व्याख्यानमाला-१९९२-२ (35)

शेतीचा प्रश्न हा केवळ आर्थिक प्रश्न नसतो हेही इथं आपल्याला जाता जाता सांगितलं पाहिजे. शेतीचे प्रश्न आपण केवळ आर्थिक जे मानतो त्यामुळे शेतक-यांना सबसिडी देणं, कर्जमाफी देणं, हा केवळ आर्थिक प्रश्न नाही तर या सर्व तंत्रज्ञानाचा शेतीवर होणारा बहुपदरी व दूरगामी परिणाम आहे, ते देखील लक्षात घेतलं पाहिजे. काल मी हरित क्रांतीबद्दल बोललो. हरित क्रांतीमध्ये वापरली गेलेली हायब्रीड बियाणे, रासायनिक खते, जंतुनाशके, कीटकनाशके या सर्वांचा जो काही बरावाईट परिणाम पिकांवर, शेतीजमिनीवर, गुराढोरांवर होतो तो लक्षात घेण्याची फार आवश्यकता आहे. या सर्व गोष्टींमुळे माणसांना निःसत्व अन्न मिळते. गुरांना चारा मिळत नाही. विषबाधा होऊन गुरंढोरं मरतात. जमीन निकस, नापीक होते. कालांतरानं जमिनीचं वाळवंटीकरण होतं. आपण सारे शेतीजीवनाशी संबंधित असल्यामुळे हे सर्व प्रश्न फार तपशील सांगावेत असं काही मला वाटत नाही. मुद्दा असा की शेतीचा विकास करीत असताना संपूर्ण समाजव्यवस्थेच्या अंगाने, परंपरेच्या अंगाने विचार करावा. मघाशी मी असं म्हणालो होतो की कुठल्याही तंत्रज्ञानाची निवड ही एका सांस्कृतिक चौकटीत करायची असते. तेव्हा इतर शेतीप्रधान देशांच्यामध्ये यशस्वी झालेलं तंत्रज्ञान आपल्या येथे सुद्धा यशस्वी होईलच असे नाही. पर्यायाची निवड आपल्याला इथली विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक संदर्भ लक्षात घेऊन करावी लागेल. या देशाचे जे सामाजिक – सांस्कृतिक संदर्भ आहेत, जी परंपरा आहे तिचाही विचार आपल्याला करावा लागेल. जुनं जे सगळं काही आहे ते गाडून टाकावं आणि सगळं काही नव्याने सुरू करावं असं ठरवून होणार नाही. नवीन गोष्टींचा आंधळेपणाने स्वीकार करणं, विश्वास ठेवणे, नवीन तंत्रज्ञानावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे आपल्याला आत्मघातक ठरलेलं आहे हे आतापर्यंतच्या विकासाच्या क्रमात आपल्या लक्षात यायला हरकत नाही. तंत्रज्ञानाची निवड ही नैतिक निवड आहे. उपलब्ध पर्यायांपैकी कोणत्याची निवड करायची आहे हे आपल्याला नैतिक निकषांवर ठरवावे लागेल. नवीन तंत्रज्ञान जे निवडायचं ते नैतिकदृष्ट्या चांगलं असलं पाहिजे.

आता नैतिकदृष्ट्या चांगलं पाहिजे म्हणजे काय? मी म्हटल्याप्रमाणे एकतर ते सर्वांच्या लाभाचं असलं पाहिजे. सर्वांचया लाभाचं जे तंत्रज्ञान नसेल ते कितीही कार्यक्षम असलं तरी आपल्याला ते सोडावं लागेल. नैतिक निकषावर निवड करायची म्हणजे माणूस हाच फक्त या सबंध सृष्टीचा नायक आहे हे गृहीत आपल्याला सोडून द्यावे लागेल. आजपर्यंत विकासाचं जे चिंतन पश्चिमी देशांच्यामध्ये  - विशेषतः या उदारमतवादी लोकशाही भांडवलशाही देशांमध्ये झालेलं आहे ते माणूसकेंद्री दृष्टीनं झालेलं आहे. माणसाचा विकास होतोय ना? मग प्राणीसृष्टी नष्ट झाली तरी चालेल, जंगलं नष्ट झाली तरी चालतील. माणूस हा मध्यविंदू आहे असं मानून आजच्या सबंध विकास प्रतिमानाची उभारणी करण्यात आलेली आहे. माणूस हा मध्यवर्ती आहे म्हटल्यानंतर त्यातही मग जो माणूस धनवान असेल, बलवान असेल तो माणूस अधिकच मध्यवर्ती ठरतो. म्हणजे माणसासाठी सृष्टीतल्या कशाचाही बळी द्यायचं एकदा पत्करलं की मग बलवंत माणसांसाठी कमकुवत माणसांचा बली देणंसुद्धा क्षम्य ठरतं, तर्कसंगतच ठरतं. नैतिकतेची निवड करायची ती इथे. नैतिकतेने निवड करायची असेल तर मग माणूस हाच केवळ विकासाचं लक्ष्य असू शकत नाही. विकास हा समग्र सृष्टीचा एकत्रितपणे समन्वितपणे करावा लागेल. हा विकास समन्वित व्हावा लागेल ही गोष्ट महत्वाची आहे. जमीन, पाणी, जंगलं यावर केवळ पिढीची मालकी नाही. कायमस्वरूपी अर्थ-सिस्टिमची ती अंगं आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर जेवढा माणसाचा हक्क आहे तेवढाच इतरही जीवांचा हक्क आहे. इतरही जीवांना या पृथ्वीवर जगण्याचा हक्क आहे. आणि तो जेवढा आजच्या माणसाला आहे तेवढा उद्याच्याही माणसाला आहे. येणा-या सर्व पिढ्यांचा तो हक्क आहे. आपण जर या संसाधानांचा उपयोग निष्काळजीपणे केला, स्वीर्थीपणे केला. ओरबाडून घेतल्यासारखा केला तर मगा नंतरच्या पिढ्यांना संसाधनसंपत्तीपैकी कुठल्याच गोष्टी शिल्लक राहणार नाहीत. अशा परिस्थितीत हा विकास चिरंतन विकास होऊ शकणार नाही. मग तंत्रज्ञानाची निवड करताना विकास चिरंतन व्हावा, कायम स्वरुपाचा विकास व्हावा आणि त्यातून स्थिर समाजाची उभारणी व्हावी हे आपल्याला करावं लागेल. तेव्हा तंत्रज्ञान असं असावं की जे स्वामित्वार आधारित नसेल. सृष्टीच्या कायम अस्तित्वाचा विचार करणारं असावं, आज चराचरसृष्टीसह माणसाचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. विषारी वायू सगळीकडे पसरताहेत, अँसिडचा पाऊस पडतोय आणि ओझोनचा थर फाटतोय या सगळ्यांच्यामागे आम्ही स्वीकारलेली विनाशकारी विकासाची वाट आहे. आपण वेळीच सावरलो नाही तर सृष्टीचा अंत अपरिहार्य ठरणार आहे.