व्याख्यानमाला-१९९२-२ (30)

तंत्रज्ञानाची निवड करणे हा अभियांत्रिकीच्या क्षेत्रातला विषय नसून हा मानवी क्षेत्रातल, सामाजिक क्षेत्रातला विषय आहे, मानवी संदर्भात घेतला जाणारा निर्णय आहे, कोणतं तंत्रज्ञान घ्यायचं? याचं उत्तर मानवी जीवनाला पोषक होईल असं तंत्रज्ञान घ्यायचं असेच असू शकते. जे तिथल्या सांस्कृतिक चौकटीमध्ये हुबेहूब बसत असेल ते तंत्रज्ञान घ्यायचं. केवळ कार्यक्षमतेचा निकष लावून चालणार नाही. अमुक एक यंत्र दहा माणसांचं काम करतं, अमुक एक यंत्रणा काही मिनिटांमध्ये प्रश्न, गणित वगैरे सोडवतं ही कार्यक्षमता झाली, पण एवढ्या आधारावरती आपण ते तंत्रज्ञान घ्यायचं का? ते जर १० माणसांना बेकार करीत असेल, ते जर १० माणसांना कुठल्यातरी धनिक माणसावर अवलंबून ठेवीत असेल तर, हे तंत्रज्ञान आपण घ्यायचं का?

तंत्रज्ञानाची निवड ही मानवी निकषांवर करावी लागले आणि सांस्कृतिक चौकटीच्या संदर्भात करावी लागले. पश्चिमी देशांच्यामध्ये जिथे मनुष्यबळ कमी आहे अशा देशांच्यामध्ये उपयुक्त ठरलेलं तंत्रज्ञान मनुष्यबळ विपुल असलेल्या आपल्यासारख्या देशामध्ये कदाचित गैरलागू ठरु शकेल. आपल्याला हे ठरवावं लागेल. तंत्रज्ञानाची निवड कशाच्या आधाराने कारयची? गांधींनी हे सांगितलंय. तंत्रज्ञानाची निवड करायची? कोणतं तंत्रज्ञान चांगलं? जे तंत्रज्ञान मानवी अवयवांचा विस्तार असतं, पर्याय नव्हे, ते तंत्रज्ञान चांगलं. माणसाचा हात जिथपर्यंत पोचत नाही तिथं थोडं आणखीन पुढं जाण्याची मदत त्या तंत्रज्ञानानं झाली पाहिजे. मानवी अवयवांचा ते पर्याय होता कामा नये, तर मानवी अवयवांचा विस्तार असं स्वरूप त्या तंत्रज्ञानाचं असलं पाहिजे. विनोबा भावे असे म्हणतात की, तंत्रज्ञान कोणतं चांगलं? जे पाच बोटांनी वापरलं जातं ते तंत्रज्ञान चांगलं. तीन बोटांनी वापरलं जातं ते नव्हे. “पुश बटन टेक्नॉलॉजी” ही या देशाच्या कामाची नाही. पाच बोटांनी ज्याची पकड घेता येईल अशाप्रकारचं तंत्रज्ञान म्हणजे जे सर्वांसाठी, सर्वींचा सहभाग ज्याच्यामध्ये होऊ शकेल ते तंत्रज्ञान इष्ट. ही पहिली कसोटी.

दुसरी कसोटी अशी की तंत्रज्ञानाने मानवी जीवन समृद्धा झालं पाहिजे, तंत्रज्ञानाने मानवी जीवन कंगाल होता कामा नये. जे तंत्रज्ञान मानवी जीवनाच्या कंगालीकरणाला, मानवी जीवनाच्या दास्याला कारणीभूत असेल ते तंत्रज्ञान ग्राह्य नाही. स्टॅलिनने असं सांगितलं की आमचा देश गरीब आहे. आम्हाला एक बलाढ्य जागतिक सत्ता व्हायचं आहे. त्याच्यामुळे आमची वाटेल तितकी आयुष्यं बेचिराख झाली तरी चालतील, मातीत गेली तरी चालतील, शेकडो माणसे मेली तरी चालतील, आमचा देश मोठा झाला पाहिजे. आणि त्यानं हजारोंचा बळी घेतलाय. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, यातून त्याचा देश अल्पावधीत मोठा झाला, एक जागतिक सत्ता म्हणून बरीच वर्षे मिरवला. पण या तंत्रज्ञानाचा अंतिम परिणाम काय झाला? जे तंत्रज्ञान मानवी जीवनाला गौण लेखतं, जे तंत्रज्ञान मानवी जीवनाला कवडीमोल देतं ते तंत्रज्ञान अंतिमतः कधीही उपयुक्त ठरु शकत नाही. मानवी जीवन उन्नत करणारं तंत्रज्ञान, मानवी जीवन समृद्ध करणारं तंत्रज्ञान, मानवी जीवन परिपूर्ण करणारं तंत्रज्ञान हेच सर्वतोपरी ग्राह्य ठरतं.