व्याख्यानमाला-१९८६-१०

त्या कायापालटाबद्दल वस्तुतः यशवंतरावांनी स्वतःच लिहावयाला पाहिजे होते असे मला वाटते. त्यांचं लेखन जे काही झालं ते कसं रसरशीत होतं, शैलीदारही होतं. त्याना लेखनासाठी वेळ मिळाला नाही हे खरे. ते जर साहित्य लेखनात पडले असते तर समाजपरिवर्तनाच्या बाबतीतील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना विचारप्रवर्तक असं लिहिता आलं असतं. त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याची मला संधी मिळत असे त्यावेळी त्यांचे वाचन आणि व्यासंग यांची मला कल्पना होत असे. मग मी विचार करीत असे की यशवंतराव दिल्लीच्या कामामध्ये, व्यापामध्ये आणि राज्यकारभाराच्या तापामध्ये गढून गेलेले असतानाही पुस्तकामध्ये ते किती मग्न झालेले दिसून येत आहेत. त्यांचे ग्रंथालय मोठे होते आणि उत्कृष्टही होते. सगळी महत्वाची, विविध विषयांवरील पुस्तके ते स्वतः विकत घेत असत आणि रात्ररात्र जागून वाचून काढीत असत. त्यांच्या आवडीचे जे विषय असत त्यावरील पुस्तकांवर तर ते झेप टाकीत असत. मला आठवते व्ही. बी. कर्णिक यांनी एम्. एन्. रॉय यांच्यावर ६००-६५० पानांचा जो चरित्रग्रंथ लिहिला होता तो भेटीदाखल त्यांना देण्यासाठी मी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेलो होतो. पण ते पुस्तक पहाताच यशवंतरावांनी त्याची किंमत पाहिली आणि न बोलता ते घरात गेले. येताना १२४ रुपये ते घेऊन आले आणि त्यांनी ते माझ्या हाती ठेवले. मी त्यांना म्हटले “हे सप्रेम भेट म्हणून मला द्यावयाचे होते पुस्तक” त्यावर ते हसले आणि म्हणाले “मला हे पुस्तक भेट म्हणून नको आहे. मी ते विकत घेणार आहे.” ते पुढे म्हणाले “व्ही. बी. कर्णिकांना म्हणावे की या पुस्तकाच्या ५० प्रती माझ्याकडे पाठवून द्या. आमचे गुरु किती श्रेष्ठ होते याचा इतिहास माझ्या सा-या मित्रांना या चरित्रग्रंथांतून कळेल आणि त्यातूनच मला खरे समाधान होईल.”  

वाचनाची आणि पुस्तकांची त्यांच्यामध्ये ही जी गोडी होती त्यामागे सुद्धा ही भावना होती की आपल्या समाजाला यातून काही नवीन मार्ग दिसेल, ज्ञानाची भांडारे त्या समाजापुढे खुली होतील. यशवंतराव ज्या परिस्थितीत वाढले ती परिस्थिती मी प्रत्यक्ष पाहिलेली आहे. अगदी गरीबीतून त्यांचे जीवन गेले. मला आठवतं कराडच्या एका घरात दुस-या मजल्यावरील एका खोलीत ते रहात होते तेव्हा त्या खोलीत एक कांबळेच तेवढे पसरलेले होते. यशवंतरावांना त्या दारिद्र्याची कधी खंत वाटली नाही. शिक्षण घेत असतानाच त्यांनी भरपूर वाचन केलं. निरनिराळ्या लोकांशी संपर्क साधला आणि विचारपूर्वक पण नेटानं आणि निर्धारानं आपल्या जीवनाची आखणी केली. यशवंतराव जे कर्तृत्ववान जीवन जगले त्याचे श्रेय मी त्यांना स्वतःलाच देईन. ते जन्मभर शिकत राहिले आणि त्या शिक्षणाचा त्यांनी समाजपरिवर्तनाच्या आपल्या ध्येयासाठी उपयोग करून घेतला.

असा एक समर्थ माणूस महाराष्ट्रामध्ये जन्माला आला हे खरोखरच आपलं भाग्य आहे. यशवंतरावांनी आयुष्यामध्ये जे जे काही कार्य केले त्या कार्याला एक दिशा होती, त्याला एक अधिष्ठान होतं. पण त्या अधिष्ठानाच्या मागे जी भूमिका होती ती समाजाचं हित साधावं ही होती. ते हित साधण्याच्या दृष्टीने त्यांनी आपल्यापरीने प्रयत्न केला. सुदैवाने त्याला साथ चांगली मिळाली. पण कोणत्याही अडचणी आल्या तरी यशवंतराव कधी विचलित झाले नाहीत. आपल्या ध्येयापासून आणि तत्वापासून ते कधीही ढळले नाहीत.

आज मला अभिमानानं सांगावसं वाटतं की त्यांच्या सहवासात वेळोवेळी राहण्याचं मला भाग्य लाभलं, सा-या संकटातून, तापातून आणि ताणातून त्यांचं जीवन गेलं. मला आठवतं मुंबईहून दिल्लीला ते आले की मी त्यांच्या हाती सिगारेटचा डबा आहे किंवा नाही हे पहात असे त्यातून त्यांच्या मनावर किती ताण आहे त्याचा मला बोध होत असे. या ताणाबद्दल बोलताना ते मला म्हणाले, “ताण कधीच कमी व्हायचा नाही. तो आमच्या जीवनाचा स्थायीभाव झालेला आहे. हे राजकारण असे आहे, आणि त्यात असे पवित्रे घेतले जातात, अशा काही घडामोडी होतात की ताण पडल्याशिवाय जगणंच शक्य होणार नाही.” ते स्वतः अतिशय विचारी. आपल्या भावना त्यांनी कधी कोणाला कळू दिल्या नाहीत, आपलं मनही त्यांनी सहसा प्रगट होऊ दिलं नाहीं. त्यामुळे इतर नेत्यांच्या जशा चुका झाल्या तशा यशवंतरावांकडून झाल्या नाहीत. पण राजकीय परिस्थिती ही अशी बदलत असते आणि तिचे परिणाम असे काही अघटित होत असतात की तेथे विचार आणि तर्कशुद्धता आणि न्यायाची भावना यांना स्थान रहात नाही. काही वेळी प्रवाहपतिताप्रमाणे व्यक्तीला आपल्या अपरोक्ष वाहत जावे लागते. सबंध जन्मभर राजकारण केल्यानंतर आणि बहुशः यशस्वीपणे केल्यानंतर यशवंतरावांना काहीशी माघार घेण्याची वेळ आली. पण त्याहीवेळी विचारपूर्वक त्यांनी पाऊल टाकले. आणि त्यावेळी नेत्यांच्या वा जनतेच्या भावभावनांचा त्यांनी विचार केला नाही. लोकप्रियतेकडेही पाठ फिरविली आणि मनाने जी त्यांना ग्वाही दिली त्या ग्वाहीनुसार ते स्वगृही परत आले. आणि निश्चितपणाने त्यांनी समाजपरिवर्तनाचे अपुरे कार्य पुन्हा हाती घेतले. यशवंतराव चव्हाण हे अनेक कार्यासाठी, आंदोलनासाठी सतत आठवले जातील. पण त्यांच्याविषयी एक निर्वाळा मात्र दिला जाईल की महाराष्ट्रात समाजपरिवर्तनाची जी दिंडी अव्याहत चालू राहिली आहे तिच्यामधील अग्रस्थानीचे वारकरी म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे नाव अभिमानाने घेतले जाईल.