व्याख्यानमाला-१९८७-२ (2)

धर्म आणि इतिहास लेखन
व्याख्यान पहिले
१२ मार्च १९८७

आपल्या नगर परिषदेचे अध्यक्ष मा.पी.डी.पाटील, आपल्या नगर परिषदेच्या समृध्द ग्रंथपाल माझे स्नेही श्री. विठ्ठलराव पाटील आणि बंधु भगिनींनो,

यशवंतरावजी चव्हाण हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर आपल्या देशाचे एक प्रमुख नेते होते. आपल्या देशात नेत्यांची वाण नाही. परंतु सुसंस्कृत, चिंतनशील आणि कलासक्त नेते आपल्याला फार थोडे लाभले आहेत. यशवंतरावजी अशा नेत्यांपैकी एक प्रमुख नेते होते. म्हणूनच राजकीय दृष्टीत मतभेद असणारी माणसेही त्यांच्यावर प्रेम करीत होती. राजकीय नेत्यांना समाजाच्या  विविध स्तरातून असे प्रेम क्वचित मिळते. अशा या महान नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तांने होणा-या या व्याख्यानमालेसाठी निमंत्रण देण्यासाठी जेव्हा ग्रंथपाल  पाटील माझ्याकडे आले त्यावेळी हे निमंत्रण मी आनंदाने स्वीकारले. यशवंतरावजींचा महाराष्ट्र घडविण्यात फार मोठा वाटा आहे. त्यांना महाराष्ट्राचे शिल्पकार मानले जाते. अशा नेत्याला व्याख्यानमालेच्या रूपाने आदरांजली वाहण्याची आपली कल्पना फार मोलाची आहे. ती महाराष्ट्राच्या इतर विभागांनाही अनुकरणीय ठरावी आशी आहे. आज आणि उद्या मी आपल्यासमोर ‘ धर्म आणि इतिहास लेखन ’ या विषयावर दोन व्याख्याने देऊन आपल्या उपक्रमात सामिल होणार आहे. या विषयाला सुरूवात करण्यापूर्वी गेल्यावर्षी याच व्याख्यानमालेत जी व्याख्याने श्री.व्दा. भ. कर्णिक आणि आमदार रायभान जाधव यांनी दिलेली आहेत आणि ती पुस्तक रूपाने छापली आहेत त्या पुस्तकाचे प्रकाशन झाले असे मी जाहीर करतो.
 
‘ धर्म आणि इतिहास लेखन ’ हा एक अवाढव्य विषय आहे. या विषयावर आतापर्यंत इंग्रजी भाषेत विविध अंगांनी विपुल लेखन झालेले आहे. या विषयावर दरवर्षी अनेक ग्रंथ इंग्रजीत प्रकाशित होत आहेत. परंतु मराठी भाषेत या विषयावर फार थोडी पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत. आपण भाषावार प्रांतरचनेच्या तत्वावर महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य स्थापन केले परंतु मराठी भाषेचा विकास करण्याकडे, ती विविध ज्ञानशाखांनी समृध्द करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे. वैचारिक साहित्य मराठीत लिहिणे कमीपणाचे मानले जावू लागले आहे आणि एकविसाव्या शतकाला जेव्हा आपण मराठी लोक सामोरे जावू तेव्हा तर मराठीत कथा, कादंब-या आणि कविता सोडून इतर ज्ञान-विज्ञान लिहिले जाईल की नाही याबद्दल माझे मन साशंक आहे. मराठी भाषेत हे सारे ज्ञान-विज्ञान यावे यासाठी सर्व स्तरातून जाणिवपूर्वक प्रयत्न होण्याची मला आवश्यकता वाटते. ती आपल्या समोर व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. तसे झाले नाही तर आज संस्कृत भाषेची जी दारूण स्थिती झालेली आहे तशीच मराठीचीही होईल आणि ज्ञान-विज्ञानाचा अभ्यास ही मूठभर आंग्लभाषिकांची मिरासदारी ठरेल. या ज्ञान-विज्ञानांचे पाझर मराठी भाषेच्या, आपल्या मातृभाषेच्या माध्यमातून सर्व सामान्यापर्यंत, बहुजन समाजापर्यंत जावून पोहोतू शकतील.