व्याख्यानमाला-१९९५-९६-४

स्वतंत्र भारताचा ध्येयवाद आहे, राज्यघटनेने काही राष्ट्रीय जीवनमूल्ये उदघोषित केली आहेत, त्या ध्येयवादाची, त्या राष्ट्रीय जीवनमूल्यांची निष्ठापूर्वक प्रतिष्ठापना, भारतीय जन गण मनांत करण्यासाठी झटणे, ही स्वतंत्र भारतातील प्रथम क्रमांकाची देशभक्ती आहे. स्वातंत्र्य मिळवण्याचा इतिहास, लोकजागरण, लोकसंघटन आणि प्रसंगी लोकआंदोलन या मार्गानेच घडविला आहे. स्वातंत्र्याची उद्दीष्टे साध्य करण्यासाठीही लोकशक्तीचे जागरण आणि संघटन तितकेच आवश्यक आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर हे लोकमानस जागृत संघटित करण्याचे काम, ज्या गतीने आणि ज्या जबाबदारीने व्हायला पाहिजे होते, तेवढे झालेले नाही. लोकमताला “बनवण्याचे” उद्योग चालतात. पण लोकमताची जडणघडण करण्यात कुणाला रस वाटत नाही. कारण हे काम दमाधीराचे सातत्याने चालवायचे आणि स्वयंसेवी बाण्याचे, कष्टाचे काम आहे. देशभक्तीचे हे अवघड व्रत, सातत्याने चालू ठेवल्याबद्दल, कराड नगरपालिकेला मी मनापासून धन्यवाद देतो.

महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठी मनाची जडणघडण कशी होते हे नीटपणे समजून घेतले पाहिजे. मनाच्या जडणघडणीमध्ये इतिहासाचा वारसा परिणामकारक, प्रेरक वा मारक ठरत असतो. महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा वारसा ज्या रीतीने आपण समजून घेतो आणि देतो, तो पुरेसा नाही. आमचे महाराष्ट्र गीतही असेच अधुरे, अपुरे आहे. आमचा खरा प्राचीनतम विशाल वारसा समजून देणारे ते गीत नाही. संयुक्त महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना ते आपले वाटेल असे नाही. पूर्वीच्या पश्चिम महाराष्ट्राचे ते गीत आहे असे वाटते. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर तरी नवे महाराष्ट्रगीत लिहायला हवे होते. हा महाराष्ट्र केवळ अंजन कांचन करवंदीचा काटेरी देश नाही. केवळ दगडाधोंड्यांचा नाही, आमचा वारसा केवळ वारक-यांचा नाही, केवळ धारक-यांचाही नाही, आमचा मराठीचा इतिहास ज्ञानेश्वरीपासून सुरू होत नाही. इ. स. पूर्व दीडशे वर्षांपासून वररुचीच्या व्याकरणांत, सर्व प्राकृत भाषांत, तोलामोलाने वावरणारी आमची मराठी भाषा आहे. सम्राट चंद्रगुप्ताच्या, सम्राट अशोकाच्या तोडीचे, परंतु त्यांच्यापेक्षाही अधिक काळ इ. स. पूर्व १५० ते इ. स. सनाच्या पाचव्या शतकांपर्यंत, प्रचंड साम्राज्य चालविणा-या सातवाहन सम्राटांचा हा महाराष्ट्र आहे. गंगेच्या खो-यापासून दक्षिणेत तिन्ही समुद्रावर सत्ता प्रस्थापित करून चाललेल्या विशाल साम्राज्याची राजधीनी पैठणनगरी होती. सातवाहनानंतर चालुक्य, वाकाटक, अहीर, शिलाहार, राष्ट्रकूट, यादव ते छत्रपती शिवराय अशा शकर्त्या राजघराण्यांचा हा महाराष्ट्र आहे. राजकाणाबरोबर सातासमुद्रावर सत्ता गाजवणारे आम्ही दर्यावर्दी खलाशी आहोत. रोमच्या साम्राज्याशी प्रचंड मोठा व्यापर करणारे व्यापारी आहोत. गावागावांत केवळ शेतीप्रधान नव्हे, तर अत्यंत उच्च कोटीची कारागिरीप्रधान अर्थव्यवस्था चालवून जगातून संपत्ती गोळा करणारे संघटित कारागीर व्यापारी होते. सा-या जगाने आजही तोंडात बोटे घालावीत अशी वेरुळची लेणी खोदणारे आम्ही, विश्वकर्म्याचे वारस शिल्पी होतो. अजंठ्याची विश्वविख्यात चित्रे कोरणारे चित्रकार होतो. दीड दीड हजार वर्षे जे रंग टिकून रहातात असे रंग वनस्पतीतून शोधून काढणारे रसायनशास्त्रज्ञ होतो. भाषाशास्त्रे, आयुर्वेद, खगोलशास्त्रे यातही आघाडी घेणारे वैज्ञानिक होतो, दोन अडीच हजार वर्षे, उन्हापावसांत उभे असलेल्या धातूशिल्पांना गंज चढवणार नाही, असे धातू शोधून वापरणारे आम्ही धातूशास्त्रज्ञ होतो. या पृथ्वीवर, याच जन्मात स्वर्ग निर्माण करणारे, दिग्विजयी जीवन जगणारे आम्ही होतो, हा आमचा वारसा आम्ही समजून घेत नाही. नव्या पिढीच्यापुढे उचित स्वरूपांत ठेवीत नाही. पुरुषार्थाची अनंत क्षितीजे काबीज हा वारसा कालप्रवाहात आम्ही बुडवून बसलो आहोत. तुकारामाच्या गाथा ज्या प्रवृत्तीने इंद्रायणीच्या डोहांत बुडविल्या, त्याच वृत्तीने हा उज्वल इतिहासही कालप्रवाहात बुडवून टाकला आहे.

