व्याख्यानमाला-१९९५-९६-३

“महाराष्ट्राची जडण-घडण आणि यशवंतराव”

कै. यशवंतरावजी चव्हाण यांच्या ८२व्या जयंतीदिनी, मी त्यांच्या प्रतिमेस प्रथम अभिवादन करतो. त्यांच्या नांवे ही व्याख्यानमाला सुरू करून गेली तेवीस वर्षे अखंडपणे चालवणा-या कराड नगरपालिकेस धन्यवाद देतो. या अत्यंत उचित अशा उपक्रमाच्या पाठीशी ज्यांची प्रेरणा आहे ते कराड नगरीचे भूषण ठरलेल्या आणि चव्हाण यांच्या विचारांचे खरेखुरे वारस असलेल्या, मा. पी. डी. पाटील साहेबांचे तर आज विशेष अभिनंदन करतो. विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत ते आजच निवडून आले आहेत. या धवल यशाबद्दल मी माझ्या आणि आपल्या सर्वांच्या वतीने, आपल्या सदिच्छांचे प्रतीक म्हणून, हा हार घालून त्यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो.

विधानसभेच्या निवडणूक निकालाचा आजचा धामधुमीचा दिवस असतानाही, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने व्याख्यानासाठी उपस्थित आहांत, ही मी माझ्या भाग्याची गोष्ट समजतो. तुमच्या रसिक ज्ञानार्जन वृत्तीला अभिवादन करतो.

दोन वर्षांपूर्वी याच दिवशी मुंबईमध्ये प्रचंड बाँबस्फोट झाले. सारा देश हादरला. आजचे निवडणूक निकाल हेही महाराष्ट्रातले राजकीय बाँबस्फोटच आहेत. आज दुपारी भूकंपाचाही हादरा बसला. एकूण महाराष्ट्राची भूमी आणि मनोभूमी आज हादरून गेली आहे. आमचे आजचे राजकारण, अर्थकारण, शिक्षण आणि समाजकारण सारेच भोव-यांत सापडल्यासारखे झाले आहे. एक प्रकारचे अराजक आपल्या भोवती घोंगावत आहे.

अशा मनःस्थितीत आणि परिस्थितीत मी आपल्यापुढे उभा आहे आणि व्याख्यानासाठी “महाराष्ट्राची जडणघडण आणि यशवंतराव” असा विषय निवडला आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीतील स्वातंत्र्यसेनानी म्हणून, सातारा जिल्ह्यातील चळवळीचे “डिक्टेटर” म्हणून कै. यशवंतराव चव्हाण यांनी दिलेले योगदान, आणि राष्ट्रीय नेता म्हणून केंद्र सरकारमध्ये जाऊन, राष्ट्रीय राजकारणांतील त्यांचे कार्यकर्तृत्व, ही चव्हाणसाहेबांच्या जीवन कार्यातील दोन मोठी दालने सोडून, आजच्या महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीचा संदर्भ घेऊन, मी आपल्यापुढे तीन व्याख्याने देणार आहे.

आज महाराष्ट्रातील राजकारणांत, भरवशाच्या म्हशींनी, टोणगेच जन्माला घालण्याचा जो सपाटा लावला आहे, आणि मराठी जनतेला “अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी?” असं म्हणण्याची जी पाळी आणली आहे, अशा वातावरणांत माझी भाषणे आपणांस संदर्भहीन वाटणार नाहीत अशी मला खात्री आहे.

कै. चव्हाणसाहेबांच्या जयंतीनिमित्त ही व्याख्यानमाला सुरू करून, समाज शिक्षणाची, लोकमानस जागवण्याची ही वीणा, कराड नगरपालिकेने गेली तेवीस वर्षे खांद्यावर घेतली आहे, ही गोष्ट खरोखरच कै. चव्हाणसाहेबांची स्मृती जागवणारी आणि त्यांच्या देशभक्तीचा वसा चालवणारी उचित अशी कामगिरी आहे. समाज प्रबोधन, लोकजागरण, आणि त्यातून समाज परिवर्तन हा चव्हणसाहेबांचा एक ध्यास होता. सुधारणा, विकास, परिवर्तन, बदल, क्रांती अगर प्रतिक्रांती या सर्वांचे मूळ ठाणे माणसाचे मन आहे. मन बदलणे, मन जागवणे, मनांत विचार भावनांची जडणघडण करणे, हीच कोणत्याही बदलाची आधारशीला आहे. “जन गण मन” हे आपले राष्ट्रगीत आहे. स्वतंत्र भारतात जन गण मन अधिनायकाचा जय होवो, अशी आपली धारणा आणि प्रतिज्ञा आहे. पण हे जन गण मन जागवण्यासाठी, जनगणांच्या मनाची जडणघडण करण्यासाठी, ते “सोशल” व “रॅशनल” करण्यासाठी, आपण काय करतो? मतांचे हिशोब सारेजण करतात, पण जनगणांच्या मनापर्यंत कुणी जात नाही. लोकमतावर चालणा-या लोकशाही राजकारणांत तर लोकशिक्षणाची मशाल सतत प्रज्वलित ठेवली, तरच राजकारण प्रकाशमय रस्त्यावरून चालते, नाहीतर “अन्धेन इव नियमाना यथा अंधः म्हणजे आंधळ्याने आंधल्याला रस्ता दाखवण्यासारके राजकारण घोटाळते. याच जाण आणि भान ज्यांना नाही, ते लोकशाहीत राजकारण करायला पात्र ठरत नाहीत.