व्याख्यानमाला-१९८६-४३

तुमच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, कारण तुमचं कायमचं नुकसान होऊन गेलेलं आहे. हा गॅस पहिल्यांदा जमिनीवरून नवेगावला न्यायचा होता. आणि नवेगावहून हाजिराबाद व तेथून राजस्थान मार्गे उत्तर भारतात जायचा होता. पण उद्या कदाचित महाराष्ट्राची पोरं जर खवळली आणि त्यांनी गॅस मध्येच तोडला, जास्तीची पाईप टाकलेली तोडली तर काय करायचं. तेव्हा आता हा बॉम्बे हायचा गॅस समुद्राच्या मार्गाने वसईवरून हाजिराला पहिल्यांदा जमिनीवर काढण्यात येणार आहे. म्हणजे मला उद्या सबंध महाराष्ट्राच्या हद्दीतून जाणा-या गॅसच्या पाईपलाईनचे जे काम आहे ते सुद्धा मला करता येणार नाही. आम्ही काही करू शकत नाही. पंधराशे कोटीची योजना आम्ही दोन वर्षांत पूर्ण करू. गेल्या पांच-सात वर्षांपासून हे काम चाललेलं आहे. परंतु अजून काही ठावठिकाणा नाही. त्याच्यासाठी लागणारी मॅनपॉवर डेव्हलप करणारी लॅबोरेटरीची अजून इमारत झालेली नाही. मग महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी त्याच्याकडे बघायला पाहिजे की नाही? आणि उद्याचं तर हेच सगळं युग येणार आहे, मी तुम्हाला प्लॅस्टिकच्या मगाचं, बादलीचं उदाहरण देतो. हे जर बॉम्बे हायगॅसवर जर निर्माण केलं तर जी बादली तुम्ही आज चाळीस रुपयाला घेता ती बादली तुम्हाला पाच रुपयाला मिळणार आहे, इतकं स्वस्त होणार आहे. जे कापड तुम्ही चाळीस रुपये मीटर घेता ते कापड तुम्हाला चार रुपयाला मिळणार आहे, सिंगापूरला मिळते तसे. उत्तमोत्तम शर्ट सिंगापूरला सोळा रुपयाला मिळतो. त्यामुळे आमच्या सारखी माणसं प्रवास करायला गेली की बँगेची इच्छा नसली तरी ती घेऊन त्यात कोंबतच असतो. इतकं स्वस्त कापड तुम्हाला मिळणार आहे. तर हे स्वस्त कापड महाराष्ट्रामध्ये होणार नाही, बाहेर होणार आहे. आणि बाहेर होणार आहे म्हणून तिथल्या माणसाला सेकंडरी सेक्टरमध्ये काम मिळण्याची संधी मिळणार आहे. आणि एक प्रचंड अशी सेकंडरी सेक्टरमध्ये काम करण्याची संधी महाराष्ट्रामधली कायमची नाहीशी झालेली आहे. मी आणखी एक उदाहरण आपल्याला देतो. हे पेट्रोकेमिकलचं एक उदाहरण दिलं, आता इलेक्ट्रॉनिक्सचे उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे.

हरियाणासारखं लंगोटी एवढं राज्य आहे. आणि त्याचं शेतीचं उत्पन्न तुमच्यापेक्षा अडीचपट जास्त आहे. पहिल्यापासूनच आहेच आहे. कारण त्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आहे, मोठ्या प्रमाणावर निसर्गाची साथ आहे. हरियाणानेही सगळ्या राज्यामध्ये (मी सेकंडरी सेक्टरची चर्चा आपल्या समोर करतो आहे. आणि सेकंडरी सेक्टर मधील इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल सिव्हिल या इंजिनिअरींग ब्रँचची चर्चा करीत नाही. कारण ते औटडेटेड झालेले आहेत.) त्याच्यावर इलेक्टॉनिक्सने कुरघोडी केलेली आहे. इलेक्ट्रॉन्सच्या साहाय्याने ती मंडळी काम करायला लागली आहेत. आता मला मशिनवर उभं रहावं लागत नाही. चटकन अॅटोमॅटिकवर मशिन चालायला लागणार इलेक्ट्रॉनिक्सच्या ताकदीवर. आज जपान अमेरिकेच्या बरोबर लढाई करतो आहे. जगाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एवढसं चिमुरडं जपानसारखं राष्ट्र, ज्याला जमीन नाही, पाण्यावर तरंगत आहे ते, त्याचा येन जगाच्या प्रचंड बलाढ्य शक्तीच्या डॉलरबरोबर कुस्ती खेळतो आहे. आणि कधी कधी त्याला तो जिंकतो आहे. येनची किंमत वाढती आहे. कशाच्या आधारावर तर टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटच्या आधारावर. ही टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट काँप्युटरवरून आलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्सवरून आलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भात आपल्याल एक विचार सांगितला पाहिजे. कारण आजचं युग इलेक्ट्रॉनिक्सच युग आहे. आता जर्मनी, फ्रान्स, अमेरिका ही तीन राष्ट्र मिळून स्पेससिटी बांधू लागली आहेत. आज या क्षणाला रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने नुसतं तुमचं टेलिव्हिजन चालू करता येतो बंद करता येतो असं नाही तर विमान जर अडकलं तर तिथल्यातिथे ते स्टॉप करता येतं. म्हणजे ग्रॅव्हिटीचा जो नियम आहे – गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे तो बाद झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्सच्या साहाय्याने आता अमेरिकेतील मीसाईल रशियावर जाऊन रशिया जाळू शकतात, तिथले विषारी जंतू जर रशियाने सोडले तर अमेरिका उद्ध्वस्त होऊ शकते. आता या दोघांचं राज्य जगावर चाललेलं आहे ते Star war ग्रह युद्ध करू शकतात. आज रेगनला जर वाटलं उद्या Star war करायचं तर तो करू शकतो. मग जगातील सूत्र आपल्या हातामध्ये ठेवणारी टेक्नॉलॉजी ही जर महाराष्ट्रामध्ये येणार नसेल तर महाराष्ट्र हिंदुस्थानचं नेतृत्व काय करणार आहे. आणि एकवेळ सेनापती बापटांनी म्हटलेलं आहे की ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले । महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले ।।‘ चालविणार आहात का तुम्ही ? अरे हे इलेक्ट्रॉनिक्स तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आलं. ते शिकवायला शिक्षक नसल्यामुळे औरंगाबादच्या व नांदेडला नवीन निघालेल्या कॉलेजच्या परीक्षाच झाल्या नाहीत. फक्त पुण्याच्या व मुंबईच्या परीक्षा होऊ शकल्या कारण तिथे बाहेरून शिक्षक आणता आले. आणि आजचं इलेक्ट्रॉनिक्सचं जग या ही संदर्भामध्ये आम्ही मंडळीनी जे नेतृत्व करायला पाहिजे होतं ते हे बुद्धीच्या क्षेत्रामध्ये. आम्हाला फार घमेंड आहे, महाराष्ट्र हिंदुस्थानचा मेंदू आहे. तुम्ही आम्ही काल पर्यंत म्हणत होतो. अभिमान बाळगतो की महाराष्ट्र हिंदुस्थानचा मेंदू आहे. आमच्याशिवाय नाही चालायचा हिंदुस्थानचा गाडा.