व्याख्यानमाला-१९८६-७

समाजपरिवर्तनाच्या बाबतीत ते किती जागरूक होते याचे एक उदाहरण मला देता येईल, विचार मंथनाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा आणि तात्विक भूमिकेचा ते बारकाईने अभ्यास करीत होते. एका बौद्धिकाच्या वेळी अस्पृश्यतेबद्दलची तीव्र जाणीव व्यक्त करताना यशवंतराव एकदा म्हणाले होते, “आपण अस्पृश्यांवर फार मोठे अत्याचार करीत आहोत. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्यावरही घोर अन्याय सतत करीत आहोत. बाबासाहेबांनी मुंबईच्या विधानसभेत महारवतन रद्द करण्याच्या बाबतीत एक बिल आणले होते. हे वतन हे महार लोकांच्यावर गुलामगिरी लादणारे वतन होते. असा अन्याय कोणत्याही सुसंस्कृत समाजाने चालू ठेवला नसता. पण ते बिल नामंजूर करण्यात आले ही आपल्या समाजाच्या दृष्टीने नामुष्कीची गोष्ट होय.” यशवंतराव चव्हाण हे बोलघेवडे समाज सुधारक नव्हते, ते कृतिशील नेते होते याचा प्रत्यय पुढे १९६० साली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ते झाले त्यावेळी आला. मुख्यमंत्री म्हणून पहिली गोष्ट जर त्यांनी कोणती केली असेल तर महार वतन रद्द करण्याचे बिल त्यांनी मंजूर करून घेतले ही होय. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांना नितांत आदर होता. ते आवर्जून म्हणत असत की बाबासाहेबांनी जो लढा लढविला तो अस्पृश्यांच्या जीवन मरणाचा लढा होता. आणि या लढ्यात त्यांना साथ देणे हे त्यांच्या नव्हे, आपल्या समाजाच्या हिताचे आहे.

अस्पृश्योद्धारासाठी महात्मा गांधींनी जी चळवळ केली ती यशवंतरावांना मान्य होती. पण आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या मागण्या घटनात्मक मार्गांनी मिळविण्याचा जो प्रयत्न केला तो यशवंतरावांना मूलगामी स्वरूपाचा वाटला. शतकानुशतके दडपल्या गेलेल्या अस्पृश्यांना आपल्या उद्धारासाठी जास्तीत जास्त हक्क व सवलती मिळाल्या पाहिजेत आणि तो त्यांचा हक्कच आहे. ही आंबेडकरांची भूमिका यशवंतरावांना मान्य होती. आणि त्या बाबतीत ते बाबासाहेबांना हिरीरीने पाठिंबा देत असत. यशवंतरावांनी अस्पृश्यांच्या बाबतीत समाजाला जी शिकवण दिली तो त्यांचा वारसाच आहे असे समजावयास हरकत नाही. त्या शिकवणुकीचे प्रत्यक्ष आचरण त्यांनी जे केले त्याचे एक उदाहरण देता येण्यासारखे आहे.

बाबासाहेबांनी आपल्या समाजाच्या चिरंतन हितासाठी जेव्हा बौद्धधर्म स्वीकारला तेव्हां नवबौद्धांना अस्पृश्यांना दिल्या जाणा-या सवलती व हक्क दिले जावे किंवा नाही हा वादाचा विषय झाला. यशवंतराव यांनी या वादाच्या बाबतीत निश्चित भूमिका घेतली ती ही की नवबौद्धांना हे हक्क व सवलती देणे हाच न्यायाचा मार्ग आहे. सबंध देशात यशवंतराव चव्हाण हे एकच मुख्यमंत्री निघाले की ज्यांनी नवबौद्धांना हे हक्क दिले जातील ही घोषणा केली आणि ती अमलातही आणली. समाजसुधारणेच्या त्याचप्रमाणे समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने टाकण्यात आलेले ते अत्यंत महत्वाचे पाऊल होते. डॉ. आंबेडकर यांच्या अनेक प्रकारच्या चळवळीत यशवंतराव प्रत्यक्षपणे भाग घेऊ शकले नाहीत. कारण प्रदेशराज्यात म्हणा किंवा केंद्रस्थानी म्हणा ते सतत अधिकारस्थानीच राहिले. परंतु ज्या ज्या वेळी त्यांना आपली भावना व्यक्त करण्याचा प्रसंग येत असे त्या त्या वेळी दलितांबद्दलची कणव आणि त्यांच्या न्याय्य हक्कांबद्दलची सारी जाणीव ते प्रगट करीत असत.

यशवंतराव चव्हाण हे सर्वांगीण परिवर्तनाचे भोक्ते होते. विविध विषयांमध्ये त्यांना रस असे. नवनाट्य, नवकाव्य आणि विशेषतः दलितांचे काव्य याबद्दल त्यांना कुतुहल असे. मला आठवते, महाराष्ट्र टाईम्समध्ये आम्ही दलितांची अनेक कवने एकत्रित करून प्रसिद्ध केली होती. सबंध पानच आम्ही त्यासाठी रविवारच्या अंकाचं सुशोभित केलं होतं. त्या सुमारास दिल्लीला गेलो असतांना मी यशवंतरावांना ते सारे पान दाखविले. त्यांनी ते ठेवून घेतले, ते वाचले, त्या कवनांचे मनन केले आणि नंतर मला व शंकर सारडा यांना पत्र पाठवून त्यांनी कळविलं की फार मोठी मोलाची सेवा तुम्ही केली आहे. ते या पत्रात म्हणाले “दलितांचे हे नवकाव्य पेटून उठलेल्या हृदयांचं काव्य आहे. ते आमच्यापर्यंत अद्याप आलेलं नव्हतं. आम्हाला ते कळलंही नव्हतं. आज आमच्या नजरेस तुम्ही ते काव्य आणल त्याबद्दल धन्यवाद.”