली होती ती मूल्यं ख-या अर्थानं आपल्या जीवनामध्ये उतरली काय ? या प्रश्नाचे उत्तर शोधताना, नाही म्हटलं तरी, मन थोडेसे खिन्न होते, त्याचा उल्लेख मी नंतर करीन. उदयाच्या व्याख्यानाचा बराचसा भाग हा यावरच आधारलेला असेल.