भाग १ विधानसभेतील भाषणे-७६

आपण जर अपेंडिक्स १२ वाचले असेल तर मी आता आपणास अशी विनंती करीन की, आपण कृपा करून अपेंडिक्स ५ पासून सुरू करू या. आपण यासंबंधाने जर थोडेसे पुढे जाऊन पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, ज्या पॉवर्स दिल्या गेल्या आहेत त्या फार मोठया प्रमाणात डेलिगेट करण्यात आलेल्या आहेत. आपण जर कृपा करून माझ्या बरोबर अपेंडिक्स ५ पर्यंत प्रवास केला तर अर्थात् पान १६१ पर्यंत i.e.a list of activities proposed to be included in the local sector.

या अँग्रीकल्चर, इरिगेशन, अँनिमल हस्बंडरी, हेल्थ आणि रुरल सॅनिटेशन अशा सर्व विषयांवर या कामाची वाटणी केलेली आहे. या ज्या योजना दिलेल्या आहेत, त्या योजना सर्व लोकल सेक्टरमध्ये ठेवण्यात येतील. मला आता असे विचारावयाचे आहे की, आपण याला विकेंद्रीकरण म्हणणार नाही काय ? जर म्हणणार नसाल तर काय म्हणणार ? कदाचित् आपली सत्तेची कल्पना अशी असली पाहिजे की, कोणालाही ज्याला सत्ता असते त्याला आपल्या समोरच्या माणसाला डिस्मिस् करता आले पाहिजे. तसा त्याला अधिकार असला पाहिजे, तरच त्याला सत्ता म्हणावयाचे. अध्यक्ष महाराज, माझी अशी कल्पना नाही. मी येथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो की नेमणूक आणि डिस्मिस् करण्याचे अधिकार फक्त एक्झिक्युटिव्हच्या लोकांनाच असावयाला पाहिजेत. कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम त्यांचे आहे. त्यात आपण अर्थात् लोकनियुक्त प्रतिनिधींनी ढवळाढवळ करण्याचे कारण नाही, असे मला वाटते. मी असेही म्हणून शकेन की, या डेमॉक्रॅटिक सेटपमध्ये या मुख्य मंत्र्याला एका चपराशालादेखील कायम करता येत नाही. तसे जर मी करावयाचा प्रयत्न केला तर हे सभागृह मला तसे करू देणार नाही आणि मला माझ्या त्या कृत्याबद्दल या सभागृहाला जाब द्यावा लागेल. त्याचबरोबर मला कोणाची नेमणूकही करता येत नाही. अध्यक्ष महाराज, नेमणूक करणे आणि डिस्मिस् करणे ही किरकोळ स्वरूपाची सत्ता आहे. मुख्य सत्ता बजेट सँक्शन करणे आणि खर्च करणे हे आणि त्याचबरोबर कर लावणे, यालाच सत्ता म्हणतात. आता सत्ता दिली गेली नाही असे म्हणण्यात काय अर्थ आहे ? मी असेही म्हणू शकेन की, ह्या ज्या योजना आहेत त्यासंबंधी सर्व आर्थिक अधिकार त्यांना दिले गेले आहेत. अध्यक्ष महाराज, आपण जर असेच पुढे पाहात गेलो तर पान १७१ वर जे अपेंडिक्स ६ दिलेले आहे, त्यात या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर अपेंडिक्स ७ मध्ये, A list of Regulatory Functions proposed to be entrusted to local badies ही एक लांबलचक यादी या ठिकाणी दिलेली आहे. नंतर अपेंडिक्स ८ मध्ये, “Appendix VIII-powers and Functions of District Council, its Committees and Office-bearers-To sanction the annual budget. अध्यक्षाला ज्या पॉवर्स आहेत त्यांचे हे लिस्ट आहे. पैशांचे व्यवहार करण्याचे हे जे अधिकार दिलेले आहेत ते महत्त्वाचे अधिकार आहेत. बजेट करण्याचा अधिकार, पैसा खर्च करण्याचा अधिकार, अँन्युअल बजेट सँक्शन करण्याचा अधिकार, हा सर्वात मोठा अधिकार आहे. यांना आपण पॉवर्स म्हणणार नसू तर लोकशाहीच्या कामाचे स्वरूप समजले नाही असे म्हणावे लागेल. शेवटी बजेट सँक्शन करणे ही बाब सर्वांत महत्त्वाची आहे.

अँडमिनिस्ट्रेशन ही एक स्वतंत्र चीज आहे. व्यवहार चालविण्यासाठी, कारभार चालविण्यासाठी, अँडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी पाहिजे. यामध्ये काही आपण कमीपणाची गोष्ट करतो, असे मानण्याचे कारण नाही. शेवटी अशा कामाची जबाबदारी २४ तास सांभाळण्यासाठी ते काम करणारी यंत्रणा जरूर असायला पाहिजे. या दृष्टीने हे अधिकार दिले आहेत ते मी समजू शकतो. त्याबाबतीत पहाण्याचा प्रयत्न केला तर पान १८१ वर अपेंडिक्स त्याप्रमाणे प्रेसिडेंटला पॉवर्स आहेत.

“Powers and functions of the President of the District Council........(v) To submit the annual confidential report on the work of the Chief Administrator to the Commissioner. (vi) To submit all confidential reports on Class I Officers received from the Chief Administrator with his remarks to authorities as may be prescribed.”