इ. स. सातव्या शतकांत प्रसूत केलेल्या “ब्रह्म सत्य जगत् मिथ्या” या भ्रमिष्ट तत्वज्ञानाने, आमची मने गुलाम केली. मायावाद, दैववाद, नशीबवाद, आमच्या हाडामांशी भिनवले. इहवाचा पूर्ण विसर पाडून, आमची मनेच परलोकवादाला टांगून ठेवली. आमचा सारा तेजस्वी वारसा मातीमोल केला. वर्णवर्चस्ववादाच्या विकृतीने, इहलोकी, स्वर्ग निर्माण करण्याची आमची उमेद, आमचे ज्ञान, आमचे कलाकौशल्य, आमचा सारा जगण्याचा वैभवशाली व्यवहारच थांबवला. गुणकर्तृत्वाला क्षुद्र लेखले, मागच्या पुढच्या जन्माचे थोतांड, कर्मविपाकाचे गूढ आणि मूढ तत्वज्ञान, ब्रह्माचा भ्रम, यांच्या नशेत, “ब्रह्मानंदी टाळी लावू”, मक्तीकडे तारवटलेले डोळे लावून आम्हाला बसवण्यात आले. इहलोकांतील सफल जीवनाचे जे आधार-विद्या, सत्ता, संपत्ती आणि श्रम यांच्या जन्मजात मक्तेदा-या निर्माण केल्या. त्या जन्माधिष्टित उच्चनिचता ठासून भरली. आणि इहलोकी जे मिलते ते गुणकर्तृत्वाने मिळत नसून, मागच्या पुढच्या जन्मातील पापपुण्याप्रमाणेच मिळते, अशा संस्कारात जन्मापासून मने भिजवत ठेवून कुजवली. आम्ही इहलोकीची शुद्धच हरवून बसलो. गलितगात्र, हतबल होवून प्रथम ब्राह्मण धर्मातील उच्चवर्णियांचे गुलाम झालो. ते उच्चवर्णियही या भ्रमिष्ठ शिकवणुकीचे गुलामच होते. शेवटी सारा देशच आक्रमकांचा गुलाम झाला. स्वर्गतुल्य भरतखंडाचा मोठा झाला.