व्याख्यानमाला-१९८६-४१

तुम्ही काँप्युटर म्हटला की लगेच छाती धडधडायला लागते. काय भानगड आहे माहीत नाही. अहो हे तर सोडा, तुमच्या एम्. एस्. ई. बी. मध्ये लागणारे साधे इलेक्ट्रिकल इंजिनिअर कर्नाटकामधून इथे येऊ लागले आहेत. तुमच्याकडे किती मंडळी आली मला माहित नाही. पण आमच्याकडे खूप आलेली आहेत. म्हणजे आमच्या विद्युतीकरणाला आवश्यक असणारी मॅन पॉवर सुद्धा आम्ही डेव्हलप करण्याची कधीच चिंता बाळगली नाही. आज ठाणे-मुंबई, पुणे-पनवेल हा प्रदेश औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे. त्यात काम करणारी स्थानिक माणसे कोणत्या स्तरावर काम करीत आहेत हे पाहणे मनोरंजक ठरेल. त्यात काम करणा-या लोकांची पाहणी केलीत तर तुम्हाला महाराष्ट्रामधील माणसं ही सेकंडरी सेक्टरमधील अनस्किल्ड, हेल्पर, सेमिस्किल्ड, स्किल्ड यात स्थानिक माणसे सापडतील. तर हायस्किल्ड पुढे मॅनेजरीयल कॅटेगरी आणि एक्झिक्युटीव्ह कॅटेगरी यामध्ये अर्धाटक्का सुद्धा तुमची माणसं नाहीत. मॅनेजरीयल कॅटेगरीला जी मॅन पॉवर डेव्हलप करायला पाहिजे होती ती मॅन पॉवर डेव्हलप झाली नाही. हातात लोटा आणि खांद्यावर पंचा घेणारा माणूस कोट्याधीश होतो. आणि इथल्या मातीतील पुत्र नुसता लंगोटी लावूनच चाललेला आणि त्या लंगोटीचा पुन्हा यांना अभिमान! आम्ही कशी लंगोटी नेसतो. तेव्हा या पहिल्या आणि दुस-या दर्जावर आमची वाणवा आहे. आणि आम्ही सारखी चिंता करतो आहोत की हे असं का होऊ लागलेलं आहे. मॅन पॉवर म्हणजे जे काम तुम्हाला करायला पाहिजे होतं ते काम तुमच्या डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनने ते केलेलं नाही. ज्या मॅन पॉवर डेव्हलपमेंटच्या संस्था अलीकडच्या काळामध्ये झालेल्या आहेत, मॅनेजमेंटच्या निरनिराळ्या संस्था निघालेल्या आहेत त्या सगळ्या संस्था बाहेरच्या मंडळींनी काढलेल्या आहेत. तिथं प्रवेश मिळण्याची क्षमता, त्याच्यात प्रवेश मिळविण्याची काय पात्रता लागते याच्या संबंधीची माहिती क-हाडच्या पोरांना नसतेच, ते आयसोलेशनमध्ये असतात. आजच्या इन्फर्मेशनच्या जगामध्ये, आयसोलेशनमध्ये काम करणारी माणसं गरीबच राहणार. हे इन्फर्मेशनचं युग आहे, हे युग काँप्युटरचं म्हणजे इन्फर्मेशनचं आहे. मला माझं दिल्लीच्या विमानाचं तिकीट ओ-के झालेलं आहे की नाही याची एका सेकंदात इन्फर्मेशन मिळते. मी इथं बसून निकाल घेतो की उद्या दिल्लीला जायचं की नाही. का उद्या अमेरिकेला जायचं याचा. पूर्वी हे होत नव्हतं, खेटे मारावे लागत असत. मग मला माहिती मिळायची की मला माझं तिकीट ओ-के झालेलं आहे की नाही. तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. सगळ्याच क्षेत्रात ही इन्फर्मेशन झपाट्याने वाढते