व्याख्यानमाला-१९९५-९६-४२

सांगली जिल्ह्याच्या अभ्यासांत, जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करूनही, सर्वांचे “पुनर्वसन” जिल्ह्यातच शक्य आहे. जिल्हा सोडून, आज जी कुटुंबे घर, गांव सोडून देशोधडीस लागतात, ते मायग्रेशन थांबवता येईल. बेकारी पूर्णपणे संपवता येईल आणि २० वर्षांच्या काळांत सर्वांचे जीवनमान दीडपटीने वाढवता येईल. असा विकास आराखडा आम्ही नियोजित केला होता. १९८० सालानंतर त्या नियोजनाप्रमाणे जिल्हा विकास योजना आखून कार्यक्षमतेने पार पाडल्या असत्या तर २००१ सालापर्यंत सांगली जिल्हा हा एक समतोल विकासाचा आदर्श जिल्हा म्हणून २००१ साली सा-या देशापुढे उभा करता आला असता. महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रत्येक जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी बळकट पायावर खालून वर नियोजन कसे करत येते याचा एक नमुना तयारझाला असता.

आम्हाला आमच्या विकासाचा आराखडा नको आहे, युरोपीयन विकासाची कॉपी करायला हवी आहे. सारा हिंदुस्तान शहरी, औद्योगिक, संघटित करायच्या स्वप्नांत आम्ही सारे तरंगत आहोत. ज्याला ज्या संधी मिळेल तो भारत सोडून “इंडिया” त जाऊन रहातो आहे. “दिसायला हिंदुस्थानी पण आचाराने विचाराने विलायती” असे भ्रमिष्ट विदुषक, आमच्या पुढा-यांच्या, तज्ञांच्या, शिक्षितांच्या रूपाने आज देश चालवीत आहेत.

महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि जगाच्याच जडणघडणीमध्ये, पारंपारिक सुधारणा, परिवर्तन, विकास या सर्व कल्पनांना एक वेगळी दिशा दिली आहे ती आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाने. ओद्योगिक क्रांतीने धर्मकल्पना समाजव्यवहारांतून बाजूला करून “इझम” आणले. उत्पादन व्यवस्था, अर्थव्यवस्थेशी निगडित असलेल्या आणि गेली दीड दोनशे वर्षे ज्यावर हमरीतुमरीव येऊन वाद झाले ते सारे इझमही आता संदर्भहीन ठरू लागले आहेत. त्याचे मुख्य कारण उत्पादन, वितरण व्यवस्थेत विज्ञान तंत्रज्ञानाने केलेली प्रचंड क्रांती हे आहे. तेवढेच भांडवल आणि तेवढेच श्रम घालून नव्या तंत्रज्ञानाने जर शंभर पट उत्पन्न काढून दिले, तर मग भांडवल मोठे की, श्रम मोठे या वादांत काही अर्थच रहात नाही. सा-या जगातच नव्या व्यवस्थेचा विचार आवश्यक झाला आहे. नवी समाजव्यवस्था कशी असावी याबद्दल सारे जग विचारांत पडले आहे. जगातील सर्व राष्ट्रांची जी संयुक्त संघटना आहे, युनो – त्यांच्या अनेक परिषदातून जागापुढील नव्या नव्या समस्याबद्दल विचारविनिमय होत असतो. ठराव होतात, इषारे दिले जातात,धोके समजून सांगितले जातात. सार्वभौम राष्ट्र ही कल्पना मागे पडत आहे. सार्वभौम राष्ट्रानांही काही नियम, बंधने पाळावी लागत आहेत. विज्ञानाने सारे जग इतक्या जवळ आणले आहे, विचारांची, वस्तूंची देवाण घेवाण इतकी वेगाने चालली आहे की, सारे जग एखाद् लहानशा खेड्यासारखे झाले आहे. युनोमध्ये सा-या जगापुढील समस्यांचा विचार होतो. त्यांत लोकसंख्या, बालमृत्यु, महिला आरोग्य, बालसंगोपन, बालकांचे हक्क, महिलांचे प्रश्न, शिक्षणाचे, आरोग्याचे प्रश्न, हवा, पाणी, जंगले पर्यावरण, अशा कितीतरी प्रश्नांची चर्चा चालते. सारे जग एक कुटुंब आहे याची जाणीव जेवढ्या वेगाने आजचे विज्ञान देत आहे, तेवढा वेग यापूर्वी कधी मनुष्याने अनुभवला नव्हता. हे सारे प्रश्न आणि मानवापुढील या सा-या समस्या, यांचे उत्तर भांडवलशाही देऊ शकत नाही, साम्यवाद देऊ शकत नाही समाजवादही नाही, या प्रश्नांची सारी उत्तरे विज्ञान, तंत्रज्ञानही देऊ शकत नाही. कारण माणसाचा स्वभाव, माणसाचे मन बदलण्याचे तंत्र सार्वत्रिक करता येत नाही. शास्त्रज्ञ आम्हाला सांगताहेत की, जगण्याच्या भौतिक गरजा कशा भागवायच्या याची काळजी करू नका, विज्ञानतंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगांत आज जेवढी लोकसंख्या आहे, त्याच्या दुप्पट जरी लोकसंख्या झाली तरी, त्यांच्या गरजा भागवण्याची जबाबदारी आजही घेता येईल. आजच्या पेक्षा शंभर पटीने आम्ही उत्पादने सहज वाढवू शकतो, गेल्या दहा हजार वर्षात मनुष्याने जे आणि जेवढे निर्माण केले तेवढे दहा वर्षांत निर्माण करण्याची शक्ती, विज्ञानांत आहे. वस्तूंची निर्मिती विज्ञानावर सोपवा. “सायन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स” “सायन्स ऑफ जेनेटिक्स” यांनी माणसाच्या हातात केवढे सामर्थ्य आणून दिले आहे, याची अजून कल्पना नाही, प्रश्न आहे हा माणूस फक्त आपल्या गरजा भागल्यानंतर थांबणार आहे काय? माणसाला केवळ गरजा भागवण्याची चिंता आहे की, तो लोभापाठीमागे लागला आहे? त्याचा लोभ त्याला आत्मनाशाकडे नेईल आणि लोभी माणसाच्या हातात विज्ञान तंत्रज्ञान आले तर स्वतःचा आणि सा-या जगाचा तो वेगाने नाश करेल. म. गांधीही म्हणत होते. “नेचर इज इनफ टू सॅटिस्फाय नीड्स ऑफ ऑल, बट नॉट इनफ टू सॅटिस्फाय द ग्रीड ऑफ द फ्यु” “सर्वांच्या आवश्यक अशा सर्व गरजा भागवण्यास निसर्ग समर्थ आहे, परंतु थोड्यांचाही लोभ भागविणेस निसर्ग पुरणार नाही.”