भाग १ विधानसभेतील भाषणे-४२

येथे श्रावण भरड यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. अध्यक्ष महाराज, श्रावण भरड यांना काही मंडळींनी अन्नधान्याची पोती आणण्यास बंदी केली आणि लोकांचा ऑक्ट्रय कराला जो विरोध होता त्याचा फायदा घेण्याचे ठरविले. म्युनिसिपालिटीमध्ये त्यावेळी ह्या कराराबाबत विरोध निर्माण झाला होता आणि म्युनिसिपालिटीतर्फे हे गृहस्थ अन्नधान्य आणीत होते, त्यावेळी त्या दोन गृहस्थांची व त्यांची बाचाबाची होऊन मारामारी झाली व पोलिसांनी त्या दोघांवर खटले भरले आहेत. सन्माननीय सभासद श्री. उद्धवराव पाटील यांनी सांगितले की त्यांच्यावर खटला भरला नाही. मला त्यांना सांगावयाचे आहे की, काही हितसंबंधी माणसांनी त्यांना चुकीची माहिती दिलेली आहे, तेव्हा कृपा करून त्यांनी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करावा. अध्यक्ष महाराज, आपल्या माहितीसाठी मी असे सांगू इच्छितो की, त्या दोन्ही इसमांवर खटला भरला आहे. सभा संपल्यानंतर हा मनुष्य धान्याची पोती घेऊन चालला होता, त्यातील २ पोती खाली पाडून फोडली तेव्हा स्वाभाविकपणे गडबड होण्याचा संभव आहे म्हणून शक्य आहे की त्याने काठी घेतली आणि मारली. अशी एकंदर परिस्थिती आहे व याचा म्युनिसिपल सभेशी कांहीही संबंध नाही असे मला सांगावयाचे आहे.

अध्यक्ष महाराज, सव्वादहा ते साडेदहाच्या सुमाराला नगरपालिकेने ऑक्ट्रॉय करासंबंधी आपला निर्णय घेतला आणि ऑक्ट्रॉय विरोधी समितीच्या कार्यकर्त्यांना व त्यांच्या नेत्यांना हा निर्णय कळला तेव्हा त्यांनी एक प्रकारचा लढा सुरू करण्याचे ठरविले. आम्ही ह्या कराविरुद्ध आमचे विचार मांडीत असताना म्युनिसिपालिटीने ह्या बाबतीत निकाल घेतला म्हणून व्यापारी लोक, त्यांचे नोकर, हमाल व इतर काही मंडळी यांचे  जथेच्या जथे तेथे पाठवून ४ ते ५ हजार माणसांच्या समूहाने नगरपालिकेला वेढा दिला. नगरपालिकेचे कांही सभासद बाहेर पडले होते, पण अध्यक्ष व इतर काही सभासद तेथे होते. साडेदहाच्या सुमाराला ज्यावेळी नगरपालिकेला लोकांनी वेढा दिला त्यावेळी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट व पोलिस ऑफिसर्स १०० यार्डावर बसले होते. ते तेथे आले व त्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहून तिचा ताबा घेतला. त्या ठिकाणी जी ४-५ हजार मंडळी जमली होती त्यांनी निरनिराळया प्रकारच्या घोषणा करण्यास सुरूवात केली व त्यापैकी एक घोषणा अशी होती की, ''जनता कर रही है पुकार, विनायक पराशरको कर दो ठार''. तसेच त्यांनी दगडाचा मारा चारी बाजूंनी सुरू केला होता. अध्यक्ष महाराज, अशा परिथितीतही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी विरोधी पक्षाची मदत घेऊन लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. एका ठिकाणी लाउड स्पीकरच्या सहाय्याने लोकांना निघून जा म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला, पण लोक ऐकेनात तेव्हा त्यांना १४४ कलम जाहीर करावे लागले. येथे १४४ कलम लागू केले असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी लाउड स्पीकरच्या साहाय्याने केला, परंतु लोक पांगले नाहीत. म्युनिसिपालिटीच्या रेकॉर्ड्सची नासाडी होईल व कोणाच्या प्राणावर संकट कोसळेल म्हणून त्यांनी ही दक्षता घेतली होती. पण लोकांना कोण चेतना देत होते हे कळत नव्हते, मात्र लोकांचे जथेच्या जथे तेथे होते. अध्यक्ष महाराज, अशा परिस्थितीत दोन वेळा १४४ कलम जाहीर केल्याचा इशारा देऊन व माहिती देऊनही लोक हलले तर नाहीतच उलट, त्यांनी दगडांचा वर्षाव करण्यास सुरवात केली. तेव्हा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी दोनदा इशारा देऊन मग लाठीहल्ला करण्याचा हुकूम दिला.

त्या ठिकाणी बायका-मुले होती व त्यांना मार बसला हे जे वर्णन केले ते चुकीचे आहे. सकाळी ८ वाजल्यापासून ६ तास हा गोंधळ चालू होता, अशा परिस्थितीत त्या ठिकाणी मुले व बायका येऊ शकल्या असत्या काय ? काही मुलांना आणि बायकांना मारण्यात आले असे वर्णन या ठिकाणी करण्यात आले. परंतु ही गोष्ट खरी नाही. कोणत्याही बाईला किंवा मुलाला मारण्यात आलेले नाही, किंवा कोणत्याही बाईला किंवा मुलाला जखम झालेली नाही, अशी माझी माहिती आहे. माननीय श्री बर्धन यांनी श्री. ब्रिजलाल बियाणी२२ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा)  यांच्या वर्तमानपत्राचा आणि नागपूरच्या दुसर्‍या एका वर्तमानपत्राचा उल्लेख या ठिकाणी केला. आपली बाजू बळकट करण्यासाठी माननीय श्री बर्धन यांनी श्री. बियाणी यांच्या वर्तमानपत्राचा जो उपयोग केला तो पाहून त्यांचा हा प्रयत्न म्हणजे एक अस्वाभाविक विवाह आहे असे मला म्हणावेसे वाटते. हा विवाह फार दिवस टिकणारा नाही.