व्याख्यानमाला-१९८६-३४

मी आपल्याला सांगितलं की यशवंतरावजींनी काय अभिवचन दिलं होतं “की हा प्रांत एकजीव, एकसंध असा उभा राहिल आणि इतिहासकाळामध्ये या देशातल्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये जी एक ऐतिहासिक अशी महत्वपूर्ण भूमिका महाराष्ट्राने वटविलेली आहे ती पुढे चालू राहील. हे जे अग्रेसरत्व आहे ते कायम टिकवले जाईल आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक क्षेत्रात पुरुषार्थाला वाव राहील – नव्हे, त्याचीच पूजा बांधली जाईल.” आपण एकोणीसशे साठ सालापासून एकोणीसशे पंच्याऐंशी-शहाऐंशी सालापर्यंत जर प्रवास केला तर हे जे अभिवचन दिलेलं होतं ते परिपूर्ण साकारलं आहे असं आपल्याला म्हणता येईल का ? दुर्दैवाने महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद यशवंतरावजींना फार दिवस चालविता आलं नाही. देशाची काही निराळी मागणी होती आणि अडीच वर्षामध्ये ते देशाची सेवा करण्यासाठी दिल्लीला गेले, परंतु उद्या घडला जाणारा महाराष्ट्राचा पाया भक्कम विचारांच्या अधिष्ठानावर त्यांनी उभा केलेला होता. आणि ते अधिष्ठान त्यांनी तुम्हाला आणि मला दिलेल होतं पुढची इमारत पूर्ण करण्यासाठी. ती इमारत उभी राहिली आहे की नाही, हे पाहण्याचं काम तुमचं माझं आहे. आणि त्यात जर काही चुका झाल्या असतील, उणीवा राहिल्या असतील किंवा काळाचा वेध घेऊन आपला जो महाराष्ट्र उभा करायचा आहे, तो उभा राहिला नसेल तर मग अशा प्रकारचा प्रश्न आपण चर्चेला घेणं आवश्यक आहे. मला काही मंडळी म्हणाली की, तुम्ही क-हाडला जाताय पण या विषयावर फारसं भडक बोलू नका; हा भडक बोलण्याचा प्रश्न नाही. हा आत्मनिरीक्षण करण्याचा प्रश्न आहे. काही विषयाच्या संदर्भात तुलनात्मक आकडे देऊन मी आपल्यासमोर तो मांडणार आहे.

आपण प्रगत, समृद्ध अशा प्रांताची जी एक संकल्पना आपल्या मनामध्ये बाळगतो ती काय आहे? ती अशी आहे की प्रांत किंवा देश – आपण प्रांताचा विचार करतो – याच्या लोकसंख्येला आपापल्या कर्तबगारीनुसार देशाच्या किंवा प्रांताच्या जडण-घडणीमध्ये आपला वाटा उचलता यावा अशा प्रकारची परिस्थिती त्या प्रांतात, त्या प्रांताच्या समाजामध्ये असली पाहिजे. काम करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि जर तो नाकारला गेला तर माझ्या जीवनामध्ये काही अर्थ उरत नाही. तेव्हा तो नाकारण्याची परिस्थिती ज्या समाजव्यवस्थेमध्ये निर्माण झाली असेल ती समाजव्यवस्था निश्चितपणे कुजल्याशिवाय रहात नाही किंवा मोडकळीत निघाल्याशिवाय राहात नाही. अशा प्रकारची जर सामाजिक परिस्थिती आपली असेल तर आपला प्रांत अग्रेसर आहे किंवा एकोणीसशे साठ साली एका नव्या प्रांताची मराठी मनाच्या अनेक आशा-आकांक्षांची अभिव्यक्ती इथं होईल, आविष्कृती पाह्यला मिळेल असं वाटत होतं ते जर आज वाटत नसेल तर हा प्रश्न चर्चेला घेणं अत्यंत आवश्यक आहे. माझ्यासारख्या माणसाला तसं वाटत नाही म्हणून मी आज मुद्दाम तुम्हा कराडकरांची सेवा करण्यासाठी हा विषय तुमच्यासमोर मांडतो आहे.

अपेक्षा पहिली अशी होती, किंवा प्रगत प्रांताची संकल्पना आपल्या मनामध्ये ती अशी असते की प्रायमरी सेक्टरमध्ये म्हणजे शेतीच्या क्षेत्रामध्ये उत्कर्ष झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, कमीत कमी माणूसबळ देऊन जास्तीतजास्त उत्पादन काढण्याची आपल्याला तांत्रिक शक्ती या क्षेत्रामध्ये मिळाली पाहिजे आणि जेवढी काही साधनसामुग्री आपल्याकडे उपलब्ध आहे तिचा अत्यंत काटेकोरपणे उपयोग करून घेऊन आपली उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणांत वाढली पाहिजे, जेणे करून लोकांच्या गरजा भागून जास्तीच उत्पन्न दुस-याच्या गरजा भागविण्यासाठी आपण निर्माण करू शकतो. किंवा आपल्या गरजेपेक्षा आपल्या कृषिमधून जास्तीच उत्पादन काढता आलं तर जास्तीच्या झालेल्या उत्पादनावर प्रक्रिया करणारी कारखानदारी आपल्याला उभी करता आली पाहिजे. आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये वळविता आली पाहिजे. जेणे करून आपल्याला शेतीच अद्ययावत तांत्रिकीकरण करता येईल. महाराष्ट्राच्या संदर्भात मी याचा विचार आपल्यापुढे ठेवणार आहे. आपण कृषीला प्रायमरी सेक्टर आणि उद्योगधंद्याल सेकंडरी सेक्टर म्हणतो. प्रायमरी सेक्टरवरची जास्तीची लोकसंख्या सेकंडरी सेक्टरकडे वळविणे व सामावून घेणे याला आपण गतिशील विकासाचे लक्षण म्हणतो.