बाह्य सुरक्षितता : अंतर्गंत सुरक्षिततेप्रमाणे बाह्य सुरक्षिततेवरही लक्ष दिले पाहिजे. आपल्या परराष्ट्र नीतीचे सूत्र अलिप्तवादाचे आहे. अलिप्तता याचा अर्थ आपण अलिप्त राहावे असा नव्हे व ते शक्यही नाही. आपल्या अलिप्ततेत शांततेचे ध्येय आहे. अलिप्तता हे सूत्र आहे म्हणून काही करावयाचे नाही असे नाही. आपण समर्थ झाले पाहिजे. समर्थता दडपशाहीला निमंत्रण देते. जेथे लोकशाही आहे अशा ब्रिटननेसुद्धा अनेक लोकांना दडपलेले आहे. अमेरिकेसारख्या लोकशाही राष्ट्रानेसुद्धा निग्रोवर दडपशाही केली आहे. अशा राष्ट्रांचा डिगो गार्शीया यामध्ये नाविक तळ निर्माण करण्याचा मानस आहे. हिंदी महासागराला मादागास्कर नाव देण्याचा मानस आहे. ही चीड आणणारी गोष्ट आहे. यासाठी आपण समर्थ झाले पाहिजे. सत्य ही अत्यंत उत्तम गोष्ट आहे. पण त्याला शक्तीची जोड हवी. आपल्याला सत्याबरोबर समर्थता हवी.
आणखी अनेक गोष्टींचा ऊहापोह करण्यासारखा आहे. पण मला ज्या फार महत्त्वाच्या वाटल्या त्या गोष्टी ही प्रामुख्याने आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अनेक गोष्टी त्रोटक स्वरुपात सांगितल्या. प्रत्येक गोष्ट विश्लेषण करीत सांगत बसल्यास त्यास खूप अवधी दिला पाहिजे. असो.
भवितव्य : आपल्यापुढील आव्हानांचा, अडचणींचा, प्रश्नांचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे व आपला देश सुदृढ, संपन्न, समर्थ, सुंदर केला पाहिजे. भारतीय लोकशाहीचे भवितव्य उज्ज्वल आहे. आम्हा भारतीय लोकांजवळ समुजतदारपणा, सूज्ञपणा, संयम आहे. योग्य विचार आहे. चांगल्या गोष्टींचा निवाडा आहे.
भारतीय लोकशाहीचा आशय१० पद्धत आणि त्यापुडे असणा-या समस्या व आव्हाने या गोष्टी मी आपल्यापुढे मांडल्या. आपण माझे भाषण शांतपणे ऐकून घेतले याबद्दल मी आपला आभारी आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१० लोकशाहीमध्ये लोकांचे जास्तीतजास्त हित, स्वास्थ्य, सुख अभिप्रेत आहे. हे कोणीतरी द्यावयाचे नसून लोकांनीच निर्माण करावयाचे आहे. त्यासाठी त्यांच्या सर्जनशक्तीला, स्वातंत्र्य व समतेची पोषक मूल्ये आहेत. राजकीय सत्तेस कायद्याच्या चौकटीत बसवून लोककल्याण साधून देशाची उन्नती साधणे हा एकूण आशय आहे. यामध्ये सर्वांचेच सुख समाधान आहे. सर्व दलितांचे, आदिवासींचे, गरिबांचे जीवन सुधारले पाहिजे.
दारिद्रयामध्ये सर्वांत जास्त हाल होतात ते अजाणबालकांचे, वृद्धाश्रम, गरिबाश्रम, बालकाश्रम, धर्मशाळा बांधूनही सर्व थरांतील असहाय्य गरिबांचे जिणे सुसह्य केले पाहिजे. दारुण गरिबीचा प्रश्न सोडविलाच पाहिजे.
आणखी एक गोष्ट आपल्याकडे उपेक्षित आहे. आपल्याकडील भंगीपद्धती पूर्वापार चालत आलेली तीच आहे. मोठ्या शहरातील ड्रेनेज पद्धतीचा अपवाद सोडला तर सर्वत्र जुनी रीत अबोलपणे चालू आहे. यासाठी पाश्चात्य देशातील आधुनिक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. ही दु:खदायी पद्धत पूर्ण नष्ट केली पाहिजे.
आपल्याकडील ब्रिटिशकाळातील असलेले तुरुंग नष्ट करून तेथील जीवनही सुधारले पाहिजे. मानवतेची भूमिका असली पाहिजे. या सारख्या गोष्टी बारीकसारीक वाटून दुर्लक्षिल्या जातात. पण लोकशाहीत मानवी मूल्ये जपणे आवश्यक असल्याने कोणतेही सामाजिक दु:ख हलके मानण्याचे व उपेक्षिण्याचे कारण नाही.