व्याख्यानमाला-१९८९-२३

माझ्या एका मित्राशी बोलतांना विषय असा निघाला की, गांधी जयंतीचा शिवजयंतीचा विषय निघाला. तो म्हणाला, परिपत्रक काढून जयंत्या साज-या होतात. या जयंत्या साज-या करण्यासाठी आम्हाला परिपत्रके काढावी लागतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची एकच जयंती अशी आहे की जगामधल्या अनेक महान पुरुषांमध्ये सर्वात मोठी कोणती जयंती असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरू आहेत जोतिराव फुले आणि कबीर हा समाज राजर्षी शाहू महाराज विसरु शकला नाही. आमच्या स्त्रिया जोतिराव फुल्यांना विसरु शकत नाहीत. प्रबोधनकार ठाक-यांचं-बाळठाक-यांचं नाही - 'माझी जीवन गाथा' पुस्तक वाचा तुम्हाला त्या काळच्या समाजाच वर्णन कळेल.

त्यावेळच्या आमच्या स्त्रियांना साधी पायात वहाण घालून फिरायला सुद्धा मुभा नव्हती. हे जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या गोगदरी गावातल्या पाराच्या समोरून जाणा-या आमच्या शेतकरी बायका मला आठवतात. पाटील लोक पारावर बसलेले असायचे आणि बायका नदींवर धुणं धुवायला निघायच्या. मंडळी बसलेली, पायात चपला घालून त्यांच्या समोरून जायच नाही. म्हणजे पारासमोरून जायच्यावेळी तेवढ्या वाहणा ( चपला) हातात धरुन जायच्या. ते अंतर संपलं की परत वाहणा घालायच्या वाहणा घालणे हे रांडेचं लक्षण आहे असं उच्चवर्ग समजायचा स्त्रीपाय करायला सुद्धा स्त्रिया मिळायच्या नाहीत त्याकाळी. आता काळ बदलला. का बदलला ? महात्मा फुल्यांच्या चळवळीचा हा संबंध रेटा, आंबेडकरी चळवळीचा हा संबंध रेटा, सर्वदूर महाराष्ट्रात पोहोचलेल्या दोनच चळवळी. एक सत्यशोधक समाजाची चळवळ आणि दुसरी आंबेडकरी चळवळ.

आपल्यासमोर हा विषय एवढ्या विस्ताराने मी मांडतो कारण सामान्य माणसाचं अंत:करण ज्या चळवळीला आहे. ती चळवळ जगातल्या सर्व चळवळीमधली महान चळवळ आहे. जिचा आधार सामान्य माणूस आहे. म्हणून जोतिराव फुल्यांना आपल्या संबंध समाजक्रांतीच्या चळवळीचं एक हत्यार दिसलं ते शिक्षण. तुमच्या समाजामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर तुमच्या समाजापर्यंत ज्ञान पोहोचविलं पाहिजे, विज्ञान पोहोचविलें पाहिजे तर तुमचा समाज माणूसपणाच्या योग्यतेच्या पातळीपर्यंत येऊ शकेल. म्हणजे माणसाचं पशूपण संपून त्याच्यातला सुंदर-सुसंपन्न माणूस निर्माण होईल. असा सुंदर माणूस ज्याला मानवी जीवनातलं सुसंपन्न ज्ञान झालेलं आहे. मानवी जीवनामधल्या सुसंस्कृत ज्ञानाशी ज्याचा संबंध आलेला आहे असा एक चांगला माणूस निर्माण होईल. म्हणून जोतिराव फुल्यांनी या चळवळी केल्या. तडजोडी केल्या नाहीत. लेनिननेही एका ठिकाणी म्हटलंय 'जर तडजोडी चालूच राहिल्या तर त्या क्रांतीला खाऊन टाकतील.'

चिपळूणकर लिहू लागले की जोतिराव फुल्यांची चळवळ काय हडपसर ते भांबुड्यापर्यंतची, ही काय चळवळ आहे काय? आणि जोतिराव फुल्यांची भाषा काय गावंढळ आहे? मराठीचे प्राध्यापक-समीक्षक, दलित आत्मकथनासंबंधी बोलतात तसे चिपळूणकर बोलायचे. ही आत्मकथा रांगडी आहे. कारण त्यांची  आहे.  रांगडी असणारच. जे जीवन त्यांच्या भाषेत आहे त्यात मांडणारच ते, हजारो माणसांना कळण्यासाठी सोपं लिहावं लागतं. मूठभर माणसासाठी लिहिणं हे ज्ञानाच्या परिवर्तन चळवळीचं गमक नाही. आज चिपळूणकर ह्यात पाहिजे होते. त्यांना कळलं असतं गांवढळ भाषेतून चालणारी चळवळ काय असते ती चिपळूणकरांचा पुण्याच्या टिळकरोडवर न्यू इंग्लिश स्कूल समोर एक छोटा पुतळा आहे,  महाराष्ट्रात एकमेवच आहे. जोतिराव फुल्यांचे पुतळे बघा तुम्ही. पण तरी राग किती आहे जोतिराव फुल्यांबद्दल.

मित्र हो, मला क्षमा करा. आम्हा शिकलेल्या माणसाला शहाणं करायची चळवळ आता उभी केली पाहिजे. यांच्यापेक्षा माझ्या गांवातील निरक्षर माणसं मला परवडतात. घामावर, कष्टावर जगणारी दलित स्त्री, दलित माणूस मला  समजतो. पण डॉक्टर झाले, इंजिनिअर्स झाले. पण बनारस मधून काहीतरी गंगेच्या पाण्याच्या बाटल्या आल्यात म्हणून रांगेमध्ये विकत घ्यायला उभे राहिलेत. यांना मी ज्ञान मिळालेली माणसं म्हणत नाही.

कोजागिरी पौर्णिमेचे दिवशी आम्ही शिकलेली माणसं या शिकलेल्या माणसामध्ये आता सगळे आहेत. ब्राह्मणाला शिव्या देत देत अनेक नवीन ब्राह्मण झाले आहेत. हा प्रश्न ब्राह्मणांना शिव्या देऊन सुटणारा नाही. ब्राह्मण ही एक प्रवृत्ती आहे. आणि ती प्रवृत्ती जवळच्या समाजाला लागते. म्हणजे जेव्हा इंग्रज आमच्या देशामध्ये आले तेव्हा ब्राह्मणसमाज थोडाफार शिकलेला होता. पोथ्या वाचायचा, मंत्र म्हणायचा, मंगलाष्टके म्हणायची हे सर्व संस्कृत होतं. ते लोकांना येत नव्हतं म्हणून ते कळत नव्हतं. आणि म्हणून तो ताबडतोब इंग्रजाला मिळाला.