आहे, इतकी झपाट्याने वाढते आहे, की आपण चक्रावून जाल. आज त्या इन्फर्मेशनमुळे जग खूप लहान झालेलं आहे. अतिशय लहान झालेलं आहे. जी इन्फर्मेशन सॅटेलाईटच्यामार्फत अमेरिकेतून हिंदूस्थानात एका सेकंदात उतरते, जी इन्फर्मेशन पूर्वी सुरवातीला टेलिफोन लावायला लागायचा व त्यालाही अवधी लागायचा, तो आता टेलिफोन लावायची गरज नाही. सॅटेलाईटच्यामार्फत तुम्हाला कोणतीही माहिती एका सेकंदात मिळते. अंतराळातील चित्रे तुम्हाला सॅटेलाईटच्यामार्फत दुस-या क्षणाला मिळतात. तुम्ही सेटींग करून अवकाशातील आपले अंदाज ठरवू शकता, बांधू शकता. आम्ही आयसोलेशनमध्ये काम करतो आहोत. आणि डायरेक्टर ऑफ् टेक्निकल एज्युकेशन अशा प्रकारच्या आयसोलेशनमध्ये काम करत असल्यामुळे या इंडस्ट्रीजला लागणारी कोणती मॅन पॉवर आणि ती कशी निर्माण केली पाहिजे याचं प्लॅनिंग ते करू शकले नाहीत. सेकंडरी सेक्टरमध्ये तुमची लोकसंख्या गेली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर सेकंडरी सेक्टरच्या गरजा काय आहेत आणि गरजांबरोर हेरून त्याप्रमाणे मॅन पॉवर निर्माण केली पाहिजे होती. ही गोष्ट घडलेली नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालं असलं तरी त्या औद्योगिकरणाचा फार मोठा फायदा या मागासलेल्या माणसाला – या भूमिपुत्राला मिळत नाही, लाभ मिळत नाही. आम्ही मात्र इकडे-तिकडे गप्पा मारून खादीचे पांढरे कपडे अंगावर घालून ओरडत असतो की महाराष्ट्राने देशाच्या पातळीवर मोठी प्रगती केली आहे. पण आज स्थानिक माणूस रोजगार उपलब्ध असूनही बेकार राहतो आहे हे कोणाचं पाप आहे ? ज्याला इन्फर्मेशन मिळत नाही आणि इन्फर्मेशन मिळाली तरी त्या प्रकारचं शिक्षण करण्याची- देण्याची योजना – साधनं एकोणीसशे एक्काहत्तर सालापर्यंत उपलब्ध नव्हती. यात सामान्य विद्यार्थ्यांची काही चूक नाही. यशवंतरावजींनी त्याकाळी महाराष्ट्राचे जे वर्णन केलेलं होतं, ज्या संकल्पना बांधलेल्या होत्या त्या प्रगत महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्याची – पूर्ण करण्याची जी साधनसामुग्री, ज्या इंडस्ट्रीज तुम्हाला उभ्या करावयाच्या होत्या त्या गेल्या वीस-पंचवीस वर्षात तुम्हाला महाराष्ट्रात उभ्या करता आल्या नसल्याने हे संकट आता तुमच्या माझ्या पुढे उभे राहिलेलं आहे. आणि आता तुमची आमची पोरं आम्हाला दगडं मारायला लागली आहेत. ही परिस्थिती आपल्या इंडस्ट्रीज सेक्टरमध्ये किती होती. गेल्या वीस-पंचवीस वर्षामध्ये आम्ही एम्. एस्. एफ्. सी. काढली, सिकॉम काढले, एम्. आय्. डी. सी. काढलं, विदर्भ विकास महामंडळ काढलं, कोकण विकास महामंडळ काढलं. या सगळ्या ग्रामीण महाराष्ट्राचं औद्योगिकरण किती प्रमाणात केलेलं आहे.