भाग १ विधानसभेतील भाषणे-५२

काही सन्माननीय मित्रांनी मला धोक्याच्या सूचना दिल्या त्याबद्दलही मी त्यांचा आभारी आहे. सन्माननीय सभासद श्री. देशपांडे यांनी मागे एकदा मला तुम्ही असे मख्ख का बसून राहिला आहात असे विचारले होते व त्याबद्दल त्यांना आता पश्चात्ताप होत आहे असे तेच आता म्हणाले. त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. केव्हा केव्हा आपल्याला मागे झालेल्या चुकीची जाणीव होते. माझ्या बाबतीतही केव्हा केव्हा असे होते आणि मागाहून चुकीची जाणीव होते. तेव्हा त्यांनी हे बोलून दाखविले हे फार चांगले झाले.

काही वेळा जोराने बोलणे म्हणजे त्या गोष्टीचा आग्रह धरणे असे समजले जाते. सन्माननीय सभासद श्री. देशपांडे यांनी आता जे सांगितले त्या बाबतीत एका वयोवृद्ध गृहस्थांनी मला असे म्हटले होते की, ज्या वेळी श्री. देशपांडे तुम्हाला असे म्हणाले त्यावेळी तुम्ही त्यांना एक गोष्ट सांगावयाला हवी होती. पुन्हा केव्हा तरी त्यांना मी ती गोष्ट सांगेन असे मी ठरविले होते. पण ती संधी इतक्या लवकर येईल अशी मलाही कल्पना नव्हती. ती गोष्ट अशी आहे. खूप तोंडाळ आणि भांडणारी बायको आणि शांतपणे तिचे बोलणे ऐकून घेणारा नवरा यांच्या कुटुंबातली ही गोष्ट आहे. ती बायको आपल्या नवर्‍याला म्हणाली की, मी तुम्हाला इतके ओरडून सांगत आहे आणि तुम्ही असे मख्खासारखे काय बसून राहिला आहात! ह्या कानांनी ऐकता आणि त्या कानांनी सोडून काय देता! तेव्हा नवर्‍याने उत्तर दिले की, मी निदान ह्या कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून तरी देतो, पण तू दोन्ही कानांनी ऐकूनही तुझ्या तोंडातून बाहेर येत आहे. तेव्हा ह्या गोष्टीवरून सन्माननीय सभासदांनी काय तात्पर्य घेता येईल ते घ्यावे, एवढेच मला सांगावयाचे आहे. माझ्याकडे शिष्टमंडळ आले होते, तेव्हा मला नक्की तारीख सांगता येणार नाही, असे मी म्हटले होते. जिवंत इतिहासाचा मी एक विद्यार्थी आहे. काही साक्षात्कार झालेला मोठा असा कोणी मी नाही. जिवंत इतिहासाचा नीट अभ्यास करणारा मी आहे. मी काही भविष्यवादी नाही. तेव्हा अमुक एका तारखेपर्यंत अमुक एक गोष्ट होईल असे मी कसे सांगू? हा प्रश्न मला सुटला नाही, हिंदुस्थान सरकारलाही सुटला नाही इतका तो ज्वलंत आहे आणि म्हणूनच तो सुटल्याशिवायही राहणार नाही.

हे सांगत असताना, मला एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. ज्या भावना व्यक्त करीत असताना, कानडी जनतेच्या विरुद्ध आमच्या मनात कोणत्याही प्रकारच्या विरोधाच्या भावना नाहीत. श्री. जत्तींचा उल्लेख येथे करण्यात आला असला तरी तो मित्रत्वाच्या भावनेनेच करण्यात आलेला आहे. निदान माझे आणि त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. मी हा ठराव मांडल्यानंतरही हे सांगू इच्छितो की मुंबई सरकार आणि म्हैसूर सरकार या दोन सरकारांच्या इभ्रतीचा हा प्रश्न नसून ह्या दोन राज्यातील काही विभागातील जनतेच्या मागणीचा आणि न्यायाचा तो प्रश्न आहे. ह्या भावनेनेच ह्या प्रश्नाकडे आपण पाहिले पाहिजे. म्हैसूर सरकारनेही ह्या दृष्टीनेच ह्या प्रश्नाचा विचार करावा असे मी सांगू इच्छितो.
-----------------------------------------------------------------------------------------
On 11th March 1960, while moving the resolution on the border issue between Mysore (now renamed Karnataka) and Maharashtra, Shri Chavan, Chief Minister, narrated the historical background of the dispute, He pointed out that unlike Maharashtra, Mysore did not have any urgency for the solution of the problem. He accepted one of the three amendments to the resolution and prefixed the words”and Just” before the word “Satisfactory” in the resolution which was passed unanimously.