व्याख्यानमाला-१९८६-४

आज त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची श्रद्धांजली अर्पण करताना माझ्या मनात विचार दाटून येतो की यावेळी देशाला त्यांची आत्यंतिक गरज असताना त्यांना मरण यावे ही केवढी दुर्दैवाची गोष्ट होय. एक चैतन्यपूर्ण, विचारी, ध्येयवादी जीवन त्यांच्या मृत्यूने आपल्यामधून हिरावून नेले आहे. परवाच सांगलीला आम्हा दोघांचेही मित्र वामनराव कुलकर्णी व माझ्या पत्नी निर्मलाबाई यशवंतरावांच्याबद्दल बोलत असताना वामनरावांनी खिन्नपणाने उद्गार काढले “आज यशवंतराव असते तर महाराष्ट्र राज्याच्या भवितव्याबद्दल विचार करण्याचीही आवश्यकता निर्माण झाली नसती” मला निश्चितपणानं असं म्हणावसं वाटतं की संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्याच्या बाबतीत त्यांची जी हिकमत, जे कौशल्य आणि लोकांवर प्रभाव टाकण्याचं जे सामर्थ्य प्रत्ययास आलं ते आजच्या आणीबाणीच्या काळी फार उपयोगी पडलं असतं. पण अखेरीस या गोष्टी आपल्या हातातल्या नसतात हेच खरे.

यशवंतरावांना त्यांच्या जन्मदिनी एवढी श्रद्धांजली वाहिल्यानंतर मला भाषणासाठी जो विषय दिला आहे, त्याच्याकडे मी वळतो. विषय आहे, “यशवंतराव आणि महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तन” आता या विषयाकडे वळण्यापूर्वी थोडीशी इतिहासाकडे आपण दृष्टी टाकली पाहिजे. आज देशामध्ये काँग्रेसची शताब्दी साजरी होत आहे. तो शंभर वर्षाचा कालखंड विचारात घेतला तर आपल्याला असं दिसून येईल की, काँग्रेस संघटना स्थापन केली ती ए. ओ. ह्यूम यांनी. तिचं पहिल अधिवेशन भरविण्याचं ठरलं तेव्हा अधिवेशनाची जबाबदारी पुण्याच्या सार्वजनिक सभेकडे सोपविण्यात आली. दुर्दैवाने त्याच वेळी पुण्यामध्ये प्लेगची साथ उद्भवली आणि म्हणून हे अधिवेशन पुण्यामध्ये भरू शकले नाही. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ती ही की, सार्वजनिक सभा ही काही राजकीय संघटना नव्हती, सामाजिक सुधारणेला वाहिलेली ही संस्था होती. आणि ज्याला सामाजिक परिवर्तन म्हणता येईल, त्याच्यासाठी धडपडणारी ही संस्था होती. न्यायमूर्ती रानडे हे तिचे प्रवर्तक होते, स्फूर्तिदाते होते. न्यायमूर्ती रानडे यांची भूमिका निखालस समाजसुधारणेची होती. ब्रिटीश राजवटीनं या दोशामध्ये जे आणले शिक्षण आणलें, सुधारणा आणल्या त्यांनी न्यायमूर्ती रानडे इतके दिपून गेले होते की, त्यांनी या राडवटीची चिकित्सा Divine dispensation म्हणजे दैवी वरदान अशीच केली. न्या. रानड्यांची ही जी भावना झाली तिचं कारण असं आहे की, त्या सुमारास पेशवाईची सारी कटू फळं आपला समाज चाखत होता आणि रानड्यांना असं वाटलं की एक नवसमाज निर्माण करण्याच्या दृष्टीने ब्रिटीशांची राजवट आपल्याला उपयोगी पडेल. समाजपरिवर्तनाची अमूर्त कल्पना पुढे आली, ती यावेळीच होय. कल्पना करा, ब्रिटीश राज्यकर्त्यांकडे आपले त्यावेळचे पुढारी कोणत्या प्रकारच्या मागण्या करीत होते? त्यांच्या मागण्या अशा होत्या की, नोक-यांमध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळावे, आय्. सी. एस्. ची परीक्षा जी इंग्लंडमध्ये होते ती भारतात घेण्यात यावी आणि लोकप्रतिनिधित्वाचे हक्क आणि अधिकार मर्यादित प्रमाणात का होईना पण आम्हाला दिले जावे.

माझ्या दृष्टीने या देशामध्ये सामाजिक परिवर्तनाचे खरे उद्गाते जर कोणी असतील तर ते बंगालचे राजा राममोहन रॉय आणि महाराष्ट्राचे ज्योतिबा फुले हे होत. मी चव्हाणांच्या जीवनाशी त्यांची जी सांगड घालू पहात आहे त्याचं कारण असं आहे की चव्हाणांनी या मार्गाचीच सतत कास धरलेली दिसून येते. तोच मार्ग त्यांनी जतन केला आणि समाजपरिवर्तनाची जी आस त्यांना लागलेली होती ती त्यांनी पुरी करून घेण्याचा प्रयत्न केला. चव्हाणांच्या राजकारणाची व समाजकारणाची जडणघडण याच मार्गाने झालेली आहे. आता ज्योतिबा फुले यांचे जे ऋण महाराष्ट्रावर आहे ते अलौकिकच मानावे लागेल. राजा राममोहन रॉय यांचे एक मोठे कर्तृत्व म्हणजे त्यांनी सतीची चाल बंद केली, ठगांचा बंदोबस्त करण्याचे श्रेयही त्यांच्या प्रचारालाच द्यावे लागेल. समाजाच्या हिताच्या दृष्टीने एकेक सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. सामाजिक बंडखोरीची ज्योत त्यांनी व ज्योतिबा फुले यांनीच पेटविली. फुल्यांनी महाराष्ट्रामध्ये निराळे पाऊल टाकले. त्यांनी पहिल्या प्रथम समाजशिक्षणाचं व्रत हाती घेतले. त्या शिक्षणामध्ये त्यांनी स्त्रियांना गोवलं. त्यांच्यासाठी शाळा काढल्या. त्याहीपेक्षा महत्वाचं कार्य त्यांनी हाती घेतलं ते अस्पृश्यता निवारणाचं. मला आठवतं की, ज्यावेळी आम्ही यशवंतरावांना मुंबईमधे, कराडमधे, सांगलीमधे भेटत होतो आणि खुद्द दिल्लीमधे आम्ही त्यांच्या भेटी घेत होतो त्या त्या वेळी त्यांनी भक्तिभावाने जर कोणाबद्दल उद्गार काढले असतील तर ते ज्योतिबा फुले यांच्याबद्दल होय. यशवंतरावांच्या जीवनाचा हा वारसाच आहे. ज्योतिबा फुले, शाहू महाराज, भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे ही त्यांची दैवतेच होती. निरनिराळ्या क्षेत्रामध्ये ही पुढारी मंडळी चमकली आणि त्यांनी जी दिशा दाखवली ती शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाची होती. स्त्रीमुक्तीच्या दृष्टीनेही महत्वाची होती. सामाजिक सुधारणेला खरे पाठबळ मिळवून दिले ते या पुरोगामी कार्येकनिष्ट पुढा-यांनी.