व्याख्यानमाला-१९८६-४६

मार्केटिंगच्या संदर्भातसुद्धा आमची कामगिरी वाखाणण्यासारखी नाही. काश्मिरची सफरचंद आज खेड्यातील बसस्टँडवर मिळू शकतात. परंतु जळगावची केळी वाघिणीअभावी जळगावच्या स्टेशनवरच सडताहेत हे कशाचे द्योतक आहे.

सहकारामध्ये, को-ऑपरेटिव्हमध्ये महाराष्ट्रात आज साडेसात-आठ हजार कोटी रुपये खेळवले जातात (Working capital) या शक्तिचा उपयोग केवळ काही ठराविक लोकांसाठीच होतो आहे, ही कोंडी फोडण्याच्या दृष्टीने काही काम करण्याचे सोडाच उलट मूठभरांच्या हातात असलेली ही शक्ति कायमस्वरूपी त्यांच्याच कशी हातात राहील ही खबरदारी घेतली जाते. या ताकतीचा उपयोग जर समाज परिवर्तनासाठी होणार नसेल तर महाराष्ट्रातील सहकार दिशा घेऊन चाललेला आहे असं आपल्याला म्हणता येईल काय?

उद्योगशीलतेच्या संदर्भातसुद्धा गेल्या पंचवीस वर्षात लक्षणीय अशी प्रगती करू शकलेलो नाही. काही बोटावर मोजण्याइतकी घराणी सोडली तर नवीन काही घराणी निर्माण झाल्याचे दिसत नाही. लघुउद्योगातसुद्धा या पेक्षा निराळे चित्र दिसत नाही. आणि म्हणून महाराष्ट्राची संपत्ती बाहेरील लोकांच्या हातात खेळते आहे. ही दयनीय अवस्था आमच्या नाकर्तेपणातून निर्माण झालेली आहे. आणि हे नाकर्तेपण मग बलाढ्य महाराष्ट्र कसा घडविणार !

आज जी जी प्रगत राज्ये आहेत ही प्रगत राज्ये तुम्हाला जगू द्यायचं की नाही हे ठरवू शकतात. कारण त्यांची टेक्नॉलॉजीची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. मी एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. मोठं उदाहरण देऊन तुमचा वेळ घेत नाही. अगदी छोटसं उदाहरण देतो. तुमच्या दररोजच्या गरजेचा पॉकेट कॅल्क्युलेटर. आज मला हा पॉकेट कॅल्क्युलेटर हिंदुस्थानचा घ्यायचा असेल तर दोनशे पन्नास रुपये मोजावे लागतात. पण हा पॉकेट कॅल्क्युलेटर मला मुंबईच्या चोर बाजारात जपानमध्ये तयार झालेला पन्नास रुपयास मिळतो. आणि माझी स्वतःची सायकॉलॉजी अशी आहे माझं मानसशास्त्र असं आहे की जपानमध्ये तयार झालेला हा उत्तम, हिंदुस्थानमध्ये तयार झालेला कॅल्क्युलेटर काही बरोबर असणार नाही. आणि तो पन्नास रुपयाला मिळतो, उत्तमातला उत्तम आहे तो घेऊ या. माझा कॅल्क्युलेटर मार्केटमध्ये चालत नाही. जपानचा चोरून आणलेला कॅल्क्युलेटर मार्केटमध्ये चालतो. आणि दोनशे पन्नास रुपयाचा कॅल्क्युलेटर मार खातो. त्यांनी मार खाल्ला की माझी इंडस्ट्री बंद पडते. मग हे जसं कॅल्क्युलेटरच्या संदर्भात आहे तसंच कॉम्प्युटरच्या संदर्भातही करणार तुम्ही. मी कॉम्प्युटरचे अमेरिकेमध्ये दोन-तीन कारखाने बघितले, अॅटम बघितले; डिफिकल विजय आणि इलेक्ट्रॉनिक्स बघितले. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्समध्ये या मंडळींनी इतकं अफाट काम केलय की, आपण पाहिलं तर आपला विश्वास बसणारसुद्धा नाही, बसत नाही. आता रोबोट काम करतोय हे तुम्हाला माहीत आहे. कॉम्प्युटर तयार करण्याचेही काम रोबोट करू लागलेला आहे. हिवलर पॅकर्ड ही मोठी कंपनी आम्ही पाहिली. तसेच आय्. बी. एम्. सारखी कंपनी आम्ही बघितली. इलेक्ट्रॉनिक्समध्ये इतकं मोठं काम या मंडळींनी केलेले आहे की आपली कल्पनासुद्धा आपण ताणू शकणार नाही, इतकं अफाट आहे. आता मला कॉम्प्युटर जर हिंदुस्थानमध्ये तयार करायचा असेल तर त्याची एक हजार रुपये इतकी किंमत होईल असं गृहीत धरूया. पण हा कॉम्प्युटर जो हिंदुस्थानमध्ये एक हजार रुपयास मिळणार आहे. तो कॉम्प्युटर अमेरिकेला मला दहा डॉलरला मिळू शकतो. तेव्हा हिंदुस्थानचा कॉम्प्युटर हा बाजारपेठेत टिकणार नाही. शंभर डॉलर मला एक हजार रुपये असाच कॉम्प्युटर करायला मला दहा हजार रुपये लागणार आहेत. माझा कॉम्प्युटर टिकेल.? मार्केटमध्ये टिकणार नाही. कारण अद्ययावत टेक्नॉलॉजी माझ्याजवळ नाही. माझा रोबोट काम करीत नाही. मी हातांना काम करतो. आणि हातांनी कितीतरी कमी काम होते तेव्हा मॅन-पॉवर आता याही संदर्भामध्ये अडचणीत आलेली आहे. मी आता या संदर्भात मॅन पॉवर डेव्हलपमेंटचे काम केलं तर ही मॅन पॉवर रोबोटच्या समोर कमी पडणार ! मग त्यांचा कॉम्प्युटर विकणार, त्यांचा कॅल्क्युलेटर, टेलेव्हिजन विकणार. अहो हा टेलेव्हिजन तुमचा आहे? काय सांगायची तुमची दयनीय अवस्था. तुमचा आहे का टेलेव्हिजन ? तुमचं फक्त खोकं आहे, सगळ्या कंपोनंटस् बाहेरच्या आहेत.