राष्ट्राचा वेग हा तासात – मैलांत-सांगता येत नाही. या गतीला रोखणारे कोणते कोणते घटक होते हे आपणाला ठाऊक आहे. त्यातला राष्ट्रीयत्वाचा होत असलेला लोप हा एक महत्वाचा घटक आहे. आणि या घटकाकडे आपण जेवढे लक्ष द्यायला हवे होते तेवढे लक्ष दिले नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की राष्ट्रीय पातळीवर जगातल्या सगळ्या उदात्त तत्त्वज्ञानाचा घोष करणारे सगळे राजकीय पक्ष हे प्रांतीय वादावर उतरले की अत्यंत संकुचित बनत होते. हा ही एक विरोधाभास आहे आपल्या, जीवनातला ! एरव्ही राष्ट्रीय पातळी वरती समाजवादांच सांगणारे लोक अशा प्रकारचे प्रांतीय भाषिक प्रश्न आले की वेगवेगळ्या भूमिका एकाच विचाराचे लोक घेत होते आणि आपल्याला प्रश्न पडत होता की राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेमध्ये ही विसंगती कशी राहू शकते. आज तुम्हाला अशी एक परिस्थिती आलेली दिसेल किंवा आणली गेली आहे की जीमुळे आपणाला राष्ट्राचा विचार करण्याशिवाय दुसरा विचार करणे आज अशक्य झालेले आहे. वर सांगितलेलं संकुचित प्रांतीयीकरण हे राष्ट्रद्रोहाचे ठरेल. अशा प्रकारची भीती आपल्याच मनामध्ये निर्माण व्हायला लागली आहे. त्यामुळे हे सगळेच प्रश्न काल पर्यंत जिवंत होते ते कुठे गायब झाले ते कळेनासे झाले आहे. सगळे माना मोडून पडलेले आहेत. अशीच जर शांत सुस्थित परिस्थिती राहिली तर ते प्रश्न सामंजस्याने, आदान प्रदानाने सोडवता येतात, सुटतात. कृष्णा-गोदावरी-नर्मदा या नद्यांच्या पाण्याचा प्रश्न इतकीवर्षं ताटकळत पडला होता तो केवळ सामंजस्याच्या भूमिकेवर आला व सुटून गेला. असे अनेक प्रश्न आहेत. पंजाबी सुभ्याचा प्रश्न आला, चंदिगडच्या राजधानीचा प्रश्न, गोव्याच्या विलिनीकरणाचा प्रश्न आला अजून बेळगावच्या प्रश्नासंबंधी घोळ चाललेलाच आहे. अनेक प्रश्न झटपट सुटत गेले. आता कदाचित प्रश्न सुटण्याची तड लागेल आणि त्याच्यातून प्रश्न सुटेल. आणि ज्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा आपण आता पर्यंत मोठ्या इच्छेने, आतुरतेने वाट बघत होतो ती निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल आणि आपल्या प्रगतीतला एक महत्त्वाचा अडथळा दूर होईल. तो ही एक विचार आपण लक्षात घेतलातर राष्ट्रीयत्वाची कल्पना ही संकुचित असत नाही कारण जगातल्या सगळ्या मानव समजाची विभागणी राष्ट्रामध्येच झालेली आहे. आणि प्रत्येक राष्ट्र घटनेला आपल्या राष्ट्राचं सार्वभौमत्व सांगितल्याशिवाय त्यामध्ये आपल्या तत्त्वांची मांडणीच करता येत नाही. त्यामुळे अमेरिकेचं असेल, आफ्रिकेतल्या राष्ट्राचं असेल, जर्मनीचं असेल, ब्रिटनचं असेल, फ्रान्सचं असेल. चीनचं असेल, रशियाचं असेल या प्रत्येकाच्या राष्ट्रीयत्वावरती त्याच्या सगळ्या आर्थिक रचनेची, सामाजिक रचनेची तेथील राजकीय विचारांची उभारणी झालेली आहे. ज्या अधिष्ठानावरती सबंध राष्ट्र उभारायचं, ती भावना जर खच्ची झाली, ती जर विस्कळीत झाली, ती जर मंद झाली तर राष्ट्राच्य़ा गतीमध्ये मंदगती येते हे आपण आपल्या इतिहासाच्या अभ्यासावरून शिकलो आहोत. ही चूक यापुढे सुधारली जाईल – तर निश्चितच हा देश आधिक गतीने आपल्या परिवर्तनाकडे गेल्याशिवाय राहणार नाही.
दुस-या आणखी एक दोन गोष्टींचा मी मुद्दाम उल्लेख करणार आहे. मी काल ज्याचा उल्लेख केला त्या धर्मसमजुतीचा किंवा अंधश्रध्देचा पुन्हा मी उल्लेख करीनच. परंतू या देशाच्या लोकसंख्येकडे जर पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल या देशामध्ये असलेल्या जवळ जवळ ५५ कोटी लोकांपैकी ८० टक्के लोक खेडयांतून राहतात. साधारण १९ ते २० टक्के लोक शहरांतून विखुरलेले आहेत. शहरीजीवन जगताहेत मध्यम वर्गीयांचं. सगळेच्या सगळे नव्हे २० टक्क्यांत २५ टक्के लोक त्यांतल्या त्यात मध्यम वर्गीयांचे जीवन जगत असतील. उच्च जीवन जगणारे किती टक्के आहेत ते तुम्ही शोधू शकता. ते चार पाच टक्केच असतील. म्हणजे जवळ जवळ ८० ते ९० टक्के लोक अशा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये जगतात, काही शहरात जरी असले तरी ग्रामीण जीवनापेक्षाही अत्यंत हालाखीने जगतात. अशा या देशामध्ये दोन रोग आपणाला फार महत्त्वाचे जडलेले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा रोग म्हणजे अज्ञान. इतकं अतोनात अज्ञान आपल्या या खेड्यापाडयांतून पसरलेलं आहे. हे जे अज्ञान म्हणून मी म्हणतो ते कसलं अज्ञान? तुम्ही म्हणाल आम्हाला सगळ्यागोष्टी माहित आहेत.