व्याख्यानमाला-१९८६-१५

यशवंतरावांची मुत्सद्देगिरी अशी की त्यांनी स्वतः आपल्याबद्दल कोठेही शब्द बाहेर काढला नाही. त्यांचे म्हणणे एवढेच की काँग्रेसच्या नेत्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांनी विचारपूर्वक ही निवड करावी. शास्त्रीजींची निवड करण्याच्या बाबतीत पुढाकार घेतला तो वसंतराव नाईक यांनी. पण यशवंतरावांशी विचारविनिमय केल्यानंतरच एक वजनदार मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पहिलं पाऊल टाकलं. नमूद करण्यासारखी गोष्ट ही की तेव्हांपासून मुख्यमंत्र्यांना दिल्ली दरबारात विशेष महत्व प्राप्त झालं आणि वसंतराव नाईक यांच्या शब्दाला मोठंच महत्व दिलं जाऊ लागलं.

मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान दिला जाऊ लागला त्यालाही थोडा इतिहास आहे. पंडितजींच्या हयातीत जेव्हा पंडित गोविंद वल्लभ पंत यांचे निधन झाले तेव्हां डेप्युटी लीडर कोणाला मानले जावे आणि त्याचे भविष्यकाळात स्थान कोणते असावे याबद्दल एक वाद निर्माण झाला. या वादामागे कारणपरंपरा अशी होती की मौलाना आझाद व पंडित पंत हे आपल्या अधिकारानुसार डेप्युटी लीडर मानले गेले होते. पण पंतांच्या निधनानंतर मोरारजी देसाई हे त्या मानाचे स्वतःला मानकरी समजू लागले. त्यांचे म्हणणे असे की अर्थमंत्री म्हणून दुस-या क्रमांकाचा सन्मान आपल्यालाच दिला गेला पाहिजे. त्यांच्या नेहमींच्या घिसाडघाईच्या वृत्तीमुळे त्यांनी आपले हे मत जाहीरही केले. पण त्याचवेळी जगजीवनराम यांनी असा आग्रह धरला की केंद्रीय मंत्रीमंडळात अगदी प्रथमपासून आपला समावेश झाला असल्यामुळे पंडितजींच्या नंतरच्या ज्येष्ठ नेतृत्वाचा मान आपल्याकडे चालत येतो. आता यातून नेतृत्वाबद्दल एक पेचच निर्माण झाला. कारण डेप्युटी लीडर हा भावी वारसदार होय अशीच एक समजूतही दृढ झाली होती. पंडितजी असे दूरदर्शी की त्यांनी या समजुतीवर घाव घालण्याचाच निर्णय घेतला. त्यांनी प्रथमच असे जाहीर केले की आपला वारसदार निवडण्याचा अधिकार जनतेचा आहे आणि जनता पार्लमेंटातील एकाद्या नेत्यापुरतीच निवड मर्यादित करील असे समजून का चालावे? कदाचित प्रदेश राज्यातील एखाद्या मातबर मुख्यमंत्र्याचीही आपला वारसदार म्हणून निवड केली जाणे शक्य आहे. पंडितजींनी डेप्युटी लीडरच्या प्रश्नाला अशी कलाटणी दिल्यानंतर सा-या राष्ट्राचे लक्ष मुख्यमंत्र्यांकडे वेधले गेले. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट ही की ज्या तीन मुख्यमंत्र्यांची नावे त्यावेळी प्रामुख्याने पुढे आली त्यांत बंगालचे बिधन रॉय, मद्रासचे कामराज आणि महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण यांचा समावेश झालेला होता. चव्हाणांनी आपल्या स्वतःसाठी केवढी प्रतिष्ठा निर्माण केली होती त्याचा हा सबळ पुरावाच होय. यशवंतरावांच्या नंतर वसंतराव नाईक यांनीही भारतीय राजकारणात तसेच मानाचे स्थान संपादन केले.

