व्याख्यानमाला-१९८६-१

व्याख्यान पहिले - दिनांक १२ मार्च १९८६

विषय - "यशवंतराव आणि महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तन"

व्याख्याते - मा. श्री. द्वा. भ. कर्णिक, मुंबई.

व्याख्याता परिचय -

या देशातील सामाजिक परिवर्तनाचे खरे उद्गाते बंगालचे राजा राममोहन रॉय आणि महाराष्ट्राचे महात्मा ज्योतिबा फुले हे होत. यशवंतराव चव्हाण यांची वरील थोर झुंझार महात्म्यांच्या कार्याशी सांगड घातली पाहिजे कारण चव्हाणांनी या मार्गांचीच सतत कास धरलेली दिसून येते. त्यांच्या राजकारणाची आणि समाजकारणाची जडण घडण याच मार्गाने झाली आहे.

एका बाजूला लो. टिळकांचा राष्ट्रवाद आणि दुस-या बाजूला राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने प. महाराष्ट्रात उभी राहिलेली सत्यशोधक चळवळ आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रचंड शैक्षणिक कार्य यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मनाची पुरोगामी स्वरूपाची जडण घडण होत गेलेली दिसते. या शिवाय त्या काळात होणा-या निरनिराळ्या राजकीय गटांच्या बौद्धिकावरच त्यांचे राजकीय शिक्षण झाले असले पाहिजे. त्यानंतरच्या म. गांधींच्या अध्यात्मिक बैठकीवर आधारलेल्या मानवतावादी राष्ट्रवादी चळवळीकडे ते ओढले गेले आणि देशसेवा व ध्येयवाद हे आपले जीवन ध्येय ठरवून सबंध भावी आयुष्यात या आकांक्षेपासून ते कधीही विचलित झाले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि एम्. एन्. रॉय यांच्या समाज परिवर्तनवादी चळवळी त्यांना प्रेरक ठरल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत यशवंतराव प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले नसले तरी, नवबौद्धांनाही अस्पृश्यांच्या सवलती आणि हक्क देऊ करणारे यशवंतराव चव्हाण हेच भारतातले एकमेव मुख्यमंत्री होते. या उदाहरणावरून परिवर्तनवादी चळवळीकडे पाहण्याचा त्यांचा विधायक दृष्टीकोण स्पष्ट होतो.

समाज परिवर्तनाच्या मोहिमेला तर्कशुद्ध आधार देणा-या रॉय यांच्या वैचारिक भूमिकेशी काही काळ यशवंतराव जवळीक साधतांना दिसतात. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रात परिवर्तनाची जी दिंडी अव्याहतपणे चालू राहिली आहे तिच्यामधील अग्रस्थानीचे वारकरी म्हणून यशवंतराव चव्हाण यांचेच अभिमानाने नाव घेता येईल.

यशवंतराव हे काँग्रेसचे एक निष्ठावान पाईक होते आणि वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसला आपली जी निष्ठा दिली ती अव्याहतपणे दिली. काँग्रेस संस्कृतीचा हल्ली उपहासाने उल्लेख केला जातो पण म. गांधी आणि पं. नेहरू यांच्या वैचारिक मार्गदर्शनाने बहरलेल्या काँग्रेस संस्कृतीचाच आदर्श त्यांच्यासमोर होता. यशवंतराव जन्मभर उपासक व प्रवक्ते राहिले ते याच काँग्रेस संस्कृतीचे. या संस्कृतीत प्रचंड ध्येयवाद होता. आणि राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी निष्ठा याच तीन निष्ठा यशवंतरावांना अभिप्रेत होत्या. १९८१ मध्ये यशवंतरावांनी ‘मी स्वगृही जात आहे’ ही घोषणा केली तिचा अन्वयार्थ आपण याच पार्श्वभूमीवर समजून घेतला पाहिजे.