भाग १ विधानसभेतील भाषणे-४६

अध्यक्ष महाराज, यानंतर शहराच्या वेगवेगळया भागात चौका-चौकातून हिंदू आणि मुसलमान यांचे थवेच्या थवे जमा झाले आणि वादावादीला सुरवात झाली. शहरातील परिस्थितीची अद्ययावत माहिती मिळावी याकरिता ठिकठिकाणी जे सायकलवाले कॉन्स्टेबल ठेवले होते त्यापैकी एक कॉन्स्टेबल घाईघाईने पोलिस ठाण्यावर जाऊन सांगू लागला की शहरातील बुंदेलपुरा नावाच्या पुर्‍यात मारामारीला सुरवात झाली आहे. ह्या ठिकाणी ४-५ पोलीस होते, ही बातमी खरी आहे. ४ कॉन्स्टेबल्स आणि १५-१६ पोलीस संरक्षणाच्या दृष्टीने तालुक्याच्या ठिकाणी आवश्यक असतात आणि तेवढे पोलीस त्या ठिकाणी होते. तो बाजाराचा दिवस असल्यामुळे काही पोलिसांची वाटणी करावी लागली आणि काही पोलीस तिकडे पाठविण्यात आले व काही पोलीस स्टेशनवर ठेवावे लागले. तसेच दंगा होण्याची शक्यता आहे असे कळल्यानंतर सायकलवरून पोलीस पाठवावा लागला आणि मग त्या ठिकाणी आर्म्ड पोलीस हजर झाले. ज्यांनी त्या ठिकाणचे चित्र पाहिले त्यापैकी काही सांगतात की, ४-५ हजार लोक होते तर कोणी असे सांगतात की, १०० ते २०० लोक होते. कोणी त्याच्यामधला आकडा सांगतात. पण एक गोष्ट निश्चित आहे की हजारो नसले तरी शेकडो लोक जमा झाले होते. त्या ठिकाणी तंग वातावरण निर्माण होऊन दगडांचा वर्षाव चालू होता आणि एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रसंग निर्माण झाला होता. त्यावेळी पोलिसांनी जे काही केले ते योग्य होते असे म्हटले तर वादविवाद निर्माण होईल म्हणून प्रत्यक्ष जी हकीकत घडली ती मी सन्माननीय सभागृहाला सांगू इच्छितो. दोन्ही बाजूंच्या लोकांच्यामध्ये उभे राहून पोलिसांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी लोक ऐकेनात असे त्यांना दिसून आले, त्या वेळी त्यांनी तालुका मॅजिस्ट्रेटला बोलावून १४४ कलम जाहीर करण्याचे ठरविले. 

त्याप्रमाणे तालुका मॅजिस्ट्रेट आले आणि त्यांनी १४४ कलम जाहीर केले. परंतु हल्ली असे वातावरण तयार झाले आहे की मामलेदारांनी किंवा मॅजिस्ट्रेटनी १४४ कलम जाहीर केले तरी आपला कार्यक्रम चालू ठेवावयाचा आणि त्याप्रमाणे मॅजिस्ट्रेटचा आदेश धुडकावण्यात आला. दगडांच्या साधनाचा वापर करता करता प्रकरण हातघाईवर येऊन लढाई पुढे चालू झाली. त्या ठिकाणी सब-इन्स्पेक्टरच्या अंगावर दगड आले आणि दुसर्‍या एका कॉन्स्टेबलला खाली पाडण्यात आले. त्या वेळी त्यांना असे दिसून आले की एका मुसलमानाच्या कुटुंबाच्या दुकानाचा दरवाजा दगडांच्या मार्‍याने मोडला जाऊन तो पडू लागला आहे. आतून स्त्रियांच्या आणि मुलांचे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. त्यावेळी पोलीस इन्स्पेक्टरने स्वतःच्या जबाबदारीवर पोलिसांना गोळीबार करावयास सांगितले. त्या ठिकाणी जे चार पोलीस होते त्यापैकी दोन पोलिसांना मुसलमानांच्याकडे आणि दोन पोलिसांना हिंदूंच्याकडे तोंड करून उभे राहण्यास सांगून गोळीबाराचा हुकूम दिला आणि ४ गोळया झाडण्यात आल्या. त्यापैकी एक गोळी हवेमध्ये उडविण्यात आली आणि ज्या तीन गोळया झाडल्या त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. गोळीबारामुळे कोणीही जखमी झाले नाही तेव्हा गोळीबार झाला, ही थाप असावी असे वातावरण  निर्माण करण्याची शक्यता होती. यावेळी लोक थोडेसे पांगले पण पुन्हा ते एकमेकांशी भिडू लागले असे दिसले तेव्हा इन्स्पेक्टर त्यांना आडवे गेले. हे पाहिल्यावर एका माणसाने आयर्न बार किंवा ज्याला आपण पाइप म्हणतो तो फेकून इन्स्पेक्टरला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इन्स्पेक्टरनी दोन गोळया रिव्हॉलव्हरमधून झाडल्या आणि त्यामुळे दोन माणसे जखमी झाली. माणसे जखमी होतात हे पाहिल्याबरोबर तीन बंदुकींच्या गोळयांनी जे घडले नाही ते रिव्हॉलव्हरच्या दोन गोळयांनी घडले आणि माणसांची पांगापांग झाली. हा प्रकार बुंदेलपुरा या ठिकाणी घडला.

यानंतर मुलतानपुरा येथे जे वातावरण होते ते अशाच प्रकारचे होते, आणि तेथेही असाच प्रकार झाला. दोन समाज समोरासमोर जमले होते आणि ३-४ ठिकाणाहून माणसे दगडांचा वर्षाव करीत होती. त्या ठिकाणी इन्स्पेक्टरनी जमाव पांगविण्यासाठी गोळीबार केला आणि दोन तीन गोळया झाडल्या पण त्याचा काही परिणाम झाला नाही. एका ठिकाणी लोक दुकान पेटवीत आहेत असे दिसून आल्यानंतर ते त्या ठिकाणी धावत जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. तेव्हा पोलीस इन्स्पेक्टरला आपल्या रिव्हॉलव्हरचा उपयोग करावा लागला आणि त्याने दोन गोळया झाडल्या. त्यापैकी एक गोळी एका इसमाच्या छातीला लागून तो मनुष्य जखमी झाला. रिव्हॉलव्हरच्या गोळीने मनुष्य जखमी झालेला पाहून लोक पांगू लागले. गोळीबार करण्यापूर्वी लाठीमार का केला नाही याबद्दल मला असे सांगावयाचे आहे की तेथे तेवढा बंदोबस्त नव्हता आणि लोकांना गोडीगुलाबीने शक्यतो हत्याराचा वापर न करता दंग्यापासून परावृत्त करावे हा शुद्ध हेतू होता. सन्माननीय सभागृहाच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की, सन्माननीय सभासद श्री. कानडे २४ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांनी मॅजिस्ट्रेटपुढे झालेल्या चौकशीत असे सांगितले की पोलिसांनी गोळीबार केला नसता तर वातावरण अधिक तंग झाले असते आणि पोलिसांनी जो गोळीबार केला तो योग्य होता असे ते म्हणाले.