२१. स्त्री अथवा पुरुष, जे स्वत:च्या हितासाठी न्यायाने राज्य करणा-या संस्थानिकांवर अथवा राज्यावर अथवा एकंदर सर्व प्रजेने मुख्य केलेल्या प्रतिनिधीवर बंड करुन लक्षावधी लोकांची कुटुंबे उघडी पाडीत नाहीत अथवा बंड करणारांस मदत देत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२२. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या कुटुंबासह, आपल्या भाऊबंदास, आपल्या सोय-याधाय-यांस आणि इष्टमित्र साथ्यांस मोठ्या तो-याने पिढीजाद श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यांस पिढीजाद कपटाने अपवित्र मानून त्यांस नीच मानीत नाहीत. त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२३. स्त्री अथवा पुरुष, जे पूर्वी कपटाने लिहिलेल्या ग्रंथाच्या वहिवाटीवरुन काही मानवासंच पिढीजाद दास मानीत नाहीत अथवा दास मानणा-यांचा बोज ठेवित नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२४. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या लोकांचे वर्चस्व मुद्दाम राहण्याकरिता शाळेमध्ये शिकविताना इतर लोकांच्या मुलांबरोबर दुजाभाव करण्याचा धि:कार करीतात, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२५. स्त्री अथवा पुरुष, जे न्यायाधिशाचा हुद्दा चालवितांना अन्यायी लोकांचा त्यांच्या अन्यायाप्रमाणे त्यास योग्य शिक्षा देण्यास कधीही पक्षपात करीत नाहीत अथवा अन्यायाने पक्षपात करणा-यांचा धि:कार करितात, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२६. स्त्री अथवा पुरुष, जे चांभाराच्या घरी का होईना, बिगा-यांचा धंदा करुन आपल्या निर्वाह करणा-यांस तुच्छ मानित नाहीत; परंतु त्याकामी मदत करणारांचा आदरसत्कार करितात, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२७. स्त्री अथवा पुरुष, जे चांभाराच्या घरी का होईना, बिगा-यांचा धंदा करुन आपल्या निर्वाह करणा-यांस तुच्छ मानित नाहीत; परंतु त्याकामी मदत करणारांची वहावा करितात, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२८. स्त्री अथवा पुरुष, जे स्वत: उद्योगधंदा न करता निरर्थक धार्मिकपणाचा डौल घालून अज्ञानी जनांस नवग्रहांची पीडा दाखवून त्यांस भोंदाडून खात नाहीत अथवा तत्संबंदी पुस्तके करुन आपली पोटे जाळीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
२९. स्त्री अथवा पुरुष, जे भाविक मूढांस फसवून खाण्याकरिता ब्रह्मर्षींचे सोंग घेऊन त्यांस अंगाराधुपारा देत नाहीत, अथवा तत्संबंधी मदत करीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
३०. स्त्री अथवा पुरुष, जे कल्पित देवाची शांती करण्याचे निर्मित्ताने अनुष्ठाने बनून अज्ञानी जनांस भोंदाडून खाण्याकरिता जपजाप्य करुन आपली पोटे जाळीत नाहीत, अथवा तत्संबंदी मदत करणारांचा बोज ठेवित नाहीत, त्यांस सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
३१. स्त्री अथवा पुरुष, जे आपली पोटे जाळण्याकरिता अज्ञानी जनांत कलह उपस्थित करीत नाहीत अथवा तत्संबंदी मदत करणा-यांच्या सावलीसदेखील उभे राहत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
३२. स्त्री अथवा पुरुष, जे आपल्या सर्वांच्या निर्मिकाने निर्माण केलेल्या प्राणीमात्रापैकी मानव स्त्री-पुरुषांमध्ये कोणत्याच त-हेची आवडनिवड न करतां त्याचे खाणेपिणे व लेणें-नेसणे याविषयी कोणत्याच प्रकारचा विधीनिषेध न करिता त्यांच्याबरोबर शुद्ध अंत:करणाने आचरण करितात, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.
३३. स्त्री अथवा पुरुष, जे एकंदर सर्व मानव स्त्री-पुरुषांपैकी कोणाची आवड निवड न करिता त्यातील महारोग्यास पंगूस व पोरक्या मुलांस आपल्या शक्त्येनुसार मदत करतात अथवा त्याला करणा-यांस सन्मान देतात, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावेत.