व्याख्यानमाला-१९८९-२५

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे 'गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करुन द्या. तो गुलाम बंड करुन उठेल' महान तत्त्ववेत्ता होमर म्हणाला 'गुलामी' म्हणजे काय? अर्धा माणूस काढून घेणं. त्याच्यातला माणूस काढून घेणं. आमची संस्कृती काय होती? त्याच्यातला माणूस काढून घ्यायचा, त्यांचं रक्त हिरावून घ्यायचं, त्याच्यातला बुद्धीवाद दडपून टाकायचा, त्याच्या सृजनशील क्रिया असतील त्या मारुन टाकायच्या आणि मग आम्ही कसे शहाणे आहेत ते बघा. ही काय संस्कृती झाली?

काय काय पद्धती होत्या आमच्यात? स्त्रियांना शूद्र म्हणणारी आमची पद्धती ! अस्पृश्य माणूस शहरामध्ये कसा यायचा !  दुपारच्या वेळीच का ! सूर्य डोक्यावर असतो. सावली पायाखाली असते ! चार वाजता आला असता तर काय झालं असतं. सावली लांब पडते आणि सवर्ण माणसाच्या पडली अंगावर तर काय झालं असतं. 'विटाळ' अस्पृश्य माणसानं रस्त्यावर कसं यायचं. कमरेला झाडू बांधून यायचं ! म्हणजे त्याच्या पावलाचे ठसे उमटलेले त्याच्या पाठीमागच्या झाडूनं पुसून जावेत म्हणून ही जागरुकता ! सुवर्ण माणसाचा पाया जर त्याच्या ठशावर पडला तर विटाळ होईल ! अस्पृश्य माणसाने रस्त्यावर थुंकता कामा नये. का ? त्या थुंकीवर सवर्णाचा पाया पडला तर विटळ होईल. खुद्द एकनाथ सांगतात - महाराच्या पोराला कडेवर घेऊन पाणी पाजले त्याचे काय कौतुक ! पण एकनाथ काय म्हणाले -

"अंत्यजाला विटाळ ज्यासी । गंगास्नाने शुद्धत्व त्यासी ।।
ते गंगास्थान अंत्यजासी । शुद्धत्वास अनुपयोगी ।। "

मराठी विभागात एकनाथ शिकविला जातो. अस्पृश्य माणसाचा स्पर्श झाला तर गंगास्थान करावं म्हणजे माणूस शुद्ध होतो. पण अंत्यज (अस्पृश्य) म्हणाला मला शुद्ध व्हायचं आहे. गंगास्नान उपयोगी नाही. मित्र हो, ही सामाजिक आणिबाणी आहे. राजकीय आणिबाणीशी आम्ही मुकाबला केला. पण या देशामध्ये लादलेली मनुप्रणीत सामाजिक आणिबाणी आम्ही मोडू शकलो नाही. राजकीय स्वातंत्र्याचा फायदा झाला. पण सामाजिक आणि आर्थिक क्रांतीशिवाय लोकशाही अपेशी ठरते हे आता आम्हाला कळू लागलेलं आहे.

चाळीस ते बेचाळीस वर्षाच्या लोकशाहीचा अनुभव काय? स्त्री म्हणजे भोगदासी वस्तू, ती पापी, ती कुलटा, म्हणून तिनं विधवा राहिलं पाहिजे. म्हणून तिनं सती गेलं पाहिजे. गुजराथमध्ये काय पद्धत होती. मुलगी जन्माला आली की, तिला धंगाळभर पाण्यामध्ये बुडवून मारलं जायचं, पापी ना ! पण आईला ते फार वाईट वाटू लागलं, निर्दयी वाटू लागलं. पण आपल्याकडे आयडियाच असली पाहिजे. आजचा हा माझा विषय वेगळा असल्यामुळ सगळी थिअरी मी सांगत नाही. आयडिया म्हणून आपणाला इंडिया हे नाव पडलं असं वाटतं मला. तर आईच्या स्तनाला विष लावायचे पण त्याच्या अगोदर एक प्रयोग केला. पाण्यात नका मारू म्हणाले, का?  पाणी म्हणजे अमंगलतेचं वाहक आहे. मग पाण्याच्या ऐवजी घंगाळभर दुधात बुडवून मारलं जायचं. पावित्र्याचा तेवढाच टच. पण आईला तेही वाईट वाटू लागलं. तेव्हा आईच्या स्तनाला थोडं विष लावलं जायचं. म्हणजे मुलगी जन्मली, एकाच वेळी दूध विष एकत्र ! का  तर महान संस्कृती.