शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, महात्मा फुल्यांचा महाराष्ट्र, यशवंतरावजींचा हा महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे ती ताकद आम्ही मंडळी घालवून बसलो आहोत. तर मग आम्हा मंडळींना अंतर्मुख होऊन विचार करायची वेळ आता येऊन ठेपलेली आहे. आणि जे वैभव महाराष्ट्राने गतकाळामध्ये – इतिहास काळामध्ये – हिंदुस्थानच्या संदर्भात भोगलेले ते वैभव हळूहळू कमी होऊ लागलेले आहे, अशा प्रकारची शंका मला, माझ्या मनाला गेल्या दहा वर्षापासून चाटून जातेय. मी अनेक दिवसांपासून या संदर्भात विचार करतोय आणि असे वाटते की आजच्या शारदीय व्याख्यानमालेच्या निमित्ताने हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवावा. बघा तो तुम्हाला पटतोय का ? तुम्हाला असे वाटतेय काय की महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या गतीने पुढे जायला पाहिजे होता त्या गतीने तो आज जातो आहे का? आजचे युग हे सुपरसॉनिक स्पीडचे युग आहे. आम्ही मात्र मुंगीच्या गतीने निघालेलो आहोत.
आता गती आणि इन्फर्मेशन याचा काळ आहे, गती, स्पीड, इन्फर्मेशन माहिती याचा काळ आहे. स्पेसमध्ये त्याच्यामुळे माणूस गेलेला आहे. आणि त्या संदर्भात आम्ही जर विचार केला तर आम्ही कुठे आहोत, याचा विचार जरी या भाषणाच्या निमित्ताने आपण कराडकर मंडळी कराल, निदान विचार करण्याची इच्छा व्यक्त झाली तरी सुद्धा औरंगाबादहून इथं येण्याचं सार्थक झालं असे समजेन. मी या व्याख्यानमालेचे जे आयोजक आहेत, आपल्या नगरपालिकेचे जे अध्यक्ष आहेत माझे परममित्र पी. डी. साहेब यांचा मनापासून ऋणी आहे. आपली सेवा करायची आजच्या संध्याकाळची त्यांनी मला संधी दिली. श्री. विठ्ठलरावजी इथून औरंगाबादला मला भेटायला आले, पत्र पाठवलं असतं तरी चाललं असतं, परंतु मला अमुक तारीख सोईची नाही, तमुक तारीख सोईची नाही. तेव्हा मला आता इथल्या इथं सांगा की कोणती तारीख सोईची आहे. आमची चार तारीख व्याख्यानमालेच्या उद्घाटनाची आहे. त्याच तारखेला व्याख्यानमाला सुरू होते, आणि तुम्ही त्याच दिवशी कराडला येऊ शकलात तर बरे होईल. विठ्ठलरावजींच्या आग्रहास्तव मी कराडला येऊ शकलो याचा मला अतिशय आनंद आहे. विठ्ठलरावजी जर औरंगाबादला माझेकडे आले नसते तर कदाचित मी येऊ शकलो नसतो. मी पुन्हा पी. डी. साहेब, विठ्ठलरावजी, शिंदे साहेब आणि व्याख्यानमालेतील जी मंडळी आहेत, त्यांचे पुन्हा पुन्हा ऋण व्यक्त करतो. आणि आपण मंडळी घड्याळाकडे न पाहता जवळजवळ दोन तास माझे विचार ऐकून घेतलेत त्याबद्दल आपल्या सर्वांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून, धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो.
जयहिंद !