भाग १ विधानसभेतील भाषणे-११४

३२

मान्यवरांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव* (१९ नोव्हेंबर १९६२)
------------------------------------------------------------

माजी राज्यपाल डॉ. सुब्बरायन, विधानसभा सदस्य डॉ. एस.बी.मांजरेकर व श्री. एम.टी.ठाकरे व माजी विधान परिषद सदस्य सर कावसजी जहांगीर यांच्या निधनाबद्दल या सर्व मान्यवरांसंबंधी गौरवोद्‍गार काढून  मा. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर संदेश पाठवावे असे म्हटले.
------------------------------------------------------------------------
*Maharashtra Legislative Assembly Debates, Vol, Part II, 19th November 1962, pp. 31 to 33.

अध्यक्ष महाराज, आपल्या राज्याचे माजी राज्यपाल डॉ. सुब्बरायन हे आपल्या राज्याचे राज्यपाल असताना कालवश झाले आणि म्हणून त्यांच्या दुःखद निधनाबद्दल आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे असे मी समजतो. कै. डॉ. सुब्बरायन हे जुन्या पिढीतील एक अत्यंत कर्तबगार आणि बुद्धिमान अ‍ॅडव्होकेट म्हणून मद्रास राज्यात पहिल्या प्रथम प्रसिद्धीस आले. त्यानंतर ते कॉन्स्टिटयुअंट असेंब्लीचे सभासद झाले. विशेषतः अलीकडच्या काळात केंद्र सरकारच्या वाहतूक खात्याचे मंत्री म्हणून त्यांचे नाव गाजले, हे सर्वांना माहीत असेलच. गेल्या सार्वत्रिक पार्लमेंटचे सभासद म्हणून निवडून आल्यानंतर पुढे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांचे नाव सुचविण्यात आल्याबरोबर मोठया आनंदाने त्यांनी हे पद विभूषविण्याचे कबूल केले. असे एक थोर राजकारणी पुरुष आपल्या राज्याला राज्यपाल म्हणून लाभल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा मिळेल अशी अपेक्षा सर्वांनी केली होती. परंतु माणसाच्या मनात एक असते आणि नियतीच्या मनात निराळेच असते असे पुष्कळ वेळा आपल्याला आढळून येते. येथे आल्यापासूनच त्यांचे प्रकृतिस्वास्थ्य ढासळू लागले आणि म्हणून विश्रांतीसाठी ते मद्रासला गेले. परंतु विश्रांतीसाठी म्हणून ते जे मद्रासला गेले ते परत येथे येऊ शकले नाहीत. तेथेच ते कालवश झाले आणि त्यामुळे त्यांच्यासारखा एक थोर राजकारणी पुरुष आपल्या राज्याला राज्यपाल म्हणून लाभल्यामुळे आपल्या राज्याला त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळेल अशी जी आशा आपल्या मनात निर्माण झाली होती ती नष्ट झाली.

डॉ. सुब्बरायन यांची कारकीर्द विविध तर्‍हेची होती. त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १८८९ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक व कॉलेजचे शिक्षण हे मद्रास राज्यातच झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ऑक्सफर्डला गेले. त्यानंतर ते मद्रास लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे सभासद म्हणून बिनविरोध निवडून आले. त्यापूर्वीसुध्दा १९२६ ते १९३० या कालात ते मद्रासचे मुख्यमंत्री होते. ते हिंदुस्थानात व हिंदुस्थानच्या बाहेर जे प्रसिद्धीस आले ते त्यांना क्रिकेटच्या कलेबद्दल जे ज्ञान होते त्यामुळे आले. क्रिकेटच्या खेळाचे ज्ञान हे अष्टपैलू होते आणि म्हणूनच त्यांना क्रिकेट बोर्ड ऑफ कंट्रोलचे अध्यक्ष नेमण्यात आले होते. त्यामुळेच ते हिंदुस्थानातच नव्हे तर हिंदुस्थानच्या बाहेरसुध्दा मशहूर झाले. त्यांचे जीवन हे एका अर्थाने यशस्वी झाले असे म्हटले पाहिजे. त्यांच्या स्वतःच्या घरात विविध मतप्रणालीची माणसे होती. विविध मतप्रणालीची माणसे एकाच कुटुंबात सुखासमाधानाने कशी नांदू शकतात याचा त्यांचे घर हा एक उत्कृष्ट नमुना होता. आपल्या कुटुंबियांशी विविध विषयांवर चर्चा करताना ज्यांनी त्यांचे विचार ऐकले असतील त्यांना निश्चित आनंद वाटल्याशिवाय राहिला नसेल. त्यांची सहचारिणी हीसुध्दा एक कर्तबगार स्त्री होती. त्यांची पत्‍नी वारल्यानंतर तिच्या वियोगाचा धक्का त्यांना सहन झाला नाही असे दिसते. तिच्या वियोगामुळे त्यांचे मन अत्यंत दुःखीकष्टी झाले. ती निवर्तल्यानंतर त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांची मित्रमंडळी त्यांच्याकडे गेली असताना त्यांनी त्यांच्या दिवाणखान्यात असलेल्या पत्‍नीच्या निर्जीव पुतळयाकडे बोट दाखवून सांगितले की तिच्या वियोगामुळे मी किती दुःखी झालो आहे ते तिच्या पुतळयाला विचारा. अशा तर्‍हेने ते एकपत्‍नीत्वाचे एक आदर्श होते असे दिसून येते. असा दुर्लभ माणूस आपल्याला लाभला होता परंतु आपल्या दुर्दैवाने त्यांच्या अनुभवाचा लाभ फार वेळ मिळू शकला नाही. तेव्हा त्यांच्या निधनामुळे सबंध महाराष्ट्रातील जनतेला जे दुःख झालेले आहे ते या प्रातिनिधिक सभागृहामार्फत त्यांच्या परिवाराला कळविण्यात यावे अशी माझी विनंती आहे.

डॉ. श्रीधर बाळकृष्ण मांजरेकर यांचा जन्म रत्‍नागिरी जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे या गावी झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आले आणि तेथे त्यांनी एल.सी.पी.एस.चा डिप्लोमा मिळविला. पहिल्या प्रथम त्यांनी मुंबईत प्रॅक्टिस सुरू केली. परंतु नंतर १९४० मध्ये ते रत्‍नागिरीमध्ये गेले आणि तेथे त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली व लौकरच ते लोकप्रिय डॉक्टर झाले. त्यानंतर ते मालवण म्युनिसिपल कमिटीवर निवडून आले व त्यानंतर ते ६ ते ७ वर्षे त्या म्युनिसिपल कमिटीचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे भंडारी एज्युकेशन सोसायटी, मालवण या संस्थेचे सुद्धा ते अध्यक्ष होते आणि अखेरपर्यंत त्यांनी त्या संस्थेचे काम पाहिले. या संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी शेवटपर्यंत अत्यंत परिश्रम घेतले. ते १९५७ साली मालवण तालुक्यातून महाराष्ट्र विधानसभेचे एक सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी या सन्माननीय सभागृहात फारशी भाषणे केली नाहीत. परंतु ते जरी अबोल असले तरी आपल्या कामावर मात्र त्यांची अढळ श्रद्धा होती. त्यांच्या निधनामुळे आपल्याला जे दुःख झाले आहे ते त्यांच्या परिवाराला कळविण्यात यावे अशी माझी विनंती आहे.