व्याख्यानमाला-१९८०-१९

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी राष्ट्रवादी विचारसरणीचे ऐश्वर्य वाढविले. तिची आशयगर्भता वाढविली. भारती जनतेच्या मनात त्यांनी स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण केली. राष्ट्रवादाच्या कक्षा त्यांनी अधिक विस्तारित केल्या. स्वातंत्र्याची चळवळ त्यांनी सामान्य लोकांपर्यंत नेण्याचा नेत्रदीपक प्रयत्न केला. लोकांच्या मनात त्यांनी ब्रिटिश राज्यसत्तेविरूद्ध फार मोठा असंतोष निर्माण केला. त्यांनी महाराष्ट्राला भारतातील जहालवादी राजकीय विचाराचे व चळवळीचे शक्तीकेंद्र बनविले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” असे उत्सपूर्तपणे उदगारणा-या लोकमान्यांना भारतीयांना स्वातंत्र्याची नुसती घोषणाच दिली नाही, तर त्याची एक महान संकल्पनाही दिली. त्यांनी भारतीयांच्या हातात कर्मवादाचे तत्वज्ञान व राष्ट्रभक्तीचे शस्त्र दिले. लोकमान्यांनी केलेली ज्ञानसाधन म्हणजे त्यांच्या राष्ट्रसेवेचा आविष्कारच होता. त्यांनी केलेले संशोधन हे त्यांच् ध्येयवादाची साक्ष देणारे आहे. “मराठा” आणि “केसरी” मध्ये त्यांनी केलेले लिखाण तर स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रज्वलन होते. भारताचे राजकीय स्वातंत्र्य म्हणजे लोकमान्यांचा ध्यास! आणि ते मिळविण्यासाठी कुठलीही किंमत देण्याची लोकमान्यांची तयारी होती. टिळकांची बुद्धिमता, टिळकांचे चारित्र्य, टिळकांची देशभक्ती, टिळकांचा आत्मविश्वास आणि टिळकांची निर्भयता- नव्हे टिळकांचे सबंध जीवन आणि कार्य हे अलौकिक स्वरूपाचेच होते.

पण टिळकयुगाचा आरंभ झाल्यानंतर येथील सामाजिक चळवळींना ओहोटी लागल्याचे दिसून येते. टिळकयुगात महाराष्ट्राचं सामाजिक व राजकीय मन एकसंध राहून शकलं नाही. महाराष्ट्राच्या वैचारिक जीवनात एक दुभंग (dichotomy) निर्माण झाला. तो आजही पूर्णतः नामशेष झालेला नाही. सामाजिक परिवर्तानाची प्रक्रिया मंद झाली. सामाजिक प्रबोधनाचे कार्य बाजूला पडले. महाराष्ट्रातील समाजकारण आणि राजकारण एकमेकांपासून अलग होणे किंवा दूर जाणे याला त्या काळातील ऐतिहासिक अपरिहार्याता मानता येईल का? या प्रश्नाचे उत्तर देणे हे म्हणावे तेवढे सोपे नाही. कारण हा अतिशय अवघड व गुंतागुंतीचा प्रश्न आहे. पण मला प्रामाणिकपणे असे वाटते की महाराष्ट्रातील राजकारणाला समाजकारणापासून पूर्णतः अलग करणे ही ऐतिहासिक अपरिहार्यता नव्हती. तसे करण्यामध्ये लोकमान्यांची धोरणात्मक व्यवहार्यता होती असे मानता येईल. पण महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनात निर्माण झालेला हा दुभंग ऐतिहासिक अपरिहार्यातेचा परिणाम होता असे मला वाटत नाही. ती ऐतिहासिक अपरिहार्यता गांधीजींना का जाणवली नाही? या प्रश्नाच्या उत्तराचा आधार घेतला तर ऐतिहासिक अपरिहार्यतेच्या प्रश्नाची गुंतागुंत सोडवता येईल.

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्व भारतीयांच्या ऐक्याची आवश्यकता होती ही गोष्ट उघड आहे. सामाजिक प्रश्नांवर कलह निर्माण होण्याची भीती होती; आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी आधी राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वस्व पणाल लावण्याची आवश्यकता लोकांच्या लक्षात आणून दिली. राजकीय चळवळीला गती देणा-या अनेक घटना हिंदुस्थानात घडत होत्या त्य घटनांनी इंधनाचे काम केले. बंगालची फाळणी ही त्या दृष्टीने अतिशय ठळक घटना होती. राष्ट्रीय काँग्रेसपक्षाचे व्यासपीठ हे दिवसेंदिवस अधिक प्रभावी व प्रातिनिधिक होत होते. बंगालच्या फाळणी नंतर लोकमान्यांना कारावासाची जी शिक्षा भोगावी लागली ती भारती राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ठरली. पहिल्या जागतिक महायुद्धाचाही राजकीय चळवलींवर परिणाम झाला. ती अधिक तीव्र बनली.