समस्या व आव्हाने :
आर्थिक विषमता : आज लोकशाहीला सर्वांत मोठे आव्हान आहे ते आर्थिक विषमतेचे. आपल्याकडे फार दारिद्रय आहे. समाजवादामध्ये अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गोष्टी येतात. या साध्या गरजा आहेत व त्या भागविल्या पाहिजेत. आणि हा फार मोठा प्रश्न आपल्यापुढे आहे. आपल्या देशात दरडोई वार्षिक उत्पन्न चारशे रुपये आहे. खालच्या वर्गाचे दरडोई उत्पन्न दरमहा सात रुपये म्हणजे दररोजचे तीन-चार आणे आहे.
अमेरिका, रशिया येथे दरडोई वार्षिक उत्पन्न चार ते पाच हजार आहे. यावरुन आपल्याकडच्या दारिद्रयाची कल्पना येते.१ शिवाय जी आर्थिक विषमता आहे त्यामध्येही फार मोठा फरक आहे. तिकडे विषमतेचे प्रमाण १० पटीने म्हणजे १:१० असेल तर आपल्याकडे ते १०० पटीने म्हणजे १:१०० असे आहे. किंवा त्याची तुलनाच करता येणार नाही.२ मुंबईतील एखादा भिकारी व हवेलीतील श्रीमंत यांची तुलना कशी होऊ शकेल ? मुंबईमध्ये फुटपाथवर राहाणारे लाखो लोक आहेत. तेथील झोपडपट्टीमध्ये३ राहणारे जवळ जवळ १५ लाख लोक आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ पाच लाक रुपयांवरील एकूण इस्टेटीवर शासनाचे आवश्यकतेनुसार नियंत्रण असावयास हरकत नाही.
२ आलिशान हॉटेलमध्ये पाचशे रुपये एकावेळचे भोजन-बिल देणारा धनिक व रस्त्यावर पडलेले उष्टे आईस्क्रीम पॉट चाटणारे गरीब बालक याची तुलना होऊ शकत नाही. हजारो लोकांची बसण्याची व्यवस्था वातानुकूलित (air-conditioned) करण्यासाठी बर्फाच्या लाद्यांच्या भिंती उभारु शकणारे लोक आपल्याकडे आहेत.
३ झोपडपट्टी वाढते याचा अर्थ प्रत्यक्ष झोपडी अनधिकृतपणे बांधली जात असता त्याकडे दुर्लक्ष होते. त्या बांधकामाचा खूप विस्तार झाला की ते उठविणे अवघड व अन्यायाचे होते. अशी बेकायदेशीर बांधणी मुळातच होऊ देऊ नये व आता जी आहे तिचे योग्य पुनर्वसन झाल्यानेच झोपडपट्टीचा प्रश्न सुटणे शक्य आहे. आहेत तेथेच गाळे बांधून देणे, जी मूळ झोपडी आहे तिचेच घरकूल तयार करुन देणे हे योग्य पुनर्वसन असू शकेल. खूप पैसा खर्च करुनही प्रश्न संपणार नाही. पण योग्य पद्धतीने आधुनिक मटेरियल वापरुन कमी खर्चात हा मोठा प्रश्न आटोक्यात येण्यासारखा आहे. टेलिव्हिजन किंवा टेलिफोनची सोय करुन झोपडपट्टीत सुख येणार नाही. त्यांचे नेमके दु:ख जाणून त्याचेच निराकरण केले पाहिजे.