व्याख्यानमाला-१९९५-९६-१

विचारांवर जीवापाड प्रेम करणा-या विचारवंतांची जीवनचरित्रे नेहमीच प्रेरक व मार्गदर्शक असतात. अखिल विश्वाविरूद्धही झगडण्याची क्षमता असलेल्या या विचारवंतांच्या विचारवैभवाने आपण दिग्मूढ होतो. विवेकनिष्ठेचा आग्रह धरणारांची आपल्या देशातील परंपरा ज्या थोड्या लोकांनी जतन केली आहे त्यात यशवंतरावजी अग्रणी आहेत. लोकशाही ही एक केवळ राजकीय प्रणाली नसून ती सर्वव्यापी अशी संकल्पना आहे. ती जीवननिष्ठा झाली पाहिजे. पण भारतीय जातिव्यवस्था आणि लोकशाही यांतील आंतरिक विसंगती नष्ट करण हे त्यांनी आपले महत्वाचे उद्दिष्ट मानले आहे. तेच ध्येय या व्याख्यानमालेच्या आयोजनामागेही आहे.

विचाराने माणसे निर्भय बनतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, समस्येच्या मुळाशी जाण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची, तो बोलून दाखविण्याची, कृतीत उतरविण्याची आणि त्यातूनच समाज व देश यांच्या अभ्युदयासाठी झगडण्याची तळमळ लोकांमध्ये वाढावी हे या व्याख्यानमालेचे उद्दिष्ट आहे.

या व्याख्यानमालेतील व्याख्यानातून यशवंतरावांच्या जीवनचरित्राची केवळ चर्चा होत रहावी हा प्रधान हेतू मुळीच नाही. आज भारतीय समाजाच्या, राष्ट्रीय जीवनाच्या ज्या समस्या आव्हानाचे स्वरूप घेऊन आपल्यापुढे उभ्या राहिल्या आहेत, त्या सामाजिक, आर्थिक, राजकीय समस्यांचा अभ्यासपूर्ण उहापोह अधिकारी व्यक्तींच्या नियोजित व्याख्यानातून व्हावा हाच प्रधान हेतू आहे.

विविध ठिकाणांहून मोठमोठे विचारवंत नगरपालिकेच्या आमंत्रणानुसार कराड येथे येतात. आपले विचार प्रस्तुत करतात. नगरपालिकाही त्या विचारांचे संवर्धन करण्यासाठी पैसा खर्च करून पुस्तक रूपाने ते विचार जतन करते. कारण ज्यांना प्रत्यक्ष येऊन हे विचार ऐकावयाची संधी मिळत नाही, त्यांच्यासाठी या पुस्तकांचा उपयोग व्हावा ही त्यामागील सदभावना आहे. अशा पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी सन १९७९ चे पुस्तक शिवाजी विद्यापीठाने व सन १९८० चे पुस्तक मुंबई विद्यापीठाने एम. ए. ला अधिक वाचनासाठी नियुक्त केले होते. यावरून आस्थेवाईक अभ्यासकांना हा उपक्रम किती उपयुक्त ठरत आहे याची प्रचीती येते. लोकसंवादासाठी नगरपालिका हा वागयज्ञ उभारीत आहे.

हे शब्दांकित स्वरूप प्रकट होतांना नगरपालिका नगरवाचनालयाचे माजी ग्रंथपाल श्री. विठ्ठलराव पाटील यांचा यशवंतराव हा व्यासंगाचा व आस्थेचा विषय असल्यामुळे त्यांनी जणू हे स्वतःचेच काम असल्याचे मानून कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता जे अथक परिश्रम घेतले आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मानणे आवडणार नाही, म्हणून त्यांचा येथे कृतज्ञतापूर्वक उल्लेख करीत आहे. लोकमान्य मुद्रणालयाचे संचालक श्री. प्रमोद गिजरे आणि त्यांचे कुशल मेहनती कामगार यांनी हे व्याख्यान-पुस्तक वेळेवर व सुबक छापून दिलेबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

आमच्या विनंतीस मान देऊन मा. प्राचार्य पी. बी. पाटील, सांगली, मा. राम प्रधान, मुंबई व प्रा. ग. प्र. प्रधान, पुणे या तीन थोर विचारवंतांनी या मालेत व्याख्याने दिली त्याबद्दल त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानणे आमचे कर्तव्य आहे.

हे व्याख्यान – पुस्तक आपल्या हाती देतांना ज्यांच्यासाठी उदंड आयुरारोग्य लाभावे अशी करुणा भाकावी त्या यशवंतरावांच्यावर मृत्यूचा घाला पडला आणि या देशातील अतिशय थोर, तळागाळातल्यांविषयी अखंड आत्मीयता बाळगणारा सर्वगुणसंपन्न असा जाणता नेता, कृष्णा कोयनेच्या पवित्र संगमाच्या कुशीत कायमचा विसावला आहे. प्रबोधनाची गंगोत्री नियतीच्या आघाताने अबोल झाली. जनसामान्यांची रसिकता फुलविणारा कृष्णा-काठ मूक झाला. आता उरल्या फक्त पवित्र स्मृति. त्यांच्याच स्मृतिला हे व्याख्यान-पुस्तक समर्पण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहे.

अशोक शिवराम भोसले
नगराध्यक्ष