व्याख्यानमाला-१९७६-२०

विमान जातं डोक्यावरून, एस्. टी. ने मुंबईला जायचं असतं, नवी बी बीयाणं वापरायची असतात, नवं खत वापरायच असतं, धरणाचं पाणी घ्यायचं असतं, इलेक्ट्रिक दिवा लावावयाचा असतो आता सगळं कळतयं की ! खेड्यातील लोक काय इतके अगदी अडाणी आहेत? या अर्थाने मी त्यांना अज्ञानी म्हटलं नाही. मी ज्या अर्थाने त्यांना अज्ञानी म्हणतो त्याचा अर्थ असा की या देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि अर्थकाराणामध्ये अंतर्भूत असलेली जी मूलभूत तत्त्वं आहेत त्यांचा अर्थ अजून त्यांच्या पर्यंत जाऊन पोहोचलेला नाही आणि ज्या वेळेला ही जी बी बीयाणं वापरता, जी खतं वापरता, त्या वेळेला त्यांची एक व्यक्तिगत प्रेरणा त्याच्यामध्ये असते. त्यांच्या कार्यात राष्ट्रीय, जोम असायला पाहिजे, तो त्या ठकाणी असत नाही. त्याचं कारण या तत्त्वाचं विश्लेषण, या तत्त्वांच स्पष्टीकरण त्याच्या पर्यंत पोहोचलेलं नाही. हा त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी आपणाला त्यांना इंसेटिव्ह दयावे लागतात. सबसिडी दयावी लागते. त्याच्या साठी खास वर्ग आयोजित करावे लागतात. त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा जाऊन खेपा घालून ते समजावून सांगाव लागतं. आणि इतकं सगळ केल्यानंतर मग माझा यात फायदा आहे हे लक्षात आल्या नंतर तो त्याच्या प्रयत्नाता पडतो. त्याला हे सगळं कळलेलं असतं. पण माझा फायदा होताय त्या एका विचाराच्या पलिकडे याच्यातून सर्वसमावेशक असा सबंध समाजाचा उत्कर्ष होणार आहे. हा जो एक मूलभूत राष्ट्रीय विचार त्या माणसापर्यंत जायला पाहिजे तो गेलेला आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून हा विचार त्याच्या मनात शिरून ज्या वेळी ज्ञानाची खरी दारं उघडी होतील, त्यावेळी आपली गती अधिक वेगवान झालेली तुम्हांला दिसेल. ज्या वेळेला अशा प्रकारचा प्रवाह साचलेला आपल्याला दिसतो. खेड्यापाड्यांतून काय परिस्थिती दिसते? खेड्यापाड्यांतून तसं, सगळं चित्र, जरी अधुनिक झालेलं दिसत असलं तरी ते मूलभूत असे मनाचे बदल घडावे लागतात आचारांचे आणि विचारांचे, ते घडलेले नाहीत ती वागण्याची, विचारांची कुटुंबपध्दत तीच आहे. त्याच्या वापरायच्या बियाण्यामध्ये, खतांमध्ये, आवजारांमध्ये फरक झालेला असेल परंतू त्याच्या घरातल्या वागण्यामध्ये, राहण्यामध्ये त्याच्या मुलांच्या होणा-या आदान-प्रदानामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये काही नव्या ज्ञानाच्या गोष्टी शिरल्या आहेत असं काही चित्र आपणाला या बहुसंख्य ग्रामीण समाजातून दिसलेलं नाही. याचं कारण काय?

याची कारण दोन, पहिलं कारण साक्षरतेचं प्रमाण अत्यंत अल्प आहे हे. या देशामध्ये नुकतीच कोठे पुरुषांची ४० टक्के व स्त्रीयांची २० टक्के इतकी साक्षरता गाठली गेली आहे. आकडा जरा मोठा दिसतो ४० टक्याचा ! पण ४० टक्कयाची साक्षरता म्हणजे काय? या साक्षरतेच्या पाहणीमध्ये नुसती सही करणे. नुसते वाचता येणे त्याचासुध्दा अंतर्भाव होतो आणि अशांची संख्या आपल्याकडे ज्यास्त आहे. आपल्या साक्षरतेमध्ये ज्याला Functional Literacy कार्याक्षय साक्षरता असे म्हणातात, ज्याला ज्ञानाची विशिष्ट पायरी म्हणातात, अशा पायरीवर गेलेले त्यांच्याहून आणखी कितीतरी कमी लोक आहेत. म्हणजे या ४० टक्के पुरषांच्या साक्षरतेमध्ये ख-या अर्थाची ज्ञानाची साक्षरता नव्या कल्पनांची, नव्या गुणांची साक्षरता ही कदाचित ५ टक्के सुध्दा आढळणार नाही. बाकीची पुस्तके वाचण्यापलीकडे, वर्तमानपत्रे वाचण्यापलीकडे गेलेली नसल्यामुळे जे नवे ज्ञान, नवे विचार, नवी मूल्यं या लोकांपर्यंत पोहोचायला हवीत ते पोहोचविण्याचं एक महत्वाचं साधन गायब झालेलं आहे. वर्तमानपत्रे किती लोक वाचतात? शहरावरून जरी आकडेवारी पाहिली तरी तुम्हांला असे दिसेल. शहरांत सुध्दा फारशी वाचली जात नाहीत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी २-२|| कोटीची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपैकी १|२ लाख सुध्दा लोक वर्तमानपत्रे वाचीत नसतील. अशी जी परिस्थिती आकडेवारीवरून पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की जिथे नेहमीचे वर्तमानपत्र वाचण्याची संख्या इतकी कमी आहे, तिथे मूलभूत विचार सांगणारा, निरनिराळ्या ज्ञानाची क्षितीजे मोकळी करणारा, निरनिराळ्या प्रकारच्या कल्पना मनामध्ये रूजवणारा, अशाप्रकारचा ग्रंथ संभार वाचण्याची पात्रता आपणापर्यंत यायला आणखी किती वर्षे लागतील याचा विचार आपण केलेला बरा.