व्याख्यानमाला-१९८६-१७

यशवंतराव हे इंदिरा काँग्रेसमधून फुटले ते या भावनेने की इंदिरा काँग्रेस ही गांधी-नेहरूंची काँग्रेस राहिलेली नाही, ती काँग्रेसच्या या संस्कृतीपासून ढळत चालली आहे असे त्यांच्या मनाने घेतले. त्यानंतरच्या काळात बाराखडीतील निरनिराळ्या अक्षरांनुसार काँग्रेस ओळखली जाऊ लागली आणि मग मतमतांतराचा इतका गोंधळ निर्माण झाला की खरी काँग्रेस कोणती आणि खोटी कोणती याबद्दलच संभ्रम वाटू लागला. यशवंतरावांच्या वनवासाचाच हा कालखंड म्हणता येईल. या कालखंडात आकाशात दोरा तुटलेल्या पतंगासारखीच त्यांची अवस्था झाली. स्वर्णसिंग यांच्या काँग्रेसतर्फे ते लोकसभेत निवडून आले आणि जनता पक्षाच्या राजवटीत विरोधी पक्षांचे नेते हे पदही त्यांनी भूषविले. पण त्यांची मनस्थिती स्थिर नव्हती, खंबीरपणे आणि विचाराने पाऊल टाकणारे यशवंतराव आयुष्यात प्रथमच अंधारात चाचपडत असल्यासारखे दिसू लागले. त्यानंतरच्या काळात काँग्रेस (स) ही समाजवादी काँग्रेस झाली आणि जनता पक्ष दुभंगल्यानंतर यशवंतराव चरणसिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाचे उपपंतप्रधानही झाले. सत्तारूढ झाल्यानंतरचा हाही काळ वनवासाचाच काळ म्हणता येईल. यशवंतरावांची पुण्याई अशी की ते पार्लमेंटमध्ये निवडून आले. पण त्या पुण्याईवर काँग्रेस (स) ला ते सुप्रतिष्ठित करू शकले नाहीत. त्या अवस्थेत त्यांचे जे विचारमंथन झाले त्यातून त्यांना ही जाणीव झाली, आणि प्रत्यक्ष अनुभवही आला की इंदिरा काँग्रेस हीच खरी काँग्रेस मानणे भाग आहे. त्या काँग्रेसने पुढे १९८० साली पार्लमेंटची निवडणूक जिंकली, विधानसभांच्या निवडणुका जिंकल्या आणि पुन्हा एकदा देशामध्ये स्वतःसाठी कर्तुमकर्तुमशक्ती निर्माण केली. भारतीय समाजावर प्रभाव टाकणारी ही एकमेव संघटना आहे असा त्यांच्या मनाने निर्वाळा दिल्यानंतर आपल्या भवितव्याचा विचार न करता, कोणत्याही प्रकारची अपेक्षाही न ठेवता यशवंतरावांनी प्रांजलपणे जाहीर केलं की मी ‘स्वगृही’ परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंतरावांचा स्वगृही प्रवेश ही एक महत्वाची, ऐतिहासिक घटना होती. आज त्यांना त्याचं फळ बघायला मिळालं नाही हे दुर्दैव होय. पण राष्ट्रीय काँग्रेसची जी पूर्वपीठिका आहे, जी पुण्याई आहे ती लक्षात घेतली तर यापेक्षा दुसरा मार्ग यशवंतरावांच्या पुढे होता असे मला तरी वाटत नाही. त्यांनी जे पाऊल टाकलं ते योग्यच होतं असं मी निःसंकोचपणे सांगू शकतो. काल मला अॅडव्होकेट नाथ चव्हाण भेटले त्यावेळी ते मला म्हणाले की एक बुद्धिवादी आणि एक बुद्धिनिष्ट व्यक्ती यशवंतरावांच्या भूमिकेचे कशा रीतीने समर्थन करीत आहे, हे ऐकण्यासाठी मी मुद्दाम आलो आहे. त्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की मी हे जे समर्थन करीत आहे ते निष्ठेने आणि विचारपूर्वक करीत आहे. त्याचं कारण असं आहे की यशवंतरावांना दुस-या कोठल्याही पक्षामध्ये स्थान नव्हतं आणि त्यात स्थान मिळावं असं त्याना वाटतही नव्हतं. त्यांनी जी आयुष्यभर भूमिका घेतली, त्या भूमिकेशी ते प्रामाणिक राहिले. त्या त्या वेळच्या त्यांच्या भूमिकेतून त्यांच्यावर संकटे कोसळली, अनेक पेचप्रसंग निर्माण झाले, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात युद्धाच्या काळी, स्वातंत्र्यानंतर देशाची जी पुनर्रचना झाली, लोकशाहीवर जे आघात झाले त्या त्या वेळी यशवंतरावांना मोठ्या धैर्याने आपला मार्ग शोधावा लागला. पण माझी अशी धारणा आहे की या सर्व घडामोडीमध्ये अभंग राहिलेले जर नेतृत्व कोठले असेल तर ते यशवंतरावांचेच नेतृत्व होय. माझ्या मते, पंडितजींच्यानंतर विचार देणारा हा एकच नेता होता. यशवंतरावांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रवाहांची जाण होती, कोणते पक्ष तौलनिक दृष्टीने सबळ, दुर्बल ठरतील यांचे आडाखे ते बांधू शकत होते. भारताची घडण घडविण्याच्या बाबतीत काय केले पाहिजे, देश कोणत्या रीतीने पुढे आणला पाहिजे याबद्दलची स्पष्ट अशी कल्पना होती.