व्याख्यानमाला-१९७६-२५

आपण, मी काल म्हटल्याप्रमाणे, राजकिय क्षेत्रामध्ये समन्वयवादी धोरण स्वीकारलं. आपण असे म्हटलं, की या देशामध्ये लोकशाहीसुध्दा असेल आणि त्याच बरोबर समाजवादसुध्दा असेल युरोपच्या इतिहासात असे घडलेलं नाही. मार्क्सने सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे रशियाने एक पक्षाय हुकूमशाही स्थापना करून समाजवाद आणला. चायनामध्ये शेतक-यांचं राज्य निर्माण झालं आणि तिथं समाजवाद आला तर पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाहीवरती आधारलेला अशा प्रकारचा समाजवाद निर्माण झाला. आणि त्या भांडवलशाहीवरती आधारलेल्या समाजवादातून साम्राज्यवादी अशा प्रकारची राष्ट्रं निर्माण झाली. पंडितजींमुळे सर्व समावेशक अशा प्रकारची घटना या देशाला मिळाली. आणि सर्व समावेशक अशा प्रकारची घटना या देशाला मिळाली. आणि सर्व समावेशक करीत असताना आपण अनेक गोष्टी हळू हळू गमावत गेलो. आपण लोकशाही आणली, आपण समाजवाद आणला. एक पक्षीय लोकशाही करून समाजवाद आणता आला असता पण आपण म्हटलं की आम्हाला समाजवाद हवा, समाजाचं कल्याण हवं पण काही वर्गावरती अत्याचार करून, रक्तपाती क्रांती करून, दुस-याचं हिसकावून घेऊन दुस-याला मारून तो आम्हाला नको. प्रत्येकाला मतस्वातंत्र्य असलेली लोकशाही घेऊन आम्हांला समाजवाद आणायचा आहे. समाजवाद आणला रशियाकडून आणि लोकशाहीची कल्पना घेतली पश्चिम युरोपकडून नंतर आम्ही म्हटलं की व्यक्तिस्वातंत्र्यसुध्दा हवं. मानवी प्रतिष्ठेवरती आमचा विश्वास आहे. रशियातली चीनमधली व्यक्तीची जी गळचेपी आहे ती आम्हांला नको. व्यक्तिस्वातंत्र्य दिल्यानंतर त्याला मूलभूत हक्क असतील, मालमत्तेचे, वेगवेगळ्या प्रकारचे, धनार्जनाचे, वेगवेगळ्या प्रकारचे स्वत:चे हक्क मिळवून घेण्याचे असे मूलभूत हक्क त्याला असतील. व्यक्तिस्वातंत्र्य देत असताना आम्ही असं म्हटंल की हे कुठल्या धर्माचे राज्य असणार नाही. म्हणून धर्मनिरपेक्ष आमचं राज्य राहील अशी संकल्पना त्याच्या मध्ये मांडली. आम्ही असे म्हटलं की इतल्या राष्ट्रातल्या प्रत्येक सुजाण नागरिकांना मताचा हक्क असेल, तो शिकलेला असो किंवा नसो -  आणि म्हणून त्यांना आम्ही मताचा हक्क दिला. स्त्रीला दिला, पुरूषाला दिला. अशा रीतीने जगातलं जेवढे जेवढे चांगलं होतं ते ते  आणून, एक नवा प्रयोग या देशामध्ये १९४७ सालापासून आम्ही सुरू केला. परंतू हे करत असताना या कल्पना मी मघाशी म्हटल्यांप्रमाणे ज्या खालच्या थरापर्यंत जायला हव्या होत्या, त्या न गेल्यामुळे व्यक्ति स्वातंत्र्याचे चुकीचे अर्थ लावले गेले. समाजवादाला लोकशाहीची जोड दिल्यामुळे, सर्व समन्वय साधण्याचा प्रयोग करण्यात आल्यामुळे समाजवाद साधायच्या ऐवजी आपण भांडवलशाही समाज निर्माण करण्याकडे हळू हळू झुकत गेलो. आणि धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेचा आपण अट्टाहास धरत असताना धर्मनिरपेक्षतेचा धर्म हीनता असा अर्थ लावून आपण आपल्या सगळ्या समाजामध्ये एक प्रकारची नैतिक शिथिलता कोणत्याही जबाबदारीची जाणीव नसलेली अशा प्रकारची आत्मकेंद्रित भावना आपण समाजामध्ये हळू हळू आणायला लागलो आणि दु:ष्परिणाम आपल्याला भोगावे लागले. चांगल्या कल्पनेतले चांगलं तेवढं आपण टाकून दिलं, त्याचं वाईटपण आपल्या हाताला आलं असे हे विरोधाभासाचं चित्र आपल्याला दिसतं.