यशवंतरावांनी राष्ट्रीय प्रवाहापासून अलग न होण्याचे जे धोरण स्वीकारले त्याचेच हे फळ त्यांनी कालांतराने हस्तगत केले यात संशय नाही. काँग्रेस संघटनेमधील अंतर्गत प्रवाहांचा विचार केला तरी आपल्याला हेच दृश्य पहावयाला मिळेल. ज्यावेळी यशवंतराव काँग्रेस संघटनेमध्ये पुढे येत होते त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या अनुयायांचा गट खूपच प्रभावी होता. तो इतका प्रभावी होता की असहकारितेच्या आंदोलनाच्या वेळी टिळक अनुयायांनी तात्यासाहेब केळकरांच्या नेंतृत्वाखाली प्रतियोगी सहकारितेचा जेव्हा पुकारा केला तेव्हां पंडित मोतीलाल नेहरूंनी पुण्यातील एका भाषणात संतापाने उद्गार काढले की काँग्रेस ही महाराष्ट्र काँग्रेसची कदापिही बटीक होणार नाही. यशवंतरावांच्या पुढे हा कधी पेचच आला नाही. कारण त्यांनी लोकमान्य टिळकांचा जाज्वल्य राष्ट्रवाद स्वीकारला. पण टिळकांच्या अनुयायांकडे मात्र त्यांनी पाठ फिरविली कारण प्रत्येक वेळी त्यांनी निश्चय केला होता तो हा की गांधी-नेहरूच्या खेरीज इतर कोणत्याही पंथाशी आपण बांधिलकी स्वीकारावयाची नाही.

राजकारणातच नव्हे पण समाजकारणामध्येही त्यांनी हेच तारतम्य ठेवले. हेच पहा ना सामाजिक सुधारणेच्या बाबतीतील त्यांचे गुरु ज्योतिबा फुले, शाहू महाराज, भाऊराव पाटील हे होते. हे सारे ब्राह्मणेतर पुढारी होते. तसे पाहिले तर यशवंतरावांना ब्राह्मणेतर चळवळीतील लोकांबद्दलही अतिशय जिव्हाळा असे. पण राष्ट्रवादाशी सुरुवातीच्या ब्राह्मणेतर पुढा-यांचे रिश्तेनाते जुळले नाही. तथापि नंतरच्या काळात शेतकरी कामकरी पक्षाच्या नावाने ब्राह्मणेतरांतील जहालमतवादी लोक एकत्र आले आणि त्यांनी लढाऊ क्रांतिकारक असा पवित्रा घेतला. त्यांची भूमिका विख्यात दाभाडी प्रबंधातून प्रगट झाली. हा प्रबंध कम्युनिस्ट आंदोलनाला पाठिंबा देणारा होता. पण त्या प्रबंधाच्या उपासकांची अशी जिद्द होती की त्यांनी या प्रबंधाच्या पायावर खुद्द कम्युनिस्ट इंटरनॅशनलची मान्यता प्राप्त करून घेण्याचा पवित्रा टाकला आणि तशी मागणी इंटरनॅशनलला सादर केली. यशवंतराव चव्हाण हे शेतकरी कामकरी पक्षापासून सर्वस्वी अलिप्त राहणे शक्य नव्हते. माझी अशी माहिती आहे की या पक्षाच्या मुंबई येथे भरलेल्या पहिल्या अधिवेशनाला ते हजरही राहिले होते. या पक्षाचे पुढारी पूर्वीच्या ब्राह्मणेतर पुढा-यांप्रमाणे मवाळ नव्हते आणि ब्रिटिश सत्तेपुढे लाचार होणारे तर मुळीच नव्हते. साहजिकच यशवंतरावांनी त्यांच्या ध्येय धोरणाचा गंभीरपणे विचार केला आणि त्या विचारांनुसारच ते या अधिवेशनाला हजर राहिले होते. तथापी पुन्हा एकादा त्यांच्या मनात काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवाहाबद्दलचा विचार उचंबळून आला आणि या प्रवाहापासून अलग होण्यातील धोका जाणून त्यांनी शे. का. पक्षाकडेही पाठ फिरवली.