व्याख्यानमाला-१९९२-२ (34)

तंत्रज्ञानाची निवड करताना हाही निकष आपल्याला लावला पाहिजे की ज्या तंत्रज्ञानामधून आणि विज्ञानामधून माणूस माणसाला दुरावणार नाही, माणसातला जिव्हाळा करपणार नाही अशाप्रकारचं तंत्रज्ञान घेणं आवश्यक आहे. कोणी असं म्हणेल की या सगळ्या गप्पा आहेत, आधी जोपर्यंत वैपुल्य येत नाही तोपर्यंत हे काहीच शक्य नाही. कुठलीही गोष्ट भरपूर पाहिजे. भरपूर अन्नधान्य पाहिजे, भरपूर वस्त्र निर्माण झाली पाहिजेत, आणि मग आपोआपच या सगळ्या गोष्टी साध्य होतील. तोपर्यंत याची काळजी करण्याची काही गरज नाही. उच्च तंत्रज्ञान वापरायचं आणि उच्च तंत्रज्ञान वापरल्यानंतर जेव्हा वैपुल्य निर्माण होईल, जेव्हा भरपूर साठा होईल, प्रत्येक गोष्टींचा तेव्हा आपण रोजगाराचं बघू, तेव्हा आपण ह्या निर्मितीक्षमतेचं बघू, तेव्हा आपण ह्या मानवी संबंधांचं बघू. नाही असं करताच येत नाही. गांधीजींनी सांगितलं होतं स्वराज्य मिळण्याची प्रक्रिया हेच स्वराज्य असायला पाहिजे. त्यातूनच माणूस स्वतंत्र झाला पाहिजे, मुक्त झाला पाहिजे. माणसाच्या मुक्तीची प्रक्रिया हे त्याच्या मुक्तीचं साध्य असतं. म्हणूनच साधने आणि साध्य अविभाज्य असतात हा जो गांधींचा सिद्धांत होता तो इते लागू पडचो, तंत्रज्ञानाची निवड करताना हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की साध्ये आणि साधने वेगळाली असू शकत नाहीत. आम्हाला भरपूर विकास करावयाचा आहे. आम्हाला भरपूर अन्नधान्य पिकवायचं आहे. म्हणून हायब्रीड वापरू. हायब्रीड वापरून एकदा भरपूर अन्नधान्य झालंकी मग उपासमारीचे व दारिद्र्याचे सगळ्यांचे प्रश्न मिटतील. असं होत नाही. सहकारामधून आम्ही आधी साखर निर्माण करू. नंतर ती निर्यात करू. त्यातून जे पैसे येतील त्यातून अन्नधान्य विकत घेऊ आणि लोकांना ते देऊ. असं होत नसतं. विकासाची प्रक्रिया हाच विकास असला पाहिजे. आधी विकासाची प्रक्रिया पूर्ण करू, नंतर मग रोजगाराचं बघू. असं होत नसतं. असं होऊ शकत नाही. स्वराज्य मिळण्याची प्रक्रिया हेच स्वराज्य असलं पाहिजे. आपण शस्त्राच्या बळावर स्वराज्य मिळवू आणि नंतर लोकशाही आणू हे शक्य नाही. त्यातून हुकूमशाही, लष्करशाहीच येणार! कामाची सक्ती करू, माणसाचे हक्क सगळे तुडवून टाकू आणि काही काळ माणसांचे स्वातंत्र्य तुडवल्यानंतर पुढे कधीतरी आपलं राष्ट्र मोठं होईल तेव्हा परत मग त्यांना हक्क देऊ असं स्टॅलिनचं म्हणणं होतं. पण काय झालं ते जगानं पाहिलेच आहे. त्याशिवाय वेगळं काहीही होणं शक्यच नव्हतं. कारण गुलामी ही अशी नंतर कधीही नष्ट होत नसते. ती त्या क्रमातच नष्ट करायला पाहजे. स्वराज्य मिळण्याची जी प्रक्रिया आहे तीच मुळात स्वराज्याचे साधन असली पाहिजे. स्वराज्य मिळाल्यानंतर आपण सदाचारी होऊ. तोपर्यंत कुठल्याही सूक्तासूक्त मार्गाचा वापर केला तरी चालेल असा एकदा जर आपण निर्णय घेतला तर मग सन्मार्गावर येण्याची कुठलीही शक्यता शिल्लक रहात नाही. तंत्रज्ञानाची निवड करतानासुद्धा आधी आपण वाटेल ते तंत्रज्ञान वापरू, हायब्रीड वापरू, खूप उत्पादन करू. नंतर मग शेतीची व्यवस्था पुन्हा आपण नीट करू असं आपण मानत असू तर हे स्पष्ट सांगायलाच हवं की तसं ते होऊ शकत नाही.