व्याख्यान दुसरे - दिनांक : ११-३-१९७४
विषय - "लोकशाही आणि समाजवाद"
व्याख्याते - श्री. वि. अ. नाईक, न्यायमूर्ती, पुणे.
बंधू-भगिनींनो,
मा. यशवंतराव चव्हाण यांच्या ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगरपालिकेच्या नगरवाचनालयातर्फे हे जे ज्ञानसत्र आपण सुरु केले आहे; त्यामध्ये सहभागी होण्यास मला खरोखरच अतिशय आनंद होत आहे. आपल्याला आताच सांगितल्याप्रमाणे यशवंतराव हे एकेकाळच्या काँग्रेसमध्ये म्हणजे रॅडिकल डेमोक्रॅटीक पार्टी जी होती त्या पार्टीमध्ये असत. आणि पुढे सुद्धा ज्याला एक स्पिरिट ऑफ डेमोक्रॅटिक थॉट म्हणतात तशी अगोदरचीच रॉयवादी विचासरणी यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये सतत रहात आली आहे. म्हणून आपल्यापैकी काही लोकांना आठवत असेल की मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची अहमदाबादला जी दोन व्याख्याने झाली त्या वेळेला त्यांनी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला की मी रॉय यांचा शिष्य आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी मला विशेष प्रकारचा आनंद होत आहे.
आजच्या व्याख्यानाचा विषय लोकशाही समाजवाद असा आहे. लोकशाही समाजवाद हा शब्दप्रयोग देशाच्या कानाकोप-यामध्ये दुमदुमून राहिला आहे. ज्याप्रमाणे एखादे नाणे चलनामध्ये असणारे आणि सारखे फिरत राहाणारे हे नाणे सतत वापरल्याने गुळगुळीत होते आणि त्या नाण्याच्या मुद्रा या अस्पष्ट पुसटपुसट अशा दिसायला लागतात. तशीच काहीशी स्थिती या लोकशाही समाजवाद या शब्दप्रयोगाची आहे. लोकशाही समाजवाद याचा अर्थ लोकशाहीची सुसंगत असेल तो समाजवाद. जो समाजवाद लोकशाहीच्या चौकटीत बसू शकेल. ज्या समाजवादाची पूर्तता लोकशाही मार्गाने होऊ शकेल. संसदेमध्ये कायदा पास करुन आणि अन्य मार्गाने होऊ शकेल. अशा समाजवादाला सामान्यपणे लोकशाही समाजवाद असे म्हणतात. याचाच दुसरा अर्थ असा की लोकशाही समाजवादाहून अन्य प्रकारचे भिन्न समाजवाद उपलब्ध आहेत. जगामध्ये अशाप्रकारचे विचारप्रवाह आहेत. लोकशाही समाजवाद हा एक जागतिक प्रवाह आहे. आपण तो आपल्या देशात तयार केलेला नाही. त्याप्रमाणे इतर त-हेने समाजवादासुद्धा अशांचा उल्लेख मी पुढे करणार आहे ते सुद्धा जगामध्ये निरनिराळ्या भागामध्ये प्रचलित आहेत. निरनिराळ्या वेळेला त्यांचा प्रभाव बसत होता आणि काही त-हेच्या समाजवादाचा प्रभाव आज सर्वच पूर्वयुरोप आणि चीन या देशामध्येही पडलेला दिसून येत आहे.