व्याख्यानमाला-१९७४-१५

इंग्लंडमध्ये या लोकशाही समाजवादाचे प्रवर्तक यांनी हे वैचारिक नेतृत्व आपल्याकडे घेतले होते. आणि त्यांनी जो समाजवाद प्रचलित केला तो समाजवाद हा लोकशाही स्वरुपाचा होता. त्यांचे विचार समाज छिन्नविच्छिन्न करायचा नाही, क्रांती करायची नाही असे होते. त्या मार्गाने गेल्याने काय होईल हे कोणालाच सांगता येणार नाही. इतिहासाने यासंबंधीचा वाटेल तेवढा पुरावा दिला आहे. फ्रान्समध्ये क्रांतीतून प्रतिक्रांती निर्माण झाली. क्रांतीची भाष न करता संसदेने हळूहळू प्रचार करुन ज्या काही 'की इंडस्ट्रीज' त्यांचे राष्ट्रीयीकरण शक्य तेवढ्या लवकर करावे परंतु राष्ट्रीयीकरणाची घाई करावयाचे काही कारण नाही. जसे जमेल, जशी आवश्यकता भासेल त्याप्रमाणे राष्ट्रीयीकरण करायचे आणि त्याबद्दलचा मोबदला द्यावयाचा. शिवाय एकंदर उत्पादनावर त्याचा काय परिणाम होईल याचाही विचार करावा. कारण जर एका इंडस्ट्रीजचा मोबदला दिला नाही तर दुस-या इंडस्ट्रीजची भीतीपोटी व्हायची नाही या सर्व गोष्टींचा विचार करुन सिडने बेबने संथपणाने राष्ट्रीयीकरणाचा मार्ग काढला. पण समाजवादाची अंतिम समता संधीची संपूर्ण संधी उपलब्ध करुन द्यावी हे शासनाचे कर्तव्य होते व अशा त-हेची विचारसरणी ही लोकशाही समाजवादी विचारसरणी प्रचलित झाली. इंग्लंडप्रमाणे युरोपमध्येसुद्धा ती अतिशय लोकप्रिय ठरली. स्वत: मार्क्सही स्वत:ला सोशल डेमोक्रॅट असे म्हणत असे.

परंतु काही लोकांना असे वाटावला लागले की राष्ट्राच्या मालकीची संपत्ती केली तर कामगारांचे शासन थांबेल का? आणि म्हणून प्रत्यक्ष कामगार-जो मालाचे उत्पादन करतो तो कामगार त्याच्या मोबदल्याला वंचित होतो. कारण त्या उत्पादनामध्ये हजारो लोकांची भागीदारी आलेली असते. त्याचप्रमाणे यंत्राचा त्या ठिकाणी उपयोग झालेला असतो. सगळे कारखाने राष्ट्राच्या मालकीचे झाले पाहिजेत याला म्हणतात सिंडीकॅलिझम् कामगारांचे शासन राष्ट्रीयीकरणामुळे थांबत नाही. कारण एका मालकाऐवजी दुसरा मालक येतो. आणि त्यामुळे कोणाला किती फायदा मिळतो, कामगाराला त्याचा निश्चित किती फायदा मिळते; हा मुद्दा वादग्रस्त होतो. तेव्हा अशा त-हेने सिंडीकॅलिझमचा विचा असतो. आणि हे लोक आणखी पुढे जाऊन म्हणणार आहेत राज्यसंस्थाच असता कामा नये. अनार्किझम या तत्त्वज्ञानाचा अर्थ असा की राज्यशासनाने एखाद्या पिकलेल्या फळाप्रमाणे गळून पडावे. तेव्हा हा एक विचार आपल्याला सांगितला ज्याला सिंडीकॅलिझम् म्हणता येईल.

तिसरा विचार जो पुढे प्रभावी वाटला तो लेनिनच्या कर्तृत्वामुळे. लेनिन हा मोठा कर्तृत्ववान मनुष्य. त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर रशियासारख्या मागासलेल्या देशामध्ये ही राज्यव्यवस्था पुढे अंमलात आली. पण त्याचा संस्थापक मार्क्स याने तीस सायटिफिक सोशलिझम हे नाव दिले. प्लेटोने देखील कम्युनिझमची कल्पना सांगितली होती. पण व्यवस्था रोमॅटिक केली पाहिजे होती. तिला अंमलात आणण्यासारखी केली पाहिजे म्हणून याला सायटिफिक सोशॅलिझम हे नाव दिले.अशा त-हेने हे दोन तीन विचार हे युरोपमध्ये बळावत चालले.

आता पुढे प्रश्न असा उपस्थित झाली की साध्य कोणते आणि साधन कोणते? मार्क्सच्या विचारसरणीमध्ये संपूर्ण उत्पादनाच्या साधनाचे राष्ट्रीयीकरण करणे हे साध्य आहे. राष्ट्रीयीकरण हे साध्य की लोकांचे कल्याण हे साध्य आहे, असा मोठा मार्मिक प्रश्न उपस्थित होतो. आणि महात्मा गांधीचे उत्तर असे की तुम्ही सर्वांत गरीब मनुष्य जो तुमच्या आयुष्यात पाहिला असेल त्याचे चित्र तुम्ही तुमच्या डोळ्यांपुढे उभे करा. तुम्ही जी स्टेप घेणार आहात त्याचा प्राथमिक म्हणून त्या माणसाला काही फायदा होईल का याचा आपण विचार करा. भुकेकंगालांना त्यामुळे स्वराज्य मिळेल का याचा विचार करा. याचा अर्थ लोककल्याण हे अंतिम साध्य आणि ही गोष्ट स्वत: लेनिनने मान्य केली आहे. लोककल्याणाच्या कार्यक्रमामध्ये जी गोष्ट समजावाद सांगत होता तशा त-हेची ही सर्व एकंदर व्यवस्था आहे. ही व्यवस्था निर्माण करण्याकरता म्हणून त्यांनी सांगितले राष्ट्रीयीकरण हे साधन आहे. लोककल्याण हे अंतिम साध्य आहे. आपण आपल्या घटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्वे म्हणून सांगितली त्यामध्ये लोककल्याणाचा कार्यक्रम दिलेला आहे. परंतु लोकशाही समाजवादाचा कार्यक्रम कोणता असे विचारले तर त्याचे एकच उत्तर आहे लोककल्याणकारी समाजवादी राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था हेच लोकशाहीचे अंतिम असे साध्य आहे असे त्याचे आपल्याला उत्तर द्यावे लागले, एकच प्रश्न आहे की हे कल्याण साध्य व्हायचे असेल किंवा समता साध्य व्हायची असेल तर अविकसित देशामध्ये हे शक्य आहे का? हे सर्व साध्य करण्याकरता म्हणून आपल्याला विकासाच कार्यक्रम जारीने अंमलात आणला पाहिजे.