समाजवाद म्हणजे काय ते मी काल सांगितलं. मनुष्यमात्रामध्ये असलेली एकत्वाची भावना मनामध्ये जागी झाली की प्रत्येक माणसाने आपल्या कल्याणाचा वाटा दुस-याला देण्याची तयारी ठेवणं, याला समाजवाद असे म्हणतात. आणि या देशातील समाजवाद हा व्यक्तिस्वातंत्र्यावरती आघात करणारा असणार नाही. तो वर्गविग्रहातून निर्माण होणार नाही. श्रीमंत आणि गरिब, जमिनदार आणि त्याचा शेतकरी, कारखानदार-भांडवलदार आणि त्याचा कामगार, त्यांच्या लढाई होऊन, रक्तमय क्रांती होऊन, समाजवाद निर्माण होईल अशी हिंसेची भाषा आम्ही बोललो नाही आणि म्हणून आम्ही सगळ्यांना मुक्तद्वार ठेवलं. पण झालं काय या मुक्तद्वारामुळे ? व्यक्तिस्वतंत्र्याचा अर्थ वेगळाच लावला गेला आणि त्या व्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ वेगळा लावला गेल्यामुळे धनार्जन हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे. स्वार्थ हेच माझं व्यक्तिस्वातंत्र्याचं अंतिम अशा प्रकारचं साध्य आहे. नैतिकताही आयुष्यामध्ये पाळलीच पाहिजे असं नाही. आणि म्हणून नैतिकता ही जीवनामध्ये दुय्यम आहे. सामाजिक जबाबदारी पाळावयाचे माझ्यावरती बंधन नाही कारण मी व्यक्ती म्हणून स्वतंत्र आहे. अशा प्रकारच्या कल्पना रुजत गेल्यामुळे ज्या उदात्त विचाराने आपण समाजवादाची लोकशाहीशी सांगड घातली तो उदात्त विचार बाजूला राहिला आणि या समाजवादाची निर्मिती होण्याच्या ऐवजी आपण भांडवलशाही – मूठभर लोकांच्या हातांमध्ये संपत्तीचं केंद्रीकरण – मूठभर लोकांच्या हातांमध्ये कारखानदारीचं केंद्रीकरण, मूठभर लोकांच्या हातामध्ये सगळं हक्कांचं केंद्रीकरण अशा एका परिस्थितीला पोहोचल्यामुळे आज ज्या वेळी आपण आकडेवारी पाहतो. तेव्हा या देशाचं उत्पन्न वाढलेलं दिसतं परंतू माणसाचं दरडोई उत्पन्न रु. ४००\- च्या पलीकडे गेलेलं दिसत नाही. आणि काही लोक दिवसाला चार आणे सुध्दा कमवत नाहीत. असं ज्या वेळी आपण दृष्य पाहतो आणि अशा प्रकारचे लोक ६० टक्क्यांहून अधिक या देशामध्ये आहेत. त्या वेळी मनाला विचार पडतो की समाजवादाच्या ज्या कल्पनेमध्ये गांधीजी रमले, त्यांनी तर त्याच्या पुढची सर्वोद्यवादाची कल्पना मांडलेली होती. सर्वोद्यवादाच्या कल्पनेमधील ज्या घटनांमध्ये पंडितजी रमले ती समाजवादाची कल्पनाही नव्हती आपण कुठेतरी चुकलो. आपली काहीतरी गफलत झाली हे आपल्या लक्षात येतं. गफलत कुठे झाली हे जर आपण शोधण्याचा प्रयत्न जर केला तर तुमच्या असं लक्षात येईल की मी मघाशी म्हटलं की व्यक्ति स्वातंत्र्याचे चुकीचे अर्थ लावले गेले, लोकशाहीच्या शक्तीचा फार वाईट रीतीने वापर केला गेला. त्यामुळे पंडितजीसारख्यांचं स्वप्न इतकी वर्षे होऊन सुध्दा पुरं होऊ शकत नाही. आणि महात्माजींनी जी विश्वस्ताची कल्पना मांडली ती विश्वस्तांची कल्पना सुध्दा या देशात रुजली नाही.