या परिसरांत तुम्ही साखरेचे सहकारी कारखाने काढता आहात त्याच्या आधारावरती अनेक शेतकरी कुटुंब उर्जितावस्थेला आली. परंतु उर्जितावस्थेला येत असतांना केवळ श्रीमंतीचा, केवळ धनार्जनाचा हेतू डोळ्यासमोर ठेवल्यामुळे विद्या-कला-संस्कृती यांचेकडे त्यांचेही दुर्लक्ष होत गेलं आणि म्हणून बुध्दिवंतामध्ये अशा प्रकारचा एक समाज आढळतो की काय ही तुमची नवीन अशा प्रकारची श्रीमंती, हे नव्या प्रयोगातून निर्माण होणारा neo rich class आहे. नवीन असा श्रीमंताचा वर्ग आहे-त्यांना विद्यार्जनाचे आकर्षण नाही. ते म्हणतात की आम्ही बुध्दिवंत विकत घेऊ शकतो. आणि त्यामुळे या देशातील बुध्दिमत्ता काही आता याच्या पुढे उपयोगी पडणार नाही असा समज आढळतो. याचे कारण हे की पैसा मिळाला की आपणाला सर्स्वस्व मिळालं असे समजण्याची प्रवृत्ती नकळत का हेईना या देशामध्ये वाढत चाललेली आहे. म्हणजे ज्यांची परिस्थिती सुधारते त्यांनी त्या परिस्थिती बरोबर ज्ञान मिळवायचं आहे. आपल्या घरांतील मुलाबाळांना नव्या ज्ञानाच्या कक्षा मोकळ्या करून द्यायच्या आहेत, त्याला भरारी मारायला शिकवाचं आहे, त्यांच्या ऐवजी त्याला भरारी मारायला शिकवायचं आहे, त्यांच्या ऐवजी देखील पैश्याची तू चैन कर, तू मौज कर, तू खा, पी आपल्या आयुष्यात पूर्वी कधी नव्हत आता ते मिळते आहे. अशा एका अल्पसंतुष्ट, आत्मतृप्त आणि म्हणून आत्मघातकी विचारामध्ये समाज जर राहिला तर ज्यांची परिस्थिती सुधारते ते ही तसेच ज्यास्त सुधारलेले रहात नाहीत. अशा रीतीने आपल्या बुध्दीची वाढ, पर्यायाने वाढ खुंटायला ते कारणीभूत होतात हाही एक विचार या संदर्भात लक्षात घेतला पाहिजे. तेव्हा अज्ञान, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अज्ञान केवढं प्रचंड आणि मोठं आहे ते तुम्ही लक्षात घ्या. शाळेत मुलांना शिकवायला पाठवितो, त्या वेळेला आपल्या डोक्यात एकच विचार असतो की शिकला की तो नोकरीला जाईल. दुर्दैवाने आपल्या शिक्षणामुळे, शिक्षण पध्दतीत असलेल्या परिक्षा पध्दतीमुळे, परीक्षा पध्दतीत असलेल्या अनेक चुकीच्या कल्पनामुळे, शिक्षण, हे समाजरचनेच्या आवश्यकतेचे एक महत्त्वाचं साधन आहे, मनाच्या वाढीचं, बुध्दीच्या वाढीचं, संस्कृतीच्या वाढीचे ही कल्पनासुध्दा समाजातून हळू हळू नाहिशी होत चाललेली आहे. मी तर असे म्हणेन याच्या पुढे शिक्षणाचा आणि नोकरीचा संबंध जितका कमी होईल तितका आधिक चांगला, नोकरीचा आणि वेगवेगळ्या व्यवहार ज्ञानाचा ज्या शिक्षणामध्ये संबंध असेल तेवढ्यापुरता तो राहील परंतु इतिहास शिकण्याने, भूगोल शिकण्याने, गणित शिकण्याने, भाषा शिकण्याने, मानाच्या ज्या वेगवेगळ्या शक्तींचा असा जो विकास होत असतो त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो सध्या मॅट्रीक झालेल्या मुलाला या देशातल्या अनेक घडामोडींचं ज्ञान असत नाही, मुलाखतीसाठी अनेक लोक बोलावल्यानंतर ते प्रश्नांची काय गमतीदार उत्तरे देतात. वर्तमानपत्रांतून ती प्रसिध्द झालेली आहेत इतकं प्रचंड अज्ञान शिकून प्रमाणपत्र मिळवणा-यांच्या बाबतीत सुध्दा दिसतं. असं पाहिल्यानंतर ज्यांची परिस्थिची सुधारली ते अज्ञानी, ज्यांची सुधारली नाही ते अज्ञानी आणि जे स्वत: शिकले असे म्हणतात ते ही अज्ञानी.
अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये आज आपण सापडलो असल्यामुळे ज्ञानाचा काही एक एक नवा अर्थ, ज्ञानाची काही एक नवी संकल्पना समाजापर्यंन्त पोहोचविण्याचे विचार राजकीय नेतृत्व करणा-यांनी सामाजिक नेतृत्व करणा-यांनी शैक्षणिक नेतृत्व करणा-यांनी आज समाजापुढे नेण्याची गरज निर्माण झालेली आहे. या मुद्दे वरती मी अधिक जोर देतो की जगातली आतापर्यंन्तची सगळी राष्ट्रं कशाच्या बळावरती पुढे गेली असतील तर ती ज्ञानाच्या बळावर. युरोपातील सामाजिक क्रांती कशातून निर्माण झाली ? गॅलिलिओने लावलेल्या दुर्बिणीच्या शोधातून, न्यूटनने लावलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या शोधातून, कोपर्निकसने सांगितलेल्या पृथ्वीच्या आणि सूर्याच्या गतीच्या सिध्दांतातून या सगळ्या नव्या ज्ञानाचा शोध लागल्यानंतर त्याच्या आधारावरती माणसाला या पृथ्वीची रहस्ये कळली आणि सृष्टी माझ्यावरती नियंत्रण करते तिचे नियम मी जाणून घेतले की मी या सृष्टीचे नियंत्रण करीन अशा जिद्दीतून युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि ज्याक्षणी औद्योगिक क्रांती झाली त्याच क्षणी धर्माची, राजकारणाची, जमीनदारीची, वेगवेगळ्या कल्पनांची मनावरची बंधने गळून पडली असा युरोपचा सबंध वैचारिक इतिहास आहे, विकासाचा इतिहास आहे. नेमकी हीच गोष्ट आपल्याला करायला पाहिजे. केवळ राजकीय कायदे करून विधानसभेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम पास करून, समाजाचं परिवर्तन होत नाही, समाजाचं परिवर्तन करायला कायदा निश्चितच मदत करतो. परंतु या कायद्याचा अर्थ ख-या अर्थाने जीवनामध्ये उतरण्यासाठी त्याला आपल्या प्रत्यक्ष कतृत्वाची आणि विचाराची जोड द्यावी लागते म्हणून ज्ञानाची गरज आहे.